गरुडझेप

गरुडझेप

माझा मराठाचि बोलु कौतुके।

परि ते अमृतातेही पैजा जिंके।

ऐसे अक्षरे रसिके।

मेळवीन ।।

या श्री ज्ञानोबा माउलींच्या ओळी जागवीत मी माझा हा लेखनयज्ञ मांडला आहे. माउलींनी म्हटल्याप्रमाणे अमृताशीही पैजा जिकणाऱ्या मराठी भाषेतून हा माझा यश आहे. अक्षरांना योग्य कोदणात बसविले, की अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्यातून वाक्य आणि त्या वाक्यांतून पानेंच्या पाने तयार होऊन पुस्तकाची निर्मिती होते. मीही माझ्या अनुभवांची अक्षरजुळवणी करून व त्या अक्षरांना योग्य कोंदणात बसवून शब्दनिर्मिती व त्यातून पुस्तकाची निर्मिती केली आहे, ती आत्मचरित्राच्या माध्यमातून. याला आत्मकथन म्हटले, तरीही ते वावगे ठरणार नाही. यात आत्मप्रौढी नाही, आहे ते केवळ ‘मी कसा घडलो?’ याचे सविनय विवेचन ! यात आहे तो खाचखळग्यांतून केलेला जिद्दीचा प्रवास, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडित्ता तेलही गळे’ या म्हणीचे प्रत्यंतर आणून देण्यासाठी केलेला सायास अन् सुखाचे कण शोधण्यासाठी अनवाणी पायांनी दगडगोट्यांतून चालण्याचा केलेला कष्टाळू प्रयास ! सरस्वतीपूजनापासून सुरू झालेली ही माझी वारी लक्ष्मीच्या पंढरीला येऊन पोहचली. तीच वारी मी या ग्रंथात शब्दबद्ध केली आहे.

मी लहानपणापासून शिवोपासक! अर्थात महादेवाचा उपासक किंवा भक्त! ‘ॐ नमः शिवाय’ हा माझा मंत्र नि ‘हर हर महादेव’ हे माझे गान! ‘ज्ञानोबा माउली’ अन् ‘तुकोबा साउली’ हे घरचे उपचारी अन् संस्कारी वातावरण! या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. आजीआजोबांची ‘प्रेमळछाया’, आणि आई-वडिलांची ‘आभाळमाया’ अशा ‘छायाळू’ आणि ‘मायाळू’ छत्राखाली बालपण आणि काही अंशी तरुणपण गेले. मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातले ‘मांडवा’ हे माझे जन्मगाव. गेली अनेक दशके मराठवाड्याने दुष्काळाशी विवाह केला नि काडीमोड न घेता त्या दोघांचा संसार आतापर्यंत अव्याहतपणे सुखनैव चालू आहे. मराठवाड्यातील माणसे म्हणजे या संसारवेलीवर आलेली फुलेच! न खचता, न डगमगता या फुलांनी मकरंद (मध) देण्याचेच काम केले आहे. त्यामुळे परिस्थितीशी टक्कर देणारा आमचा कणा अन् खंबीरपणाने जगणे हा आमचा बाणा हे अद्वैत आहे. अन् ही बावच माझे जीवन यशस्वी करणारे गमक असावे. जीवनात सारेच यशस्वी होतात असे नाही; परंतु जे जिद्दीने धावतात, ते ‘भोज्या’ पर्यंत पोहचतात एवढे मात्र निश्चित! आमचे मांडवा गाव म्हणजे खेडेच! गावात त्या काळी तसे शैक्षणिक वातावरण नव्हते, जसे ते शहरात असते. पण कसलीच खंत बाळगली नाही. ‘आम्ही किंवा आमचे अपत्य शिकले नसले, तरी आपल्या नात्तवांनी शिकून खूप मोठे व्हावे’ अशी आजोबांची खूप इच्छा व तळमळ. ती तळमळ त्यांच्या बोलण्यातून वारंवार व्यक्त व्हायची. आजीही निरक्षर! परंतु साक्षरतेचे ‘महत्त्व’ आणि शिक्षणातले ‘सत्त्व’ ती चांगलीच जाणून होती. शाळा किंवा विद्यालय हे शब्दच ज्या काळात प्रचलित नव्हते, त्या काळात आपेगावच्या वाळीत टाकलेल्या संन्याशाचा मुलगा ‘ज्ञानोबा’ होऊन
भगवद्वे ज्ञान सर्वसामान्यांना प्राकृतातून देतो, अन् देहूचा कुणी ‘तुकोबा’ होऊन अभंगांतून, कीर्तनांतून भतिज्ञानाचा आध्यात्मिक व्यापार करती, हे आजी आजोबा ओळखून होते. त्यामुळेच आपल्या नातवांनी शिकाये, शोधाचे, असे त्यांना वाटायचे, आमच्या पाच भावंडांत मोठ्या प्रमाणात माझाच कल शिकण्याकडे, ज्ञानप्राप्तीकडे होता आणि मी ज्ञान

मिळवीत गेलो. आपल्या नातवाने शिकूनरवरून मोठा साहेब वहावे आणि जीपमध्ये बसून गावाला येऊन ते विषड आपल्या घरासमोर उभे करावे, हा आजोबांचा सरधोपट विचार, खूप शिकल्यानंतर असे होऊ शकते, ही रुपयांची मनोमन खात्री त्यांचे विचार काहीही असोत, परंतु त्या विचारांतून चांगल्या शिक्षणाचे वीजारोपण माझ्या मनामध्ये झाले एवढे मात्र खरे. त्या बीजांना अंकुर फुटल्यानंतर मी त्यांना खतपाणी घातले, कोळपणी व खुरपणी करून ज्ञानाचे व धनाचे वे भरघोस पीक घेतले, ते पुढे विविध प्रसंगांतून दिसून येणारच आहे. सातवीपर्यंतचे शिक्षण मांडया येथे, दहावीपर्यंतचे कडा येथे व उच्च शिक्षण औरंगाबाद येथे झाले मांडवा, कहा, औरंगाबाद हा माझ्या शिक्षणाचा त्रिकोण। त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज ही १८० अंश असते’ हे शाळेत सिद्ध करून दाखविलेले प्रमेय मी तीन शैक्षणिक गावांद्वारे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले. ‘यश’ हे त्या प्रमेयाचे अपत्य। महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘स्टेट बैंक ऑफ इंडिया’मध्ये मिळालेली नोकरी ही सरस्वतीआराधनेच्या प्रसादातून माझ्या जीवनात ‘लक्ष्मी’ने टाकलेले पहिले पाऊल ठरले, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. पुढे सुनंदाशी विवाह केल्यावर माझ्या घरी ‘भाग्यलक्ष्मी’चे पहिले पाऊल पडले. ‘लक्ष्मी नि भाग्यलक्ष्मीची’ पावले पुढे बाढत जाऊन त्यांचे ‘महालक्ष्मी’त रूपांतर झाले. ते कसे होत गेले, हे सारे पुढे विविध घटनांतून येणारच आहे. दरम्यान पैसा मोठ्या प्रमाणावर कमवावा, त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी हरकत नाही, ही माझी मानसिकता प्रबळ होत गेली. केवळ बँकेतील नोकरीने आणि त्यातून मिळणाऱ्या पगाराद्वारे ‘खाऊन पिऊन सुखी’ इतकीच संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकते, हे मला ठाऊक होते, परंतु इतकेच मला मान्य नव्हते. स्वप्ने पाहायची तर मोठीच ही माझी मानसिकता विकसित झाली होती. त्यामुळेच तर ‘पुढे आणिक मेळवावे’ हे मला वाटत होते. त्यातूनच मग नवनवी क्षितिजे मला खुणावू लागली. धडपड कर, अहोरात्र श्रम कर, ‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’ हे तुला जमू शकते, तो तुझा स्वभाव आहे, असे माझे मन मलाच म्हणू लागले. त्यातून मग विमा’ नावाचे आणखी एक बीज माझ्या मनात अंकुरले जाऊ लागले. त्या बीजातूनच ‘पिअरलेस’ नावाचे रोपटे तयार झाले. स्टेट बँकेची नोकरी करीत करीत पिअरलेस या विमाकंपनीचे काम करू लागल्याने हाती आणखी जास्तीचा पैसा खेळू लागला. विम्याच्या कमाईतूनच पुढे मी आजोबांच्या डोळ्यांपुढेच मांडवा येथील घरासमोर ‘जिपर्ड’ नेऊन उभे केले. त्या वेळचे आजीआजोबा आणि आईवडिलांच्या डोळ्यांतील कृतार्थतेचे भाव शब्दांत व्यक्त करता येण्यासारखे नाहीत. शब्द मुके ठरले.

आपण मनुष्यजन्माला आलो आहोत, तर काही तरी वेगळे करायला हवे, असे माझे मन मला नेहमीच सांगत आले आहे. तेव्हा मग श्री ज्ञानेश्वर माउलींचे शब्द, विचार आठवतात.

मोलाचे आयुष्य दवडितोसि वायां ।

माध्यान्हीची छाया जाय वेगीं ॥

अत्यंत मोलाचे असे हे आयुष्य काहीजण निरर्थक गोष्टीत फुकट घालवितात. माध्यान्हसमयी जशी छाया नाहीशी होते, तशी ही त्यांची काया केव्हाही नाहीशी होणारी असते.

मनुष्य ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ठ निर्मिती आहे. आपण सर्वांनीच एका बाबतीत स्वतःला भाग्यवान समजायला पाहिजे. आपल्याला मनुष्यजन्म मिळाला यासारखे दुसरे भाग्य असूच शकत नाही. साधुसंत सांगतात त्याप्रमाणे मनुष्यजन्म मिळण्यासाठी ८४ लक्ष योनीतून प्रवास करावा लागतो. त्यानंतरच मनुष्य जन्म मिळतो. नाही तर किड्यामुंग्यांसारखा, जनावरांसारखा जन्म मिळतो. देवाने केवळ आपल्याला मनुष्यजन्मच दिला नाही, तर शरीराने
भरभाकरही बनविले आहे. कारण आजच्या विज्ञानयुगारी अशात जवळपास ३ ते ५ टक्के मुले जन्मतःच अर्थणत्वाचे दुःख घेऊन येतात, ही सगळी त्या अज्ञात शफीची लोला असते. अशावेळी परमेश्वराने आपल्याला भांगले स्वास्थ्य, मजबूत हातपाय, डोळे, कान, मेंदू व एकमेवाद्वितीय तीक्ष्ण बुद्धी अशी अनमोल संपत्ती दिलेली आहे. आता एवढे सगळे असल्यावर आणखी देवाकडे काय मागितले पाहिजे? त्याने दिलेल्या या संपत्तीची व्यवस्थित निगा राखत चांगले, मशस्वी व समाधानी जीवन जगणे एवढे तर आपण निश्चितच करू शकतो. आपल्या संतांनी सांगितले आहे की, ‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’, मी त्यावर म्हणेन की, ‘मरावे नाही तर जगावे परि कीतीरूपे’ असे होय. मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी आपण काहाने, प्रामाणिकपणे, जिद्दीने उत्कर्ष साधला पाहिजे. आपल्यासोबत आणखी चार लोकांचे भले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अपयशाची तमा न बाळगता जागेपणी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याचा ध्यास आपण घेतला पाहिजे.

मी स्वतःला तर खूप भाग्यवान समजतो. कारण माझा जन्म अशा देशात झाल्ा, जो जगासाठी मार्गदर्शक आहे. विविधतेने नटलेल्प आणि तितकाच एकोप्याने बांधलेला हा देश. या देशातही महाराष्ट्रासारखे राज्य. ज्याच्या नावातच महानता आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवासारख्या एका छोट्या पण तितक्याच समाधानी वृत्तीच्या, देवभोळ्या लोकांचा वावर असलेल्या गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत माझे जग गावाच्या ७ किलोमीटरच्या त्रिज्येत होते. एस. टी. पाहिली होती, पण तिच्यात कधीच बसलो नव्हतो, नंतरच्या आयुष्यात मी आतापर्यंत अर्धे जग फिरून आलो. त्या त्या देशातील संस्कृती, समाजजीवन जवळून अनुभवले, तिथली भौतिक प्रगतीही पाहिली. पण हे सर्व पाहिल्यावर मल्ा आपल्या देशाबद्दल कधीच नकारात्मक वाटले नाही. उलट तिथली एकूण परिस्थिती पाहिल्यावर आपला भारत देश जगात सर्वश्रेष्ठ का आहे हे कळले. भारतातही अनेक राज्यांत प्रवास केला. त्यावरून महाराष्ट्र हे सवर्वोत्तम राज्य का आहे, हे मला उमजले. अशा या पावन भूमीत माझा जन्म झाला.

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला यश हवे असते, अपयश कोणालाच नको असते. तरीही ८० टक्के लोक सर्वसाधारण जीवन जगतात व २० टक्के लोक यशस्वी होतात. माझ्या मते यश कोणाही ऐऱ्यागैऱ्याला मिळत नाही, ते ज्यांना हवे असते त्यांनाच मिळते. म्हणतात ना! आत्म्याची ग्वाही त्रिभुवनात नाही. आंतरात्म्याने ठरविले तर नक्कीच यश मिळते; परंतु त्यासाठी यशाची व्याख्या समजणे गरजेचे असते. विचारवंतांनी यशाची व्याख्या चार भागांत सांगितली आहे. ती म्हणजे ‘कौटुंबिक, शारीरिक, व्यावसायिक व सामाजिक’ अशी यशस्विता होय, कौटुंबिक यशस्विता म्हणजे जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आपण ज्या वेगवेगळ्या भूमिका जगतो, त्या यशस्वी निभावणे, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, वडील, आई, आजी, आजोबा इत्यादी. तुम्ही जी भूमिका निभावता ती नंबर एकची निभावली, तरच तिला कौटुंबिक यशस्विता म्हणता येईल. शारीरिक यशस्विता म्हणजे उत्तम आरोग्य निर्माण करणे व सांभाळणे होय. आपण जो व्यवसाय-नोकरी, शेती, समाजकारण, राजकारण, धर्मकारण करतो, त्यामध्ये सवर्वोत्तम यश मिळविणे म्हणजे व्यावसायिक यशस्विता. शेवटची यशस्विता म्हणजे सामाजिक यशस्विता, जन्मभर आपण जे कार्य करतो, ते समाजाच्या हिताचे असेल, त्यालाच सामाजिक यशस्विता म्हणतात.

यश मिळविणे म्हणजे फक्त पैसा कमावणे अशी मानसिकता असलेले ९७ टक्के लोक फक्त पैशाच्या मागे धावतात; परंतु पैसा हा उरलेल्या तीन टक्के लोकांच्या मागे धावत असतो. अन् हेच आजच्या युगातील वैश्विक सत्य आहे. या तीन टक्के लोकांकडे पैसा धावण्याचे मुख्य कारण म्हणजे ते फक्त पैसा कमावण्यासाठी काम करीत नाहीत; तर ते आपल्या ध्येयाकडे, कार्याकडे एक ‘पेंशन’ म्हणून पाहत असतात. त्यामुळेच पैसा त्यांच्याकडे पळतो, हा माझा स्वानुभव आहे.

जन्माने मी शेतकरी होतो, पण लहान वयातच आजोबांनी, ‘तू मोठा झाल्यावर शेतकरी न होता शिक्षण घेऊन मोठा नोकरदार हो।’ असे सांगितले होते. सायकलही नसलेल्या घरात एक जिपडं (जीप) आणण्याचे मोठे
स्वप्न त्यांनी दाखविले. त्यामुळेच भी एमएससी, एलएलबी करून भारतीय स्टेट बँकेत १३ वर्षे नोकरी केली व नोकरीचा राजीनामा देऊन व्यवसायात आलो व व्यवसायातूनच फार मोठे यश मिळवू शकलो. त्यामुळेच स्वतः समृद्ध होऊन इतरांनाही समृद्धीचा मार्ग दाखवीत करता येईल तेवढे समाजकार्यही करू शकलो. तसेच तरुणांना ५ लाख रुपयांची यशस्वितेची पुस्तके भेट देऊ शकलो.

पुस्तकाच्या निमित्ताने मी ‘वशस्विता नेमकी काय असते’ हे माझ्या अनुभवातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यशस्वी होणे म्हणजे काही मोठी गोह नसते. यशस्वी होतानाचा आपला प्रवास व त्यात आलेले अनुभव ही खरी आयुष्याची कमाई असते, शिदोरी असते. ‘बही सोच, कड़ी मेहनत और पक्का इरादा’ आणि ‘यशस्विता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’ या विचाराने व कृतीने मला अफाट यश मिळाले, असेच मला वाटतं.

आज भी वयाच्या ६५ वर्षात पदार्पण करताना हे पुस्तक म्हणजे माझ्या अनुभवाची शिदोरी तुमच्या हाती देत आहे. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा एका प्रसंगाने मिळाली. मी गेल्या दोन दशकांपासून अनेक शाळा, महाविद्यालयांत व्याख्यानासाठी जातो. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनी मला झेंडावंदनासाठी निमंत्रित केले जाते. २६ जानेवारी २०२० हा मला अहमदनगरमधील हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित करण्यात आले. मी शाळेत गेलो, तिथे मला सांगण्यात आले की, या शाळेत बहुतांश मुले ही अतिशय गोरगरीब आहेत. कष्टकरी वर्गातील आहेत. त्या मुलांना पाहून मला माझे बालपण आठवले, मौसुद्धा एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातीलच होतो. माझ्या सुदैवाने मला शिक्षणाचे महत्त्व लवकर कळले, घरातूनही पाठबळ मिळाले होते. मी माझे हेच अनुभवाचे बोल उपस्थित मुलांसमोर मांडले. माझ्या वडिलांनी केवळ टांग्याचे आठ आणे वाचविण्यासाठी ज्वारीचे पोते डोक्यावर घेऊन दोन किलोमीटर केलेली पायपीट मी सांगितली. मुले अक्षरशः तल्लीन होऊन माझे भाषण ऐकत होती. मी समारोप करीत असताना टाळ्यांचा कडकडाट झाला. मुलांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. कार्यक्रमानंतर चहापानासाठी मी शाळेतील शिक्षकांच्या खोलीत गेलो. तिथे काही महिला शिक्षक होत्या. त्यांनी सांगितले, “तुमचं भाषण ऐकताना आमचे अश्रू थांबत नव्हते. मुलंही भाषण ऐकताना इतकी तल्लीन झाल्याचे आम्ही पहिल्यांदाच पाहिलं. घुमाळसाहेब, तुमच्याकडे अनुभवाचे, विचारांचं अनमोल असं धन आहे. उद्या तुम्ही आम्ही सगळेच जगाचा निरोप घेणार आहोत. पण तुमच्याकडचं हे धन शब्दरूपाने लोकांसमोर कायम राहील हे तुम्ही पहा. यासाठी तुम्ही पुस्तक लिहा. त्यापासून पुढच्या अनेक पिड्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल.” त्या शिक्षिकांचा हा सूचनावजा यथार्थ सल्ला ऐकल्यावर मीसुद्धा गांभीर्याने विचार केला. आज मी जिवंत आहे, तोपर्यंत मी लोकांशी बोलू शकतो, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना चांगले विचार देऊ शकतो. पण भविष्यात कधी तरी मलाही जावेच लागेल. त्यानंतर माझे विचार पुस्तकरूपाने नक्कीच जिवंत राहतील. माझ्या मनात ठिणगीच पेटली.

नोकरी चालू ठेवून विमाक्षेत्रात उतरण्याचा माझा उद्देश पैसे कमावण्याचा तर होताच, शिवाय त्याला शेतकऱ्यांच्या दुःखाची किनारही होती. दुष्काळ, नापीक, अतिवृष्टी यामुळे पिचलेला शेतकरी माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला, की त्यांच्या अंधारलेल्या मनात आपण जर छोटासा दीप लावता आला, तर किती बरे होईल? आपल्या दिव्यामुळे कदाचित झगमगाट होणार नसेल, पण प्रकाशाचा एखादा कवडसा त्यांच्या थिजलेल्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात निश्चितच घर करेल, हाही एक उद्देश विमाक्षेत्रात उतरण्याचा होता.

पुढे चालून स्टेट बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला. ‘पिअरलेस’ पासून बाजूला झालो नि माझा स्वतंत्र विमा व्यवसाय सुरू केला. सरकारच्या विम्याच्या योजना लोकांपर्यंत विशेषतः शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा व त्यांना विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मी स्वतंत्र अशी माझी ‘लाईफ लाईन’ नावाची कंपनी सुरू केली. त्यातून माझ्या हाती बख्खळ पैसा खेळू लागला. त्यातूनच मग माझ्या उद्योगाची क्षेत्रे विस्तारू लागली. हे सारे घडत गेले ते माझ्या जिज्ञासू वृत्तीमुळे, जिद्दीमुळे, धाडसामुळे व शंभूमहादेवाच्या वरदहस्तामुळे. मी ‘आस्तिक’ असल्यामुळे
माझ्या कार्याला ईश्वरी अधिष्ठान किंवा पारमार्थिक पाठबळ नक्कीच असणार, ही श्रद्धा व धारणाही आहे.

केल्याने होत आहे रे। आधी केलेचि पाहिजे।

यत्न तो देव जाणावा। अंतरी धरिता बरे।

ही समर्थ रामदासांची उक्ती मी अंगीकारली आहे. शिवाय ‘आहे तितुके जतन करावे। पुढे आणिक मेळवावे।’ ही समर्थांचीच उक्ती मी जाणून आहे. या संतवंचनांना सामोरे ठेवून मी पावले टाकत गेलो आणि लक्ष्मी माझी ओंजळ भरत गेली. हवेत न तरंगता पाय जमिनीवरच राहवेत, याची मला जाणीव असल्यामुळे त्याबरहुकूम मी वाटचाल करीत राहिलो. मराठी माणसाला यशाची धुंदी त्वरित चढते. मी धुंदीपासून दूर राहण्यात धन्यता मानली. दरम्यानच्या काळात मित्रांकडून विश्वासाला तडा आणि आर्थिक फटका यातून मी ‘अखंड सावध असावे। दुश्चित कदापि नसावे।’ हे संतवचन लक्षात ठेवले. १९७२-७३ च्या दुष्काळात दुष्काळी कामावर जाणारा एक खेडवळ मुलगा पुढे चालून यशाची नवनवी क्षितिजे पार करून एक सफल उद्योजक बनला, याचे माझे मलाच आश्चर्य वाटते. माझ्या वाटचालीचे सिंहावलोकन केले असता, ‘तो मी नव्हेच!’ की ‘होय तो मीच!’ असा संभ्रम माझा मलाच पडतो. एके काळी नोकरी करणारा मी आता दुसऱ्यांना नोकऱ्या देत आहे. याला कसले परिवर्तन दुसऱ्याना म्हणायचे? आजीआजोबांकडून मिळालेले प्रोत्साहन, आईवडिलांची पोटतिडीक यामुळे मी घडत गेलो. पत्नी सौ. सुनंदाचे वेळोवेळी मिळणारे पाठबळ मला लाखमोलाचे ठरले. ‘मार उडी! तू समुद्र पोहून नक्कीच किनारा गाठशील’ अशीच धैर्य देण्याची तिची वृत्ती. ‘सुनंदा’ या शब्दाचा अर्थ ‘उमा’ अर्थात ‘पार्वती’ अन् मी महादेवाचा उपासक किवा भक्त. कदाचित त्यामुळेच पार्वतीला ‘जागेल’ आणि महादेवाला ‘साजेल’ असाच सौ. सुनंदाचा सहजधर्म. आणखी कोण कोण माझ्या जीवनाला आकार देण्यात साह्यभूत ठरले, ते विस्तारभयास्तव येथे देता येत नाही. ते सारे पुढे येणारच आहे.

‘यशस्विता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आणि तो मी मिळविणारच’ ही मनाशी खूणगाठ बांधून मी यशाची शिखरे पादाक्रांत करीत गेलो. त्या सर्व यशाचा, जिद्दीचा, कष्टाचा प्रवास मी या आत्मचरित्रात रेखाटला आहे. माझ्या संघर्षातून, ‘शून्यातून विश्व’ निर्माण करण्याच्या माझ्या वाटचालीमुळे अन्य होतकरू तरुणांना या पुस्तकातून प्रोत्साहन मिळेल, असे मला वाटते. या लेखनयज्ञातून तोच ‘प्रसाद’ मला अभिप्रेत आहे. माझ्या या पुस्तकातून लोकांनी प्रेरणा घ्यावी, अशी माझी इच्छा आहे; परंतु आग्रह नाही. जे प्रेरणा घेतील, तो त्यांचा मोठेपणा असेल आणि माझे सौभाग्य! काहीही झाले तरी पुस्तक लिहायचे, विचारधन लोकांना द्यायचे… आणि या भावनेतूनच हे पुस्तक वाचकांना समर्पित करीत आहे. हा एक विचार आहे यशोगाथेचा… माझ्यासारखे असंख्य ‘यशस्वी धुमाळ’ यातून निर्माण व्हावेत, ही शंभूमहादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन मनोकामना व्यक्त करतो.

हरऽऽहर महादेव !!

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!