◊ झहीर खान ◊
ऑस्ट्रेलियाचा जुना खेळाडू ब्रूस रीड हा गोलंदाजीच्या आगळ्यावेगळ्या शैलीने क्रिकेट रसिकांना मोहवून टाकायचा. उंचापुरा रीड डाव्या हातात चेंडू घेऊन धावताना पाहून समोरचा फलंदाज, हातात बॅट असली तरी अस्वस्थ असायचा; कारण त्याच्या चेंडूचा टप्पा खेळपट्टीवर पडल्यावर तो नैसर्गिकरित्या बाहेर जाताना कधी बॅटची कड घेऊन जाईल, याचा पत्ता लागत नसे. हमखास गडी बाद करणारा ब्रूस रीड क्रिकेट विश्वात तेव्हा लोकप्रिय होता. त्यामुळेच त्या काळात डाव्या हाताने गोलंदाजी करणारे अनेक खेळाडू निर्माण झाले. अर्थात त्यातही टिकून राहिले ते स्वकर्तृत्व व प्रयोगशीलता जपलेले मोजकेच खेळाडू, म्हणजे पाकिस्तानचा वसीम अक्रम, श्रीलंकेचा चमिंडा वास व भारताचा झहीर खान. आताच्या क्रिकेट विश्वात तर असे अनेक खेळाडू आले आहेत. भारतातच इरफान पठाण, आर. पी. सिंग, आशिष नेहरा, असे खेळाडू आहेत; पण जे ‘ग्लॅमर’ झहीरला मिळाले, ते इतरांच्या वाट्याला तसे कमी आले. अर्थात ‘ग्लॅमर’ मिळण्यासाठी झहीरने घेतलेले कष्ट व सतत जमिनीवर पाय ठेवून चालण्याची त्याची वृत्ती विसरून चालणार नाही. झहीरच्या गोलंदाजीचे विशेष म्हणजे तो जेव्हा डाव्या हाताच्या बोटांमध्ये चेंडू घेऊन वेगाने धावू लागतो, तेव्हा मॅथ्यू हेडन
(ऑस्ट्रेलिया), सनत जयसूर्या (श्रीलंका), सलमान बट्ट (पाकिस्तान), अँड्रयू स्ट्रॉस (इंग्लड), ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) अशा भल्या-भल्या सलामीवीर फलंदाजांना अस्वस्थ वाटू लागते. यष्ट्यांजवळ आल्यावर झहीर उडी घेतो व पाय जमिनीवर टाकता टाकता हातातील चेंडू भन्नाट वेगात फलंदाजाच्या दिशेने सोडतो, तेव्हा हातात बॅट असताना पायाच्या हालचाली होण्याच्या आत फलंदाजाची मधली किंवा उजवी यष्टी वाकलेली असते किंवा मग बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षक वा पहिल्या स्लिपमधील क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावलेला असतो. प्रतिस्पर्धी संघाचे सलामीचे फलंदाज बाद करायचे असतील वा एखादी जमलेली चिवट जोडी फोडायची असेल, तर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे व महेंद्रसिंग धोनी या भारतीय किक्रेट संघाच्या तत्कालीन कर्णधारांनी विश्वासाने झहीरकडे चेंडू सोपवला आणि त्यानेही संघालाच नव्हे, तर भारतीय क्रिकेट रसिकांनाही निराश केले नाही. गडी बाद करण्याची मोहीम त्याने नेहमीच फत्ते केली.
श्रीरामपूरच्या मातीत संघर्ष रुजला –
झहीरचे क्रिकेट विश्व खरे रुजले ते श्रीरामपूरच्या मातीत.
सोमय्या हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर दहावी व बारावीला त्याने चांगले गुण मिळवले. बारावीनंतर प्रवरानगरला अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे नक्की झाले होते; पण क्रिकेटचे वेड स्वस्थ बसू देत नव्हते. श्रीरामपूरच्या सवंगड्यांसमवेत संधी मिळेल तेथे डाव्या हाताने गोलंदाजी करण्याची हौस तो भागवून घेत असे. छायाचित्रकार असलेले वडील बख्तियार खान यांनी आपल्या या क्रिकेटवेड्या मुलाचे डाव्या हाताने वेगात गोलंदाजी करण्याचे वेगळेपण ओळखले होते. थोडे पैलू पाडले की हा हिरा निश्चित चमकेल, असा त्यांना विश्वास होता. फक्त त्यासाठी झहीरचे स्वतःचे १००% प्रयत्न हवेत, असे त्यांचे सांगणे होते. झहीरला त्यांनी प्रोत्साहन दिले. श्रीरामपूरसारख्या शहरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन नसले, तरी एकलव्यासारखे एकनिष्ठेने त्याने प्रयत्न सुरू ठेवले. रेव्हेन्यू क्रिकेट क्लबकडून खेळताना स्थानिक जिल्हा स्तरावरील क्रॉम्प्टन करंडक व अन्य स्पर्धांमध्ये श्रीरामपूर संघाकडून सहभाग घेतला. यश- अपयश झेलत ही वाटचाल सुरू असतानाच अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवड झाल्याने तो निराश झाला होता; पण वडिलांनी त्याला दिलासा दिला. झहीरचा मोठा भाऊ झिशान हाही अभियंता आहे. त्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दीड-दोन वर्षे तो उमेदवारी करत होता. नोकरीचा शोध घेत होता. त्यामुळे बख्तियार खान यांनी झहीरला सल्ला दिला. अभियांत्रिकीनंतर दोन वर्षे तुला नोकरीसाठी उमेदवारी करावी लागणार आहेच, तर ही दोन वर्षे तू आताच घे. या दोन वर्षांत क्रिकेटमध्ये करिअर करता आले तर कर, नाही तर अभियंता होऊन सरळ नोकरी करीत राहा. हे ‘आव्हान’ झहीरने स्वीकारले. झपाटल्यागत तो क्रिकेटच्या करिअरमागे लागला आणि जोरदार मेहनत व संघर्ष करत भारतीय क्रिकेट संघात दाखल होऊन आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्ती केली. गेल्या नऊ वर्षांपासून खेळणारा झहीर आज भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा गोलंदाज झाला आहे. आतापर्यंत २०० एकदिवसीय सामन्यांमध्ये २८२ व ८८ कसोटी सामन्यांमध्ये २९५ गडी बाद करून त्याने श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. जखमी झाल्यामुळे संघातून वगळले असताना जिद्दीने मेहनत करून त्याने झोकात पुनरागमन केले.
परिवारांचे पाठबळ –
झहीर खानचे वडील बख्तियार खान हे फोटोग्राफीच्या व्यवसायात होते, तर आई जाकिया खान या खटोड कन्या विद्यालयात पर्यवेक्षिका होत्या. श्रीरामपूरच्या कॉलेज रस्त्यावरील रेव्हेन्यू कॉलनीत राहणाऱ्या या परिवाराने धाडस करून अभियांत्रिकीसाठीची दोन वर्षे क्रिकेटसाठी देण्याची संधी झहीरला दिली. मुंबईला जाऊन नॅशनल क्रिकेट क्लबचे सुधीर नाईक यांचे मार्गदर्शन लाभल्याने झहीर घडला. मुंबई रणजी संघातील खेळाडूंसमवेत खेळताना त्याच्यात आत्मविश्वास आला. मुंबईचा रणजी संघ १९९६-९७च्या मोसमात मध्य प्रदेशविरुद्धचा
रणजी सामना खेळण्यासाठी इंदूरला गेला असताना सलील अंकोला हा गोलंदाज जखमी झाल्याने तत्कालीन कर्णधार संजय मांजरेकरने मुंबईहून झहीर खानला बोलावून घेतले. मुंबईच्या वृत्तपत्रांत तर त्या वेळी, ‘कोण हा झहीर खान’ असे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. त्या एका रात्रीत तो क्रिकेट विश्वाला परिचित झाला. इंदूरच्या त्या सामन्यात तो खेळला नाही; पण मुंबईच्या रणजी चमूत निवडला गेला. पुढच्या मोसमातही त्याला मुंबईकडून संधी मिळाली नाही; मात्र माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांनी त्याला बडोद्याकडून खेळण्याचे आमंत्रण दिले आणि तेथून त्याचे भाग्य उजळले. बडोद्याकडून खेळताना गोलंदाजीत चमक दाखवली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये भारताचा हा झगमगता तारा चमकू लागला.
अपयशातून यशाकडे –
भारतीय क्रिकेट संघात प्रवेश झाला आणि नोव्हेंबर २००० मध्ये ढाका येथे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याचे पदार्पण झाले व त्यानंतर नैरोबी येथे केनियाविरुद्धच्या सामन्याद्वारे त्याने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सहभाग घेतला. मध्यंतरी २००३ व २००४मध्ये जखमी असल्याने तो खेळू शकला नाही, तर खराब कामगिरीमुळे २००५ मध्ये त्याला वगळण्यात आले. मात्र, या धक्क्याने तो कोलमडला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्पर्धा लक्षात घेऊन त्याने प्रचंड मेहनत घेतली. एम.आर.एफ. पेस फाउंडेशनच्या माध्यमातून सराव केला. गोलंदाजीचा रन-अप थोडा कमी केला आणि नव्या जोषात गोलंदाजीचे हे वादळ घोंगावू लागले. कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेटबरोबरच आता नव्याने क्रिकेट रसिकांना भुरळ घालणाऱ्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्येही त्याने स्वतःची छाप पाडली आहे. परिणामकारक ‘स्विंगिंग यॉर्कर’ तसेच ‘इनस्विंग’ व ‘आऊटस्विंग’ या गोलंदाजीतील प्रभावी अस्त्रांसह फलंदाजांना बुचकळ्यात पाडणारा व त्याला हमखास चूक करायला लावून तंबूचा रस्ता दाखवणारा ‘स्लोअर वन’ त्याने आत्मसात केला.
ब्लास्टर फटकेबाज –
प्रमुख गोलंदाज असला, तरी चौकार-षटकार ठोकणाऱ्या फलंदाजीसाठीही तो प्रसिद्ध आहे. ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरसमवेत फलंदाजी करताना झहीरनेअकराव्या क्रमांकावर येऊन चक्क ७५ धावा ठोकल्या. बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात सचिन-झहीर या जोडीने शेवटच्या गड्यासाठी चक्क शतकी भागीदारी केली. कसोटी क्रिकेटमध्ये ११४५ व एकदिवसीय सामन्यात ७९२ धावा त्याने केल्या आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत १७ सामन्यांमध्ये १७ विकेट्स तसेच आयपीएल ट्वेंटी- २० स्पर्धेत ६३ सामन्यांमध्ये ७० विकेट्स ही त्याची कामगिरीही चांगलीच ठरली. २००३ मध्ये विश्वकरंडक स्पर्धेत सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अंतिम फेरीत पोचला. त्याचे बरेचसे श्रेय सचिन तेंडुलकरच्या घणाघाती फलंदाजीसह झहीर खानच्या भेदक गोलंदाजीलाही आहे. २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेतही त्याने सहभाग घेतला; पण भारतीय संघ प्राथमिक फेरीतच पराभूत झाल्याने झहीरला फारशी किमया दाखवता आली नाही. मात्र, त्यानंतर झालेल्या पहिल्या ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवून देण्यात व हा पहिला विश्वकरंडक देशाला मिळवून देण्यात त्याचाही मोठा सहभाग राहिला. जागतिक पातळीवर नामवंत मानला जाणारा ‘विस्डेन क्रिकेटर’ ही तो ठरला आहे. उत्तुंग षटकार व कडक चौकार ठोकण्याबरोबरच अचूक गोलंदाजीने फलंदाजांना जेरीस आणणारा झहीर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा असल्याचा अभिमान जिल्ह्यातील क्रीडारसिकांना आहे!

