कष्टाळू धुमाळ

कष्टाळू धुमाळ

धार्मिक व प्रेमळ आजी : ‘आई’

माझे आजोबा जितके कष्टाळू होते, तितकीच माझी आजीही अंगभूत शहाणपण असलेली धार्मिक व प्रेमळ होती. आजीचे नाव गीताबाई, परंतु तिला सगळे आईच म्हणायचे. आम्हीही आजीला कधी आज्जी म्हटलं नाही, वडिलांची आणि आमचीही ती आईच होती. धार्मिक वृत्तीची असल्याने देव देव करण्यात तिला अधिक रस असायचा, उपासतापास करण्यात गावात तिचा हात कोणी धरत नसे. तिच्यासाठी प्रत्येक वाराचा एक देव असायचा व त्याच्यासाठी ती उपवास करायची. सोमवार महादेवाचा, मंगळवार अंबाबाईचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार महालक्ष्मीचा, शनिवार मारुतीरायाचा व रविवार खंडोबाचा. एवढे कमी म्हणून की काय महिन्यातील दोन एकादशी, पौर्णिमेचा उपवासही ठरलेला. चातुर्मासात तर चारही महिने ती एक वेळच जेवण करायची, धार्मिक वृत्तीची असलेली आजी खूप मायाव्लू होती. नातवंडे म्हणजे तर तिच्यासाठी दुधावरची साय. आम्हा नातवंडांच कोडकौतुक करताना ती खूप आनंदी असे. आमच्या खोड्यांमुळे, व्रात्यपणामुळे आईने कधी आम्हा भावंडांना धपाटे दिले असतील. पण आजीने कधीही आम्हाला मार दिला नाही, आमच्या चुका पदरात घेऊन ती अतिशय मायेने समजावून सांगायची. तिने केलेले संस्कार आजही स्मरणात आहेत. मला धार्मिकतेची गोडी लावण्यात सर्वांत जास्त हात कोणाचा असेल तर आजीचा. मी पाच-सहा वर्षांचा असेन. त्या वेळी आजी मला रोज संध्याकाळी गावातील महादेव मंदिरात हरिपाठाला घेऊन जयची. आजोबांनी मला कामात राम आहे ही शिकवण दिली, तर आजीनी श्रद्धेला किती महत्त्व असते हे मनावर बिंबविले, लहान वयात मला इतर लहान मुलांप्रमाणेच गोडधोड, तेलकट खायला खूप आवडायचे. आजी आम्हा नातवंडांना म्हणायची, “जो सोमवारचा उपवास करेल, त्याला संध्याकाळी उपवास सोडताना तेलच्या व गुळवणी (पुरी व गुळाचे पाणी) खायला देणार.” मला गोड खायची खूपच आवड असल्याने मी आवर्जून सोमवारची वाट पाहायचो व त्यादिवशी उपवास करायचो. त्या वेळी माझे वय दहा एक वर्षांचे असेल. त्या वयापासून सोमवारचा उपवास करण्याची सवय मला लागली, ती आज ५०-५५ वर्षे झाली तरी कायम आहे. चुकूनही सोमवारचा हा उपवास मोडला नाही. ही खरे तर त्या शंभू महादेवाचीच कृपा म्हणावी लागेल.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!