आदर्श व प्रेरणा… यशाचा राजमार्ग
डॉ. नितू मांडके
डॉ. नितू मांडके हे माझे आणखी एक सर्वोत्तम आदर्श. सुदैवाने मला डॉ. मांडके यांना दोन वेळा भेटण्याचा योग आला. तसे पाहायला गेले, तर डॉ. मांडकेंचे वैद्यकीय क्षेत्र व माझे क्षेत्र याचा दूरान्वयेही संबंध नाही. एकूणच कोणत्याही डॉक्टरांचा व माझा संबंध तसा फक्त आजारी पडलो तरच यायचा. पण नियती तुम्हाला कधी कोणत्या मार्गाने योग्य दिशा दाखविण्याची संधी देईल, हे सांगता येत नाही. तसा योग माझ्याबाबतीत आला असावा, म्हणूनच मला डॉ. मांडके यांचे ते व्याख्यान ऐकायला मिळाले. झाले असे की, १९८७ साली एकदा ते अहमदनगरला आले होते. हॉटेल थापर इनमध्ये त्यांचे काही डॉक्टरांसमोर व्याख्यान होते. माझे मेहुणे डॉ. प्रकाश जाधव यांचा मला रात्री साठेआठ वाजता फोन आला, ‘डॉ. मांडके यांचे नगरमध्येच असे असे व्याख्यान आहे. तुम्ही येता का?’ तोपर्यंत डॉ. मांडके कोण आहेत, हे मला माहिती नव्हते. पण तरीही वेगळे काही तरी ऐकायला मिळेल, या उत्सुकतेने मी त्यांच्या त्या कार्यक्रमाला गेलो. मी दोन-अडीच तास त्यांचे बोलणे ऐकले. अक्षरशः भारावून गेलो. अंगावर शहारे येणे म्हणजे काय असते, हे अनुभवले. किती अप्रतीमरीत्या त्यांनी विषयाची मांडणी केली होती. डॉ. मांडके यांचा फॅनच झालो मी. पुढे एकदा खानदेशात जळगावला आमची एक बिझनेस मीटिंग होती. तेथील रोटरी क्लबने एक कार्यक्रम आयोजित केला होता. रोटरीचे अशोक जोशी हे माझे मित्र होते. त्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा डॉ. मांडके यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. एवढेच नाही तर कार्यक्रमात मांडके सरांशी मी हस्तांदोलनही केले, त्यांच्या हाताचा उबदार स्पर्श मला आजही जाणवतो. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे कौशल्य वादातीतच आहे. पण त्यापेक्षाही मला त्यांचा जीवनपट अधिक भावला. शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काय असते, हे मला उमजले. कोण होते डॉ. नीतू मांडके ? जगाला त्यांची ओळख एक हाय प्रोफाईल हार्ट सर्जन म्हणून होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिग्गज नेते शरद पवार अशा लोकांच्या हृदयावर त्यांनी उपचार केले. किती मोठा विश्वास त्यांनी कमावला होता. डॉ. मांडके यांचे व्यक्तिमत्त्वही भारदस्त होते. उंची तशी पाच फुटांच्या आसपासच असेल, पण त्यांच्या भारदस्त मिशा लक्ष वेधून घ्यायच्या. चेहऱ्यावरील तेज व बोलताना शब्दाशब्दांतून व्यक्त होणारा आत्मविश्वास… व्याख्यानात ते सांगत होते, ‘माझं दररोजचं उत्पन्न सुमारे दहा लाख रुपये इतकं आहे. मी अमेरिका, इंग्लंड, जपान अशा अनेक देशांतील डॉक्टरांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करतो. तुम्ही जर उच्च दर्जाची चांगली सेवा देत असाल, तर मेव्याची चिंता कधीच करू नका.
मेवाही त्याच पटीत हमखास मिळतो.’ यासाठी त्यांनी एक उदाहरण सांगितले, उज्जैनवरून त्यांना एक फोन आला. समोरचा म्हणाला, “डॉक्टरसाहेब, आमच्या शेटजींना अॅटॅक आला आहे. आमची विनंती आहे की, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही उज्जैनला यावं. पैसे कितीही लागू द्या, त्याची चिंता करू नका. तुमच्यासाठी मुंबईहून स्पेशल विमानाची सोय करतो. पण तुम्ही या.” डॉ. मांडके त्यांना म्हणाले, “सॉरी, पण मी येऊच शकत नाही. माझ्याकडे सहा महिन्यांपासून अपॉईंटमेंट घेतलेले रुग्ण असतात. त्यांना वेळ द्यावाच लागतो. तुम्ही तुमच्या शेटजींना घेऊन मुंबईला या. मग उपचार करता येतील.” डॉक्टर ठाम असल्याने समोरच्यांनी दिल्लीहून इंदूरला विमान मागवून घेतले. विमान येईपर्यंत शेटजी उज्जैनहून इंदूरला आले. तेथून विमान मुंबईला सांताक्रूझला उतरले. त्यांना जितका वेळ इंदूरहून मुंबईला यायला लागला, त्यापेक्षा अधिक वेळ मुंबईच्या गर्दीतून डॉ. मांडकेंच्या हॉस्पिटलला येण्यास लागला, डॉक्टरांनी शेटजींना तपासले. बरोबर असलेल्या शेटजींच्या नातेवाईकांना ते म्हणाले, “सॉरी, आपले शेटजी पंधरा मिनिटांपूर्वीच आपणास सोडून गेले.” त्यांचा मुलगा म्हणाला, “यासाठीच आम्ही तुम्हाला विनंती करीत होतो की, तुम्ही उज्जैनला या म्हणून. कितीही पैसा तुम्हाला दिला असता.” या एका गोष्टीवरून लक्षात येते की, लोक कितीही पैसा द्यायला तयार असतात. फक्त त्यांना सेवा दर्जेदार व जलद हवी असते.
यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्हीही अशी सेवा द्यायला शिका, मेवा कधीच कमी पडणार नाही. डॉक्टरांनी त्यांच्या हॉस्पिटलचे मोठे स्वप्न पाहिले होते. ज्या हॉस्पिटलमध्ये जवळपास तीनशे कार
पार्क होऊ शकतील. ‘हॉस्पिटलच्या टेरेसवर मला हेलिपॅड बांधायचे आहे. जेणेकरून अत्यवस्थ पेशंटला एअर अॅम्ब्युलन्सने बेट हेलिपॅडवर आणता येईल. तिथून लिफ्टने थेट ऑपरेशन थिएटरमध्ये अथवा माझ्या क्लिनिकमध्ये आणता येईल. डॉ. मांडके यांचे हे भाषण आहे १९८९ चे. त्या काळात ते दिवसाला दहा लाख रुपये कमावत होते. यासाठी ते कष्टही तितकेच घेत होते. त्यांनीच सांगितले, “माझा दिवस सुरू होतो पहाटे पाच वाजता. साडेसहापर्यंत सगळं आवरतो. अंघोळ, पूजा, ध्यानधारणा करून एक ग्लास दूध पितो. ड्रायव्हर तयार असतो. सकाळी सात वाजता हॉस्पिटलवर पोहचतो. तोपर्यंत माझ्या असिस्टंटने ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाचं हृदय उघडून ठेवलेलं असतं. मी जाताच लगेच ऑपरेशला सुरुवात करतो. असे एका मागून एक ऑपरेशन सुरू असतात. दुपारी तीन वाजता एक कप कॉफी व त्याबरोबर दोन-तीन बिस्किटं खायची. परत ऑपरेशन सुरू, संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑपरेशन थिएटरमध्येच असतो. त्यानंतर लगेचच रात्री अकरा वाजेपर्यंत ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी. एवढं केल्यावरही काम थांबत नाही. अकरानंतर मध्यरात्री १ वाजेपर्यंत ऑपरेशन केलेल्या रुग्णांची तपासणी करायची. त्यांच्या तब्येतीची माहिती घ्यायची. कोणाला काही त्रास असल्यास त्यावर औषधोपचार करायचा, असं सगळं आटोपून रात्री दीड वाजता घरी यायचं. तोपर्यंत माझी पत्नी जेवणासाठी वाट पाहत बसते. मध्यरात्री दीड ते दोन जेवण करायचं. जेवतानाच घरच्या आघाडीवरच्या गप्पा. असं सगळं करून दोनच्या आसपास झोपायचं, पहाटे परत पाच वाजल्यापासून तोच दिनक्रम सुरू. एवढं सगळं केल्यावर मी रोजचे दहा लाख रुपये कमावतो. पण त्यासाठी पहाटे पाच ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत काम, काम आणि कामच करावं लागतं. आपल्याकडे एखाद्याला एखाद्या दिवशी शे पाचशे रुपये जास्त कमाई मिळाली की, त्याला ते पैसे पचविता येत नाहीत. तो लगेच म्हणतो, ‘चला आज पार्टी!’ मग लगेच कोणाला तरी घेऊन धाब्यावर नाही तर हॉटेलमध्ये जायचं. मी तर दहा लाख रुपये रोज कमावतो. मी काय खात असेन ? एवढे पैसे मी कसे पचवीत असेन. तुम्हाला मी आवर्जून सांगतो की, माझं रोजचं जेवण अगदीच साधं आहे. ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, मेबी किंवा पालकाची भाजी आणि एक ग्लास ताक. इतकाच माझा आहार असतो. एखाद्याला विश्वास ठेवणंही कठीण. पण हे सत्य आहे. तुम्ही जर आहारावर नियंत्रण ठेवलं आणि जोडीला नित्यनियमाने मेडिटेशन केलं, तर हे शक्य आहे.
“आपले पंतप्रधान किंवा मोठमोठी माणसे दिवसाचे अठरा-वीस तास काम करतात. ते केवळ खाण्यावर नियंत्रण ठेवून आणि ध्यानधारणा करतात म्हणूनच. एवढं करूनही माझ्यावर आरोप होतो की, मी फक्त श्रीमंतांचाच डॉक्टर आहे. गरिबाबद्दल मला कणव नाही. पण हे सगळे धादांत खोटं आहे. मी पण स्वतः गरिबी अनुभवली आहे. अनवाणी पायाने सात-आठ किलोमीटरचा रस्ता तुडवत शाळेत जायचो. फडक्यात बांधलेली भाकरी व मिरचीचा ठेचा खायचो. ठेच्यावर साधं तेलही नसायचं. असे दिवस मी अनुभवले आहेत. गरिबी भोगली आहे. त्यामुळे गरिबी काय असते, हे मला चांगलंच माहिती आहे. मी दिवसभरात जेवढी ऑपरेशन्स करतो, त्यातील वीस टक्के ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट करतो. गरीब रुग्णांकडून एकही पैसा घेत नाही. तीस टक्के ऑपरेशन अॅट कॉस्ट करतो, म्हणजे जेवढा खर्च येतो तेवढीच फी घेतो. एकही पैसा जास्त घेत नाही. परंतु उरलेले पन्नास टक्के जे श्रीमंत असतात, त्यांच्याकडून भरपूर पैसे घेतो. माझ्या मते हे पाप नाही. सगळ्यांना वाटतं की, आपण खूप पैसे कमवावेत, श्रीमंत व्हावं. मीसुद्धा माणूसच आहे ना! मलाही वाटतं, पैसे मिळवावेत. मी सुरुवातीलाच सांगितलं की, उच्च प्रतीची सेवा द्या. मी लोकांना त्यांच्या अपेक्षापेक्षा जास्त चांगली सेवा देतो. त्यासाठी माझं सगळं कौशल्य, ज्ञान पणाला लावतो. म्हणून मला रोज मेवा मिळतो, तोही दहा लाख रुपयांचा.”
मित्रांनो असे हे माझे आदर्श डॉ. नीतू मांडके. दुर्दैवाने त्यांना देवाने आयुष्य खूप कमी दिले. वयाच्या चोपत्राव्या वर्षी ते हृदयविकारानेच सगळ्यांना सोडून गेले. अनेकांच्या हृदयाची काळजी घेत त्यांना जीवनदान देणारा हा अवलिया डॉक्टर स्वतः हृदयविकारानेच गेला. नियतीचा किती हा क्रूर खेळ! त्यांच्या स्वप्नातील हॉस्पिटलचा डाव अर्ध्यावर मोडला गेला. परंतु नंतर ते हॉस्पिटल पूर्ण केले ते माझे दुसरे आदर्श धीरूभाई अंबानी यांच्याच ग्रुपने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरते डॉ. मांडके यांच्या मनातील भव्यदिव्य हॉस्पिटलचे उद्घाटन झाले, कोकिळाबेन मेमोरियल हॉस्पिटल, भारतातील प्रतिष्ठित व नामांकित हॉस्पिटलमधील एक त्याची ओळख आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रापासूनच मला मोठे स्वप्न पाहायची प्रेरणा मिळाली. त्यांच्या कार्यातून, त्यांच्या वाटचालीतून एक ऊर्जाही मिळाली, त्यामुळेच अनेकांचा विरोध असतानाही नोकरीचा राजीनामा देऊन मी विमाव्यवसायात पदार्पण केले.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
