♦ वेणुगोपाल धूत ♦
१९७८-७९ चा तो काळ… धाकटा भाऊ प्रदीपकुमार व सहकारी अभियंता नवीन मानधना यांनी धाडस केले, वेणुगोपालजींची साथ मिळाली… हाँगकाँगमधील एका नामवंत इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील व्यवस्थापकाचे आव्हान स्वीकारून अवघ्या ३६ तासांत दूरचित्रवाणी संच बनवला… पाठीवर शाबासकीची थाप व हातात ‘परवाना’ घेऊन घर गाठलं… अन् वडिलांनी परिवाराचे आशीर्वाद व दहा कोटी रुपयांसह भक्कम ताकद पाठीशी उभी केली… आणि… नगरच्या सहकार सभागृहाजवळच्या गंगापूर जिनिंग प्रेसच्या इमारतीत भारतातील पहिला ‘टीव्ही’ बनवण्याची धडपड सुरू झाली… आज नगर जिल्हा वा देशातच नव्हे, तर अवघ्या जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या ‘व्हिडिओकॉन’ उद्योगसमूहाची ही पायाभरणी. या धडपडीतील धाकटा भाऊ म्हणजे प्रदीपकुमार धूत व मोठा भाऊ म्हणजे इलेक्ट्रीक अभियंता असणारे वेणुगोपाल धूत. जगभरातील औद्योगिक विश्वात ‘व्हीएनडी’ म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व. आणि या दोघांच्या पाठीशी पहाडासारखे उभे असणारे वडील म्हणजे नगरचे प्रसिद्ध उद्योजक (कै.) नंदलालजी ऊर्फ काकासाहेब धूत. एकीकडे व्हिडिओकॉन उद्योगसमूहाच्या माध्यमातून विश्वाच्या औद्योगिक जगतात आघाडीवर येऊ पाहणारा व दुसरीकडे योगी वृत्तीने समाजाला आरोग्यासह अन्य
मूलभूत गरजांसाठी सढळ हाताने मदत करणारा हा धूत परिवार.
वारकरी संस्कारांचा वारसा –
गंगापूर (जि. औरंगाबाद) येथील धूत परिवार भुसार व किराणा व्यवसायाच्यानिमित्ताने नगरला आला अन् इथलाच होऊन गेला. गंगापूरला खासगी साखर कारखाना, तसेच किराणा व भुसार व्यापार असताना नगरलाही व्यापाराच्यानिमित्ताने आलेला हा परिवार. निराधारांना आधार देण्याचे वैष्णव संस्कार अंगीकारणाऱ्या या परिवाराने विनोबा भावेंच्या भूदान चळवळीला हजारो एकर जमीन दान करून साथ दिली. ‘व्हीएनडीं’चे आजोबा (कै.) माधवलाल धूत स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. खादी वेश परिधान करणे, तसेच पंढरपूरला त्यांचे नियमित जाणे असे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या धूत परिवाराने आपल्या आजवरच्या वाटचालीत ‘विश्वस्त’ ही संकल्पना प्रत्येक व्यवसायाचा व उपक्रमाचा ‘पाया’ मानली आहे. ज्या समाजात राहतो, व्यवसायाच्या रूपाने लौकिक व आर्थिक पाठबळ कमवतो, त्याच समाजासाठी त्यातील बहुतांश भाग देण्याची संन्यस्त वृत्ती पिढीजात जोपासणाऱ्या या परिवारातील वेणुगोपाल धूत आज देशातील नामवंत प्रमुख उद्योजकांमध्ये आहेत. वडील (कै.) काकासाहेब धूत व आई
श्रीमती केशरबाई यांच्या संस्कारांचा वारसा परिवारातील सर्व सदस्यांसह जपणारं शांत व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘व्हीएनडी’ एकीकडे व्यावसायिक उद्योजक व दुसरीकडे श्रीमद्भगवद्गीता व ज्ञानेश्वरीवरील अभ्यासपूर्ण विवेचन आणि विशेष वैशिष्ट्य म्हणजे सुरेल बासरीवादन करणारा सुहृद, असं अनोखं मिश्रण असलेले वेणुगोपाल धूत नवउद्योजकांसाठी दीपस्तंभ ठरले आहेत.
प्रगतीकडे वाटचाल –
श्री. धूत यांनी १९७५मध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली. नगरला त्या काळात छोटे-मोठे उद्योग होते. १९७२च्या दुष्काळात कोलमडलेली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत होती. याच काळात जपानमधील तोशिबा कंपनीत प्रशिक्षण घेऊन १९७८ मध्ये श्री. धूत नगरला आले. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची तेव्हा देशात सुरुवात होत होती. त्याच वेळी त्यांनी दूरचित्रवाणी संचांची निर्मिती करण्याचा निश्चय केला. हाँगकाँगमधील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगजगताशी संपर्क वाढवला. धाकटा भाऊ प्रदीपकुमार व मित्र नवीन मानधना यांची साथ लाभली. हाँगकाँगमधील एका कंपनीच्या व्यवस्थापकाने दूरचित्रवाणी संच तयार करण्याचे दिलेले आव्हान प्रदीपकुमार व नवीन मानधना यांनी अवघ्या ३६ तासांत पूर्ण केले अन् नगरमध्ये व्हिडिओकॉन उद्योगसमूहाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या पहिल्याच प्रयत्नाला चांगले यश आल्याने व नंतर सरकारने औरंगाबादला औद्योगिक सुविधा दिल्याने तेथे ‘व्हिडिओकॉन’चा विस्तार केला. दरम्यानच्या काळात ‘व्हिडिओकॉन’चा ब्रँड देशभर पोचला. प्रगतीच्या शिखराकडे एकेक पाऊल पडत असतानाच रंगीत दूरचित्रवाणी संचासाठी आवश्यक असलेल्या पिक्चर ट्यूबची निर्मिती करण्यासाठी श्री. धूत यांनी पुढाकार घेतला. भांडवलासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, म्हणून ‘पब्लिक इश्यू’ काढला. त्याला जनतेकडून प्रतिसाद मिळाला अन् भरुच (गुजरात) येथे १९८९मध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली. अल्पावधीत गतिमान प्रगती साधल्याबद्दल ‘व्हिडिओकॉन’ला त्यावेळी ‘एशियन पुरस्कार’ ही मिळाला. पुढे दूरचित्रवाणी संच, पिक्चर ट्यूब, संगणक व अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनात अग्रेसर असलेली थॉमसन ही कंपनी ‘व्हिडिओकॉन’ने अधिग्रहित केली. त्यामुळे व्हिडिओकॉन उद्योगसमूह खऱ्या अर्थाने भारतीय बहुराष्ट्रीय (इंडियन मल्टिनॅशनल) झाला.
वेदनेतून विकासाकडे –
धूत परिवार असा इलेक्ट्रॉनिक्स माध्यम जगतात लौकिक शिखराकडे जात असतानाच मोठा आघात झाला. २६ एप्रिल १९९३ रोजी औरंगाबाद येथे विमान दुर्घटनेत काकासाहेब धूत यांचे निधन झाले अन्
परिवार अगदी कोलमडून गेला. मात्र, या दुःखातून सावरून पुन्हा उभारी घेत व काकासाहेबांच्या संस्कारांनुसार वाटचाल करीत वेणुगोपाल धूत यांनी आपल्या बंधूंसह पुन्हा एकदा उद्योगजगतात झेप घेतली. १९९५मध्ये तेल व वायू क्षेत्रात प्रवेश केला. आज या प्रकल्पात रावा ऑइल फील्ड येथे रोज ५० हजार बॅरल इंधनाची निर्मिती होते. पुढे धूत परिवाराने करमणूक व मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध असलेली टाइम्स ग्रुपची ‘प्लॅनेट एम’ व्यवसाय साखळी चालवायला घेतली. आज इलेक्ट्रॉनिक्स जगतात प्रसिद्ध असलेल्या अकाई, सॅन्सुई, नॅशनल, मात्सुशिता, केनस्टार आदी ब्रँड्स आता व्हिडिओकॉनच्या मालकीचे झाले आहेत. त्याहीउपर भारतामध्ये तयार होत असलेल्या कोणत्याही कंपनीच्या दूरचित्रवाणी संचामधील पिक्चर ट्यूब ‘व्हिडिओकॉन’ मध्येच बनलेली असते, हे विशेष.
हजारो कोटींची उलाढाल –
तब्बल ३५ हजार कोटींची वार्षिक उलाढाल व १८ हजारांवर कुशल कामगार, असा मोठा लवाजमा असलेल्या ‘व्हिडिओकॉन’ने आता दोन मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. पहिला चेन्नई येथे साडेबारा हजार कोटींची गुंतवणूक करून औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, तर दुसरा नवी मुंबईत २३५ एकरांवर साडेबारा हजार कोटींची गुंतवणूक करून केवळ भारतातीलच नव्हे, तर आशिया खंडातील पहिला एलसीडी पिक्चर ट्यूब निर्मितीचा प्रकल्प. विशेष म्हणजे, नवी मुंबईतील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे तीन हजार जणांना प्रत्यक्ष, तर हजारो लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
श्री. धूत विद्युत अभियंता आहेत; मात्र कायदा, अर्थशास्त्र व पतपुरवठा या विषयांतही त्यांचे प्रभुत्व असून, उद्योगसमूहाचा दैनंदिन कारभारही तेच पाहतात. लहानपणापासूनच भगवद्गीता व ज्ञानेश्वरी मुखोद्गत असल्याने त्यातील विचारांचा श्री. धूत यांच्या आचारविचारांवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे व्यावसायिक जगतात राहूनही ‘कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेशु कदाचन’ अशी विचारधारा बाळगून वाटचाल करण्याची त्यांची शैली खरोखर वाखाणण्याजोगी आहे.
विशेषतः यश-अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानण्याचे, व्यावसायिक नीतिमत्ता व्यवसायाच्या जागी ठेवून व सामाजिक जीवनात भगवद्संस्कार रुजवण्याचे त्यांचे प्रयत्न प्रेरणादायी ठरतात. त्यांचे धाकटे बंधू खासदार
राजकुमार धूत राज्यसभा सदस्य असून, तिसरे बंधू प्रदीपकुमार हे बी. कॉम.. एमबीए असतानाही इलेक्ट्रॉनिक्स ड्रॉईंग, डिझाईन करण्यात व त्यांच्या उत्पादनात वाक्बगार आहेत. ‘व्हीएनडीं’च्या पत्नी रमादेवी धूत सामाजिक सेवेत कार्यरत आहेत. चिरंजीव अनिरुद्ध हे ‘व्हिडिओकॉन’ ने दोन वर्षांपूर्वी अधिग्रहित केलेल्या इलेक्ट्रोलक्स या कंपनीची जबाबदारी दिल्लीतून सांभाळत आहेत तर कन्या सुरभी हिने सासरी कोलकत्याच्या नामवंत बांगड परिवारात आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला आहे.
रंग माझा वेगळा
श्री. धूत यांच्या जीवनावर वडील (कै.) काकासाहेब धूत यांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. ‘पैसा कितीही मिळाला, तरी तो एक रुपयाने कमी पडतो व घर कितीही मोठे बांधले तरी एक खोली कमीच वाटू लागते. मानवी मनाची ही आस थांबणारी नसल्याने, सतत पळत राहण्यापेक्षा हळूवार चालत व सर्वांना बरोबर घेत प्रगती साधणे म्हणजे आश्वासक कृती,’ असे (कै.) काकासाहेबांचे सांगणे ते महत्त्वाचे मानतात. पुण्यात महाविद्यालयात असताना काकासाहेबांबरोबर श्री. धूत हे मामासाहेब दांडेकर यांच्याकडे जात असत. त्या वेळी काकासाहेब व मामासाहेब यांच्यात भगवद्गीता व ज्ञानेश्वरीवर चर्चा व्हायची. ही चर्चा कानावर पडल्याने जिज्ञासू वेणुगोपालजी भगवद्गीता व ज्ञानेश्वरीकडे आकर्षिले गेले. सखोल अभ्यास केला. त्यातील विचार त्यांच्या अधिपत्याखालील उद्योगजगतात आजही पाझरताना दिसतात. देश- विदेशातील उद्योगजगतात श्री. धूत अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. राजकीय हस्तक्षेप न करता लोकसंख्या नियंत्रण, तसेच शेतीमालाचे उत्पादन व विपणन व्यवस्था या उद्योगवाढीसाठी संजीवनी ठरू शकतात, अशी त्यांची धारणा आहे. त्यादृष्टीने भारतातही पावले उचलली जात असल्याचे समाधानही त्यांना आहे. रस्ते, पूल, रेल्वे, बंदरे व विमानतळ यांसारख्या दळणवळण क्षेत्रात अजूनही व्यापक प्रगतीला वाव असल्याचा त्यांचा दावा आहे; कारण कुशल मनुष्यबळ व उच्च बौद्धिकता या आजही भारताच्या जमेच्या बाजू असून, त्याच जोरावर संपूर्ण जगावर राज्य करण्याची धमक भारतात असल्याचे श्री. धूत आवर्जून सांगतात.
महाविद्यालयीन जीवनात वडील व प्राचार्यांनी दिलेले आव्हान पूर्ण करण्यासाठी बासरीवादन शिकलेले श्री. धूत उत्कृष्ट बासरीवादक असून, अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. उद्योग क्षेत्रात पडले नसते, तर त्यांचा धाडसी व सतत कार्यरत राहण्याचा स्वभाव पाहता, त्यांनी स्वतःच्या बासरीवादनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले असते. शिखर पादाक्रांत करणे सोपे; परंतु तेथे टिकून राहणे अवघड असते, ही त्यांची भूमिका नित्यनवे प्रयोग करण्यास, नवनवी माणसे जोडण्यास प्रोत्साहन देते. त्यामुळेच व्हिडिओकॉनचे यश सातत्यपूर्ण राहावे,यासाठी आवश्यक ते व्यावसायिक कौशल्य अंगीकारतानाच ‘हे सर्व परमात्मा आहे (सर्वं खतु इदं ब्रह्म)’ व ‘हे सर्व ईश्वरमय आहे (ईशावास्यमिदं सर्वम्)’ असे मानून ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंत्यात सान्या पाय माझा मोकळा’ हा अलिप्ततावाद ते जोपासतात. शालेय शिक्षणात मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून ‘भगवद्गीते’तील विचारांचे शिक्षण दिले, तर सुसंस्कृत, सुविचारी व देशाचे नेतृत्व करणारी पिढी निर्माण होईल, अशी त्यांची ठाम थारणा आहे. छप्पन्न वर्षांचं हे व्यक्तिमत्त्व आणखी नऊ वर्षे उद्योगजगतात रमणार आहे. त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या विकासासाठी स्वतःला झोकून देणार आहे. ‘सर्व माझे’, ‘सर्व मी केले’ असे मानणाऱ्या आजच्या जगात व विशेष म्हणजे उद्योजकतेमधील अशा व्यक्तिमत्त्वास सत्पुरुष व कॉर्पोरेट योगी म्हणणे वावगे ठरणार नाही

