कष्टाळू धुमाळ
देवाकडे सद्बुद्धी माग….
आजीमुळे धार्मिकतेची मला खूप गोडी लागली. मी इयत्ता पाचवी ते अकरावीपर्यंत दर सोमवारी गावातील महादेवाला पायी जाऊन पाणी घालत असे. सकाळी सूर्योदयावेळी अनवाणी व उघड्या अंगाने नदीवर जायचे व थंड पाण्याने अंघोळ करायची. सूर्यदेवतेला अर्घ्य देऊन ओल्या अंगानेच महादेवाच्या मंदिरात जायचे. जाताना झाडावरील बेलाची पाने काढायची, मंदिरात गेल्यावर चंदनाचे गंध उगाळायचे. महादेवासह गावातील सर्व देवांना पाणी घालायचे, गंध लावून बेलफूल वाहायचे व नमस्कार करायचा. असा दर सोमवारचा माझा दिनक्रम असायचा. मी मन लावून हा पूजापाठ करायचो. मनाला प्रसन्नता मिळायची. सोमवारचे देव देव आटोपल्यानंतर मग मी शाळेत जात असे. आजीने मला दर सोमवारी शिवलीलामृत, एकादशी माहात्म्य, गुरुवारी गुरुचरित्र व शनिवारी शनी माहात्म्य वाचायला लावले. चिमणीच्या (एक प्रकारचा दिवा) प्रकाशात आजीबरोबर बसून धार्मिक ग्रंथ वाचताना खूप सात्त्विक समाधान लाभायचे.
असेच एक दिवस मी सोमवारी सकाळी देवाला पाणी घालून घरी आलो. आजीने सहज मला विचारले, “तू देवाकडे काय मागितलंस?” मी सांगितले, “मी देवाला म्हणालो, मला परीक्षेत पास कर.” त्या वेळी आजीने मला जीवनातील एक मोठा धडा शिकविला. आजी म्हणाली, “तू देवाकडे जे मागितलंस, ते तुझ्या वयाच्या मानाने क्षणभर थोडंसं बरोबर आहे. उद्या वेळ व काळ बदलल्यावर तुझं मागणंही बदलणार. या वयात तू देवाकडे परीक्षेत पास होऊ दे हेच मागशील, मोठा झाल्यावर नोकरी, व्यवसाय, पैसा, गाडी, बंगला, सुंदर बायको, मुलं अशा एक ना अनेक गोष्टी तू मागतच राहशील. परंतु देव काही धनदौलतीचा व्यापार करीत नसतो. या गोष्टी मागण्याऐवजी तू एक गोष्ट देवाकडे कायम मागत जा, ती म्हणजे ‘सद्बुद्धी’. एकदा तुला सद्बुद्धी मिळली की, बाकीच्या इतर वेगवेगळ्या गोष्टी मागायची गरजच राहणार नाही. पण हो, एक लक्षात ठेव, बाळा, देवाजवळ सद्बुद्धी मागताना फक्त स्वतःपुरती मागू नकोस, तुझ्या अवतीभवती असलेल्या सर्वांनाच सद्बुद्धी मिळेल असं मागणं माग. कारण देवानं तुला एकट्यालाय सद्बुद्धी दिली व तुझ्या अवतीभवतीच्या लोकांना दुर्बुद्धी दिली तुला ते जगू देणार नाहीत. म्हणूनच तुझ्याबरोबर तुझ्या अवतीभवतीच्या लोकांनाही सद्बुद्धी माग, तुला सुना मनातलं सगळं काही मिळेल.”
जीवनाचे किती मोठे तत्वज्ञान माझ्या आजीने किती सहजसोप्या पद्धतीने मरय समजावले होते. आज मागे वळून पाहताना मला राहून राहून त्या गोष्टीचे अप्रूप वाटते. अंगठेबहादर असलेली माझी आजी, पण जीवनाध्या शाळेत ती किती उच्चशिक्षित होती. आजीने भगवद्गीता वाचली नसेल; परंतु ती भगवद्गीता जगत मात्र होती
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति।।
श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला ज्ञानाची महती सांगणारा श्लोक आजी आपल्या नाततांपुढे वेगळ्या शब्दांतून व्यक्त करीत होती. भावनेला तिने बुद्धीच्या वरचढ होऊ दिले नाही. निरक्षर असूनही ‘नीरक्षीर विवेक मात्र तिच्याकडे होता. देवाकडे काय मागितले म्हणजे सर्वच मनोकामना पूर्ण होतील, हे तिने मला अगदी लहान वयात सांगितले. ती गोष्ट आजही माझ्या मनावर कोरली गेलेली आहे. कभीशी देवापुढे हात जोडल्यावर, नतमस्तक झाल्यावर मला आजीचे ते शब्द आठवतात में आपसूकच मी देवाकडे माझ्यासाठी व माझ्या सभोवताली असलेल्या लोकांसाठी सद्बुद्धी मागतो. माझे प्रेरणास्रोत असलेले माझे आजोबा आवारसहेब घुमाळ पाटील हे ०७ जानेवारी १९७९ ला, तर आजी गीताबाई धुमाळ १९८७ साली असे दोमेही देवावरी गेले. जीवनाच्या ट्रॅकवरून माझी गाडी घसरू नये, म्हणून त्यांनी मला व्यवहारज्ञानाची जी शिदोरी दिली, त्या शिदोरीवरच मी आजपर्यंत जगत आलो आहे आणि उर्वरित आयुष्यातही जगणार आहे.
खरेच माणसाकडे सदबुद्धी असेल, तर त्याचे आचरण शुद्ध राहते. त्याच्या आजूबाजूला तशीच माणसे असली, तर सर्वच योग जुळून येतात. आपण कितीही सकारात्मक असलो आणि आपण ज्यांच्याबरोबरच रोज वावरतो, ज्यांच्या सहवासात असतो, त्यापैकी एखादा जरी नकारात्मक वृत्तीचा असेल, तर आपलाही उत्साह ढेपाळतो. त्याचा एक वेगळा विचार आपल्यावर नकारात्मक प्रभाव टाकतो. माझ्या आजीचे ते अनुभवाचे बोल किती खरे होते, याचा अनुभव मला जीवनात पदोपदी आला व आजही येत असतो.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
