मुलांची मानसिक ताकद वाढविण्यासाठी ‘आनापान ध्यान’

मुलांची मानसिक ताकद वाढविण्यासाठी
‘आनापान ध्यान’

डॉ .दत्ता कोहिनकर (माईंड पॉवर ट्रेनर)
आधुनिक स्पर्धेच्या युगात
लहान मुलांवर योग्य वेळी सुसंस्कार झाले तर उद्याचा भारत महासत्ता होण्याचं अब्दुल कलामांचं स्वप्न साकार होऊ शकेल.
महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे
उच्च शिक्षण पण त्यास नैतिक
मुल्याची जोड नसेल तर तो शाप आहे. म्हणून मुलांना नितीमान बनविण्याकडे प्रथम लक्ष देणं आवश्यक आहे.
बरेच पालक मुलांना गुरूकुलात त्यांच्या इच्छेविरूद्ध ठेवतात. जबरदस्तीने त्यांच्यावर गुरूकूल लादून त्याची मातृपितृप्रेम भूक तोडली जाते. का बरे
आपण मुलांचे गुरू होऊ शकत नाही? साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे मुले
ही देवाघरीची फुले, या फुलांना नेहमी सकारात्मक विचारसरणी वा आदर्श दिला पाहिजे. त्यासाठी पालकांनी मुलांसमोर आपल्या आचरणातून आदर्श घालून दिला पाहिजे. आजची मुले ही उद्याची फुले, उद्याच्या उज्ज्वल
भारताचे आधारस्तंभ, सबल व सशक्त होण्यासाठी पालकांनी जागरूक राहिले पाहिजे.
त्यांना व्यायामाची आवड लावून मैदानावर नेलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ‘माझ्या प्रिय मित्रांनो रोज मैदानावर जा, खेळ खेळा, वासरासारखे हुंदडा, व्यायाम करा. जेव्हा तुम्ही सबल व सशक्त व्हाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे कळू शकेल.’ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.त्याप्रमाणे त्यांची आवड व कौशल्य बघून आवडत्या क्षेत्रात त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे.
म्हणून आपल्या मुलाच्या आयुष्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्याच्या
मनाचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं हे अतिमहत्त्वाचे आहे. दहावीच्या टॉपर लिस्टमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकिय तपासणी केली असता
२५% विद्यार्थ्यांना उच्च रक्तदाब आढळला. गुन्हेगारी क्षेत्रात मुलांचा वाढता सहभाग दिसू लागला आहे. किशोरवयीन मुले ही निद्रानाश,रक्तदाब, मानसिक व्याधींनी ग्रस्त झाली आहेत. दुर्बल झाली आहेत.
विवेकांनद म्हणतात, मैदानावर फुटबॉल खेळून शरीरयष्टी कमावणारा,तासनतास देवळात घंटी वाजवत बसणाऱ्यापेक्षा ईश्वराजवळ अधिक सहजपणे
पोहचू शकतो. पण या विचारांकडे आज दुर्लक्ष होत आहे. वाढती स्पर्धा,चंगळवाद, नितीमूल्यांचा हास, घरातील वाद, भय, चंचलता, स्पर्धात्मक
वातावरण यामुळे मुले नैराश्याकडे जाऊ लागली आहेत.
म्हणून मुलांच्या मानसिक सबलता व निर्मलतेसाठी ध्यानधारणा ही आवश्यक गोष्ट आहे. ‘आनापानसती’ हे त्यातील एकशास्त्रोक्त ध्यान.श्वासाच्या सहाय्याने मनाला एकाग्र निर्मल व सबल करण्याची ही शास्त्रोक्त साधना.या साधनेमुळे मुलांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, एकाग्रता सबलता वाढते. भय कमी होते. चंचलता दूर होते. मुलांची आकलनक्षमता वाढून नैतिकता येते. २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी या साधनेचा शोध लावला.पू. गुरुजी श्री सत्यनारायण गोएंकाजींनी १९६९ साली ही भारतातून लुप्त
झालेली साधना परत भारतात आणली. अनेक विद्यार्थी आज याचा प्रत्यक्ष लाभ घेत आहेत. महाराष्ट्रातील विपश्यना बऱ्याच विपश्यना ध्यान केंद्रावर ९ ते १८
वयोगटातील मुला-मुलींसाठी एकदिवसीय शिबिर भरवले जाते. हे शिबीरे पूर्णपणे विनामूल्य असून जुन्या साधकांनी दिलेल्या दानावर व स्वयंसेवकांच्या सेवेवरच हे काम चालते. नक्कीच मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी मुलांना “आनापान सती” शिबिराला बसवा व उद्याचे उज्वल राष्ट्र घडवा
डॉ .दत्ता कोहिनकर (माईंड पॉवर ट्रेनर)

वेबसाईट : www.uvidhamma.org

error: Content is protected !!