कार्यारंभ करा, संघर्ष करा, श्रद्धा बाळगा…
प्रतिसेकंद एक लाख रुपये कमाई ‘अॅमेझॉन’ चे जेफ बेझोस
श्रीमंत होणे खूप कठीण काम असते, असे मानणाऱ्या लोकांसाठी जेफ बेझोस यांचे उदाहरण खूप बोलके आहे. बेझोस यांची आताची संपत्ती ही दोनशे अब्ज डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांत ती मोजायची म्हटली तर डोळे पांढरे होतील. बेझोस यांचा जन्म अमेरिकेत दि. १२ जानेवारी १९६४ रोजी झाला. जेफ यांनी इलेक्ट्रिकल व कॉम्युटर सायन्समध्ये पदवी मिळविली. ते वॉलस्ट्रीट कंपनीत नोकरीला लागले, परंतु त्यांचे मन नोकरीत रमत्त नव्हते. ते खूप मोठी स्वप्ने पाहायचे, अफाट वाचन करायचे. नावीन्याचा ध्यास असलेल्या जेफ यांनी नोकरी सोडून आईच्या सल्ल्याने स्वतःच्याच गॅरेजमध्ये एका कंपनीची स्थापना केली. तिचे नाव ठेवले ‘अॅमेझॉन’ या अमेरिकेतील सर्वात मोठ्या नदीवरून. अॅमेझॉन कंपनीही नदीप्रमाणेच विशाल बनावी, जगभरात पोहचावी, असे स्वप्न जेफ यांनी पाहिले. आईकडून एक लाख डॉलर इतके भांडवल घेऊन त्यांनी ऑनलाईन विक्री करणारी ही कंपनी स्थापन केली. अॅमेझॉन या कंपनीच्या लोगोतच त्यांनी ए टू झेड ला हायलाईट केले आहे. ही कंपनी तुम्हाला घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून हवी ती वस्तू उपलब्ध करून देते. तीन लोकांपासून सुरुवात झालेल्या या कंपनीत आजमितीस सुमारे पाच लाख लोक काम करतात. तुम्हीसुद्धा कधी ना कधी अमेझॉनवरून किमान एक तरी वस्तू मागविलेलीच असेल. ‘लो कॉस्ट अँड हाय डिमांड’ या तत्त्वावर ही कंपनी काम करते. जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत जेफ बेझोस हे बिल गेट्स यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी आहेत. इंटरनेटच्या मदतीने सर्वोत्तम मार्केटिंग, विश्वासार्ह सेवा देत अॅमेझॉनने अवघ्या वीस-पंचवीस वर्षांत जगात भरारी घेतलीय.
सुरुवातीला जेफ हे आपल्यासारखेच सामान्य होते. पण त्यांनी मोठे स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना आणली. प्रचंड मेहनत घेतली व आज सर्वात यशस्वी उद्योजक झाले आहेत. बेझोस आज सेकंदाला एक लाख रुपये कमावतात. आपण किमान सेकंदाला एक रुपया कमाविण्याचे तरी उद्दिष्ट ठेवून वाटचाल सुरू केली पाहिजे. नंतर हे उद्दिष्ट वाढवीत न्यायचे. ग्राहकांना काय पाहिजे, ते जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने कसे देता येईल, याचा विचार करून काम केल्यास तुम्हीसुद्धा यशस्वी उद्योजक होऊ शकता. असे उद्दिष्ट गाठण्याची कला व क्षमता ही फक्त उद्योजकातच असते. म्हणूनच जगात फक्त पाच टक्के उद्योजक आहेत. बाकीचे सगळे नोकरदार गटातील आहेत.
जेफ बेझोस यांच्या कामाचे एक सूत्र आहे ‘Day one…’ म्हणजे रोज असे काम करा की, जणू काही तो दिवस तुमच्या व्यवसायाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचा उत्साह, ऊर्जा कायम राहिली पाहिजे. ते म्हणतात, “तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून जितके शिकता, त्यापेक्षा जास्त आजीआजोबांकडून शिकता.” वयाच्या चार ते सोळा वर्षापर्यंत बेझोसही आपल्या आईवडिलांसमवेत उन्हातान्हात शेतात काम करायचा. त्यांनी लहान असतानाच सिमेंटने भरलेल्या टायर्सचा वापर करीत स्वयंचलित उघडणारे व बंद होणारे गेट तयार केले होते. टीन फॉईल छत्र्यांसह सौर कुकर बनविला होता. ग्राहकावर गरजेपेक्षा जास्त लक्ष द्या, कारण ग्राहक नेहमीच मनातून असमाधानी असतो. तो दिसताना समाधानी दिसत असला व आपला बिझनेस चांगला चालत असला, तरी ग्राहकाला सतत नवीन काही तरी देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
