काळजाला स्पर्श करणारी जाहिरात
‘रिश्ते निभाने के लिये कभी कभी थोडा दूर जाना पडता है… रखेंगे आपका खयाल, कही भी…’ नुकतेच असे सांगणारी सॅमसंगची सुंदर जाहिरात थेट काळजाला स्पर्श करत भारतातील सुपरहिट अॅड ठरली.
सॅमसंग कंपनी आपल्या सर्वांना माहीतच आहे. आता सॅमसंगची नवीन सर्व्हिस व्हॅन भारतातल्या कुठल्याही काना-कोपऱ्यात पोहोचेल. टिव्हीच्या दुरूस्तीसाठी सॅमसंगच्या ५३५ व्हॅन्स् घरी जाऊन सेवा देण्यासाठी सज्ज होत आहेत. हृदयस्पर्शी जाहिरातींद्वारे दिलेला हा संदेश, ही माहिती प्रत्येकाला भावली आहे. केवळ दोन आठवड्यांमध्ये ही जाहिरात ३५ मिलियन वेळा पाहिली गेली आहे. तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की पाहा. युट्यूबवर आहेच. एक मुलगी टिव्हीच्या दुरूस्तीसाठी कॉल करते. कंपनीचा टेक्निशियन ड्रायव्हरसह तिच्या घरी निघतो. रस्त्यामध्ये अनेक अडथळे येतात. ते सर्व दूर करत, कुठलीही सबब- कारण न सांगता तो दिलेल्या वेळेत तिथे पोहोचतो. पाहतो तर काय, एक अंध मुलगी तिथे टिव्ही दुरूस्तीसाठी त्याची वाट पाहत असते. टेक्निशियन शांतपणे टिव्ही दुरूस्त करतो आणि टिव्ही सुरू झाल्यावर ती अंध मुलगी त्या होस्टेलमधल्या इतर सर्व अंध मुलांना बोलावून आणते. सर्व टिव्ही समोर बसतात. कंपनीचा टेक्निशियन थोडासा चकीत होऊन परंतु शांतपणे सगळं पाहत असतो. टिव्हीवर प्रोग्राम सुरू होतो. त्यात एक अंध मुलगी गाणे सादर करत असते आणि सर्वजण तिचा आवाज ऐकून अतिशय आनंदित होतात. ते सगळे दृश्य
पाहून शब्दच सुचत नाहीत. अंगावर काटा येतो आणि हृदय गदगदून जातं.
ज्या मुलीने त्या टेक्निशियनला फोन केलेला असतो, ती त्याला म्हणते, टिव्हीमध्ये जी मुलगी गाणं गातेय ना, ती आमच्या होस्टेलची आहे आणि माझी मैत्रीणही ! सॅमसंग कंपनीची ही जाहिरात खूप मोठा संदेश देते, आम्ही आमच्या ग्राहकांची काळजी घेतो. अगदी कुठेही असो. ‘नाती निभावण्यासाठी कधी कधी थोडं दूर जावं लागतं’ हे शब्द अक्षरशः आपल्याला जिंकून घेतात.
या जाहिरातीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सॅमसंग कपंनीचे सीएमओ रंजीवजित सिंग म्हणाले की, सेवाविस्तार करताना अतीव आनंद होत आहे. ग्रामीण भारतात, विशेषतः प्रत्येक तालुक्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मग ते कुठेही असोत.
जाहिरातींमध्ये भावनिक गुंतवणूक असेल तर तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपली कळकळ आणि बांधिलकी नक्कीच ग्राहकांपर्यंत पोहोचत असते. उत्पादन कुठलेही असो, कंपनी कुठलीही असो. जाहिरात करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. दिलेला शब्द पाळल्याशिवाय बॅण्ड मोठा होत नाही. ग्रॅण्ड मोठा होतो तो विश्वासातून. सेवेतून !
तुम्ही तुमच्या ग्राहकांची काळजी घ्या. ते तुमची काळजी घेतील.
ज्ञानेश शिंदे क्रिएटीव्ह आर्टिस्ट
अॅण्ड अॅण्ड कन्सल्टंट
मो.९८२२२-४९५७७
Email: [email protected]

