कष्टाळू धुमाळ
आजीने मत्ता जीवनातील एक मोठा धडा शिकविला. आजी म्हणाली, तू
देवाकडे अनेक गोष्टी मागतच राहशील. या गोष्टी मागण्याऐवजी तू एक गोष्ट
देवाकडे कायम मागत जा, ती म्हणजे ‘सदबुद्धी’…”
असे म्हणतात की माणूस जगात कुठेही गेला, तरी त्याच्या मनात जन्मभूमीबद्दल एक ओलावा असतो. माझी जन्मभूमी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील… मराठवाडा म्हटले की सर्वात आधी आठवतो तो दुष्काळ… आर्थिक मागासलेपण… असे सगळे पाचवीला पुजले असलेल्या मराठवाड्यावर वरुणराजाची तशी नेहमीच अवकृपा… ग्रामीण भागाचे चलनवलन सर्वस्वी पावसावर अवलंबून… त्यामुळे वातावरणात कायमच एक प्रकारची उदासीनता… पण असे असले तरी इथल्या मातीत व माणसांत एक प्रकारचा गोडवा आहे. कणखरपणा आहे, अंगभूत हुशारी आहे… संकट कितीही गंभीर असले तरी त्याला खंबीरपणे सामोरे जाण्याची हिमत याच मातीत आहे. कवी गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांनी
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजूक देशा, कणखर देशा, फुलांच्याही देशा।।
असे महाराष्ट्रगीतामध्ये वर्णन केले आहे. कवी गोविदाग्रजांनी मराठवाडा पाहिला आहे, की नाही माहीत नाही; पण हे वर्णन मराठवाड्याला तंतोतंत लागू पडते. आता त्यात
कणखर देशा, नाजूक देशा, दुष्काळी देशा।
असा बदल करता येईल अशी स्थिती आहे. दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला आहे. माझे जन्मगाव हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा. मराठवाड्यातील कोणत्याही गावाप्रमाणे जिरायती गाव. एखादे जुने पितळेचे भांडे जसे काम नसल्यावर अडगळीत पडून राहते… तसेच या गावाचेही. पाऊस काळ नसला की, गावात एक प्रकारची शांतता. पितळेच्या भांड्याला जशी वर्षातून सणावाराला कल्हई करून चकचकीत केले जाते, तसेच आमच्याही गावाचे पावसाळ्यात होते. पाऊसमान बरा झाला की जमिनीबरोबरच ग्रामस्थांच्या मनातही हिरवेगार आशेचे अंकुर फुलायचे.. यंदा पावसाने कृपा करावी… घरातील पोरगी उजवून टाकू, पोरासोरांना यात्रेला कपडेलत्ते घेऊ असे बेत आखायचे व काळ्या मातीची सेवा करायची.. असा एकूण गावाचा बाज.
प्रशासकीयदृष्ट्या आमचे गाव बीड जिल्ह्यात असले तरी नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवर. त्यामुळे बीडपेक्षाही गावाचा संपर्क नगर जिल्ह्याशीच जास्त. अशा या गावात आमचे धुमाळ कुटुंब माझ्या वाडवडिलांपासून स्थायिक झालेले. आम्हाला लहानपणापासून सांगितले गेले की, आम्ही धुमाळ मंडळी मूळचे फलटण तालुक्यातील (सातारा) धुमाळवाडीचे. कधीतरी आमचे कोणी पूर्वज मांडव्यात आले व याच मातीशी एकरूप झाले. माझे आजोबा श्री. आबासाहेब धुमाळ हे त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक सुपुत्र. माझे वडील बाबूराव आबासाहेब धुमाळ हेही एकुलते एकच. अगदी एकटा जीव सदाशिव…
धुमाळ कुटुंबासाठी चरितार्थाचे एकमेव साधन म्हणजे शेती. काळ्या मातीत कष्ट करायचे, देवाचे नाव घेऊन
पेरणी करायची. निसर्गाच्या कृपेने जे पिकेल ते गोड मानून चार घास सुखाने खायचे. एकंदरीत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाप्रमाणे आमचे जीवन, अशा या पूर्ण सुखवस्तू नाही पण समाधानी कुटुंबात १३ सप्टेंबर १९५७ला माझा जन्म झाला, आईवडिलांना माझ्यासह एकूण पाच मुले झाली. आम्हाला बहीण नाही. माझी आजी खूपच धार्मिक होती. आजीला आम्ही ‘आई’ म्हणायचो व आईला ‘बाई’ म्हणायची. ग्रामीण भागात बहुतेक कुटुंबात वडिलांची आई असेल, तर नातवेही तिला आईच म्हणतात. त्यामुळं नातांची नावेही तिने देवांच्या नावाने ठेवली. यानिमित्त मुखात कायम देवाचे नाव राहील अशी तिची भोळीभावही भावना। पांडुरंग, भगवान, हनुमंत, विक्रम अशी माझ्या भावांची नावे… आणि माझे नाव नवनाथ, आम्हा पाच भार्याच्या रूपाने पाच पांडव नाही परंतु ३३ कोटी देवतांपैकी पाच देवतांच्या नावांचा उल्लेख आमच्या कुटुंबात प्रत्येकाच्या तोंडी व्हायचा. शिवाय जात्याच हृदयात ईश्वरभक्ती भरलेली असल्याने
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ति चारी साधियेल्या।
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।
या अभंगाप्रमाणे हरि अर्थात देवाचे नाव आपल्या तोंडून नित्य वदले जाईल, यासाठी त्यांनी आम्हा भावंडाची नावे तशी योजिली होती. कोणाच्याही नावाने हाक मारली, की मुखातून ‘हरिनाम’च वदले जाईल, असे माझ्या आजीचे पारमार्थिक व्यवस्थापन, ‘अक्षर’ आणि ‘साक्षर’ या दोहोंना छेद देणारी ‘निरक्षर’ नावाची संकल्पना तिने आपल्या सूक्ष्म ‘निरीक्षण’ शक्तीने त्या दोहोंपेक्षा वरचढ ठरविली एवढे मात्र खरे! माझ्या आजीने आम्हा भावंडाची नावे वैशिष्ट्यपूर्ण ठेवून तसेच दाखवून दिले आहे.
आमचे गाव मांडवा हे तसे अन्य गावांप्रमाणेच शांत, आपल्याच विश्वात रमलेले, देशाच्या नकाशावर ठळकपणे दिसणार नाही पण नकाशावर गावाचे नाव झळकविणारी माणसे घडविणारे हे गाव निश्चितच आहे. मांडव्य ऋषींनी हे गाव वसविले, अशी आख्यायिका सांगितली जाते. गावात शंभूमहादेवाचे हेमांडपंती शैलीतील पुरातन मंदिर, पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून ते प्रसिद्ध आहे. गावाच्या नावामुळे या महादेवाला मांडवेश्वरही म्हटले जाते. जुन्या काळापासून गावाला असा धार्मिक वारसा मिळालेला. त्यामुळे गावाला तसे नैतिक अधिष्ठान लाभलेले आहे. गावात श्रीखंडे व मुटकुळे आडनावाची घरे सर्वात जास्त होती. त्यांचा बारदानाही मोठा.
गावात धुमाळ आडनावाची दोनच घरे होती. त्यातील आमचे एक. कुटुंबावरही धार्मिक विचारांचा मोठा पगडा होता. त्याकाळी लग्न खूप लवकर करण्याची प्रथा होती. मुलगी थोडी कळती झाली की, तिच्या लग्नाचे पाहिले जायचे. परक्याची लेक आपल्या (तिच्या स्वतःच्या) घरात लवकर गेलेली बरी… असा साधासोपा विचार असायचा. माझ्या आईवडिलांचे लग्न झाले, तेव्हा वडील होते १५ ते १६ वर्षांचे, तर आई ९-१० वर्षांची असेल. लग्न झाल्यावर जवळपास १५ वर्षे आईला मूलबाळ झाले नाही. लग्नाला इतकी वर्षे होऊनही मूलबाळ नसल्याने त्या काळात आईला खूप सासुरवासही सहन करावा लागला. अशावेळी फुकटचे सल्ले देणारे तोंडाला येईल ते बोलतात, घालूनपाडून बिचाऱ्या बाईलाच दोष लावतात. माझ्या आईला मूलबाळ नसल्याने अनेकांनी आजोबांना सल्ला दिला की, लेकाचे दुसरे लग्न लावून द्या. आजोबा पारंपरिक विचारांचे असले, तरी याबाबतीत त्यांनी माझ्या आईची पाठराखणच केली. केवळ मूल होत नाही म्हणून घरातील लक्ष्मीचा असा दुस्वास करणे त्यांना पसंत नव्हते. ‘देव न मानणे म्हणजे पुरोगामीपणा, उच्छृंखल वागणे म्हणजे पुरोगामीपणा, परमार्थ नाकारणे म्हणजे पुरोगामीपणा’ असे स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या काही जणांनी पुरोगामीपणाचे जे अवडंबर माजविले आहे, त्याला छेद देणारा माझ्या आजोबांचा हा पुरोगामीपणा, पारमार्थिक जीवन जगतही पुरोगामी राहता येते, हे त्यांनी माझ्या आईच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाने दाखवून दिले. त्या काळात आजोबांचे असे पुढारलेले विचार व ठाम मत असल्याने माझ्या वडिलांचे दुसरे लग्न झाले नाही. पण मूलबाळ होत नसल्याने आई स्वतःही कासावीस होती. अखेर तिने मूल होण्यासाठी देवाला शरण जाण्याचे ठरविले. तिने गावाचे ग्रामदैवत मांडवेश्वरावर श्रद्धा
ठेवून सोल्ला सोमवारचे व्रत केले. तिच्या व्रताची ताकद म्हणा किंवा धुमाळ परिवाराची धार्मिकता, पूर्णांची पुण्याई म्हणा शंभू महादेवाच्या कृपेने आईची कूर उजवली. आईला मूल झाले, तोही पहिला मुलगाव झाला. सगळा परिवार आनंदी झाला, नवसाने झालेला पहिलाना मुलगा असल्याने त्याचे प्रचंड हाड झाले, माझी आई सांगायची की, पहिल्या मुलाचे म्हणजे माझ्या गोरल्या बंधूचे इतके लाड झाले की, ते पाच वर्षांचे होईपर्यंत त्यांच्या जवळ कायम गोड शिऱ्याचा डबा असायचा. आईची पुढे आणखी चार वाळंतपणे झाली व चारही वेळा मुलेच झाली. धुमाळ परिवारात गोकुळ अवतरले. आजोबा, आजीना याचा खूप आनंद असायचा… चेहऱ्यावर एक प्रकारचे प्रापंचिक सार्थकतेचे समाधान असायचे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
