चौफेर घोडदौड
‘एक ही सादे सब सादे’
अडचणीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, यावर तुमची वाटचाल अवलंबून असते. तुम्ही अडचणीकडेही सकारात्मक दृष्टीने पाहिले, तर तीच अडचण अगदी नगण्य ठरेल, अशक्यप्राय गोष्ट सहज शक्य वाटेल. त्यासाठी एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. ‘एक ही सादे सब सादे’. हे वाक्य मी कधी, कुठे ऐकले, ते आता माझ्या लक्षात नाही. पण मला ते खूप आवडले. या वाक्याचा अर्थबोध ज्याला होईल, तो अटकेपार झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही. आता अटकेपार म्हणजे काय, तर त्याचा संबंध आपल्या मराठ्यांच्या इतिहासाशी आहे. पेशव्यांनी मराठी दौलतीचा कारभार करताना आताच्या पाकिस्तानातल्या पलीकडे असलेल्या अटक नावाच्या गावापर्यंत आपला भगवा पोहचविला होता. दिल्लीच्या प्रचंड मोठ्या साम्राज्याचा सामना करीत मराठ्यांनी ही अलौकिक कामगिरी केली होती. त्यामुळे ‘अटकेपार झेंडा रोवला’ ही उक्ती प्रचलित झाली. तर ‘एक ही सादे सब सादे’ या उक्तीचा साधा सरळ अर्थ आहे की, एक साधले की बाकी सगळे साधते. आपण पाहतो क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांची बॅट मैदानावर तुफान चालली. पी. टी. उषा, उसेन बोल्ट यांचे पाय चालले नाहीत तर धावले, लता मंगेशकर यांचा कंठ चालला, रघुवीरची जादूगिरी चालली. महात्मा गांधी, अण्णा हजारे यांची समाजसेवा चालली. शरद पवारांचे राजकारण चालले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व चालले. आज नरेंद्र मोदीचे भाषण चालले की, त्यांचे सर्व चालते. म्हणजे काय असते, या सर्व मंडळीनी आपल्या आवडीचे एक क्षेत्र निवडले. त्यात त्यांनी सर्वस्व झोकून दिले. तन, मन, धन ते आपल्या ध्येयासाठी धावले. त्यामुळे ते आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च पदापर्यंत पोहचले. धुन्न ताऱ्याप्रमाणे स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले.
आज या सर्वांकडे कशाची कमतरता आहे, कशाचीच नाही. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, मानमरातब सगळेच आहे. यश त्यांच्या पायाशी अक्षरशः लोळण घेते. विशेष म्हणजे ही मंडळी पैशामागे कधीही धावत नाहीत, पैसाच त्यांच्यामागे चालत नव्हे धावत येतो. ते कोठेही गेले, तरी कोणी त्यांच्याकडून पैसे मागत नाहीत, उलट त्यांनाच गिफ्ट देतात. ते आपल्याकडे आले, म्हणून अभिमानाने त्यांच्यासोबतचे क्षण मिरवितात. आपल्याकडे काय होते, यश मिळविणे म्हणजे अमाप संपत्ती मिळविणे असे समजले जाते. यश म्हणजे पैसा समजून जो तो पैशाच्या मागे धावतो. पैसा महत्त्वाचा आहे, तो भरपूर मिळविलाच पाहिजे. परंतु पैसा असा त्याच्यामागे पळाल्याने मिळत नाही. आजच्या काळात ९७ टक्के लोक फक्त पैशाचाच विचार करून त्याच्यामागे धावत असतात. पण गंमत अशी आहे की पैसा उरलेल्या ३ टक्के लोकांच्या मागे धावतो. याला कारण म्हणजे हे उरलेले ३ टक्के लोक आहेत ना, ते पैशासाठी काम करीत नाहीत. ते आपल्या आवडत्या क्षेत्रात एक पेंशन म्हणून काम करतात. त्यांच्यात एक जुनून असतो, जजबा असतो, एक पागलपण असते. त्यांचे हौसले बुलंद असतात. ते फक्त जे करायचे ते सर्वोत्तम करायचे या ध्येयाने अक्षरशः वेडे झालेले असतात. म्हणूनच ते यशस्वी होतात, पैसा त्यांच्यामागे धावतो. यासाठीच ‘एक ही सादे सब सादे’ ही उक्ती मला प्रचंड भावते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
