आदर्श व प्रेरणा… यशाचा राजमार्ग

आदर्श व प्रेरणा… यशाचा राजमार्ग

जगातील शक्तिशाली भारतीय महिला इंदिरा नूयी

शीतपेयांसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या पेप्सिको कंपनीच्या अध्यक्षपदावरून इंदिरा नूयी या २०१८ मध्ये निवृत्त झाल्या. इंदिरा नूयी या मूळच्या भारतीय असून त्यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. कर्तृत्व, जिद्द व कष्ट करण्याची तयारी असेल, तर तुमच्या यशाच्या आड कोणतीही गोष्ट येत नाही हे नूयी यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. चेन्नई येथील पारंपरिक अणि सनातनी कृष्णमूर्ती कुटुंबात इंदिरा यांचा २८ ऑक्टोबर १९५५ रोजी जन्म झाला. आई र्शाता यांचा त्यांच्या आयुष्यावर विशेष प्रभाव आहे. इंदिरा व त्यांची बहीण यांच्यावर आईने बालवयातच अतिशय मोलाचे संस्कार केले. त्या दोन्ही मुलींना शाळेत असताना ‘मोठेपणी मी कोण होणार?’ या विषयावर बोलायला सांगायच्या. मुलीही आपापल्या स्वप्नांना सातत्याने खड्या आवाजात सादर करायच्या. त्यांच्या मनात खूप खूप मोठे होण्याची स्वप्ने त्यांच्या आईने बिंबविली. मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे यशाची सुरुवात ही मनातून होते व नंतर कृतीत उतरते. त्यामुळे इंदिरा नूयी यांच्या मनात मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा जागृती झाली व पुढे त्याप्रमाणे कृतीही होत गेली. बीएस्सीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आयआयएम कलकत्ता येथून एम.बी.ए. केले. त्यांनी पहिली नोकरी टुटाल या ब्रिटिश टेक्स्टाईल कंपनीत केली. यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीतही त्यांनी जबाबदारी सांभाळली. १९७८ मध्ये त्यांनी अमेरिकेतील येल
विद्यापीठातून त्यांनी मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. १९८६ ला त्या मोटरोला कंपनीत उपाध्यक्ष होत्या. १९९४ मध्ये पेप्सिको कंपनी तसेच जनरल इलेट्रिक या दोन्ही कंपन्यांकडून त्यांना सीईओ पदासाठीचे प्रस्ताव आले. इंदिरा नूयी यांनी पेप्सिको या शीतपेयांची कंपनी स्वीकारली. या कंपनीत त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यशोशिखर गाठले. २००६ ला त्या कंपनीच्या अध्यक्ष बनल्या. जगातील एवढ्या मोठ्या कंपनीची अध्यक्ष बनल्यानंतर साहजिकच त्यांना अत्युच्च आनंद झाला. आपले हे यश आईच्या कानावर घालण्यासाठी, तिच्या डोळ्यात आनंद पाहण्यासाठी त्या घरी आल्या. आईला म्हणाल्या, “आज मी तुला अविश्वसनीय अशी आनंदाची बातमी देणार आहे.” आईने त्यांच्याकडे पाहिले व म्हणाली, “तुझी आनंदाची बातमी बाजूला राहू दे, आधी बाजारात जाऊन दूध घेऊन ये, घरातील दूध संपलं आहे.” इंदिरा नूयी यांचा आईच्या या वाक्याने हिरमोड झाला. त्या निमूटपणे बाजारात गेल्या व दूध घेवून आल्या. आल्यावर मग आईला त्यांनी सांगितले, “आज तुझी मुलगी जगातील एका मोठ्या कंपनीची अध्यक्ष झाली आहे.” त्यावर त्यांची आई म्हणाली, “तू मोठी मजल मारलीस, हे ठीक आहे. तू कंपनीचीच काय एखाद्या देशाची जरी अध्यक्ष झाली; तरी तुझं पद, तुझ्या डोक्यावरचा मुकुट तुझ्या कार्यालयापर्यंतच मर्यादित राहू दे. घरी आल्यावर तू कोणाची तरी पत्नी, मुलगी, आई, बहीण आहेस, हे कधी विसरू नकोस. जिचं घर नीट, तिचं दार नीट हे लक्षात ठेव. त्यामुळे घरी आल्यावर तू बाहेर कोण आहेस, हे सोडून द्यायचं व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या. कितीही पैसे असले, तरी तुझं घरातील स्थान पैशाने भरून निघू शकत नाही.” आईचे हे बोलणे इंदिरा नूयी यांच्या मनावर कायमचे कोरले गेले. स्वतः इंदिरा नूयी यांनी आपल्या पुस्तकात हा प्रसंग आवर्जून नमूद केला आहे. त्यामुळे त्यांनी भविष्यात कधीही पद, प्रतिष्ठा याचा रुबाब केला नाही. त्या परदेशी नागरिक झाल्या असल्या, तरी त्यांचे भारतीय बंध टिकून आहेत. भारतातील शेतकी क्षेत्रासाठीही त्यांनी विशेष कार्य केले आहे. दैनंदिन जीवनातही भारतीय परंपरांचे पालन त्या करताना दिसतात. यशाबरोबरच मनुष्याच्या अंगी संस्कार, विनम्रता, कौटुंबिक कर्तव्य किती महत्त्वाचे आहेत, हे नूयी यांच्या उदाहरणावरून कळून येते. फोर्ब्स मासिकाच्या जगातील १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत इंदिरा नूयी यांना २००८ साली १३ व्या क्रमांकावर स्थान मिळाले होते. फॉर्चुन मॅगेझिनने त्यांना २००६ सालच्या सर्वात शक्तिशाली महिला व्यावसायिक जाहीर केले होते. भारत सरकारनेही २००७ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!