चौफेर घोडदौड
गीतांजली एक्स्प्रेस अन् झुक झुक गाडी कुर्डुवाडी
मला सुरुवातीपासून प्रवास करण्याची, फिरण्याची प्रचंड आवड होती. दुचाकीवरूनही मी खूप प्रवास केला. कार आल्यावर तर मी जणू हवेतच उडत होतो. मला वेगाचे पहिल्यापासून आकर्षण, एकदा मला मामासमवेत पंढरपूरला जाण्याचा योग आला होता. आमच्या गावाहून आम्ही कुर्दुवाडीपर्यंत ट्रकने आलो होतो. तिथून नॅरो गेजवर धावणाऱ्या कुद्दुवाडी ते पंढरपूर रेल्वेने आम्ही प्रवास केला. फक्त यावन्न किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी या यात्रा स्पेशल रेल्वेला तब्बल आठ तास लागले होते. गाडी इतकी हळू चालायची की, ट्रॅकवर समजा म्हैस दिसली, तर ट्रेनचा चालक गाडीतून खाली उतरून पायी जाऊन म्हैस बाजूला करायचा व गाडी येण्याची वाट पाहत तिथेच थांबायचा. इतका संथ प्रवास होता. विशेष म्हणजे हा माझा आयुष्यातील पहिला रेल्वेप्रवास होता. पुढे मी ज्या कंपनीसाठी व्यवसाय करायचो, तिचं मुख्य कार्यालय कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे होते. त्यामुळे मी वर्षातून किमान दोनदा तरी मुख्य कार्यालयात कामानिमित्त जायचो. मुंबई-हावडा या गीतांजली एक्स्प्रेसने मी कोलकात्याला जात असे. त्या काळाची ती हायस्पीड रेल्वे होती. ४०० किलोमीटरच्या आतील थांब्यांचे तिकीटच मिळत नसायचे. आम्ही भुसावळला ट्रेन पकडायचो, नागपूर, रायपूर, जमदेशपूर, खडकपूर, हावडा या मार्गे ती कोलकात्याला पोहचायची. येताना तीच हावडा मेल गया, वाराणसी या मार्गान यायची. त्यामुळे गीतांजली एक्स्प्रेसने प्रवास करताना मला अनेकदा काशीविश्वेश्वराचे दर्शन घडायचे, गीतांजली एक्स्प्रेसचा वेग मला खूपच आवडायचा. पहिला रेल्वेप्रवास यात्रा स्पेशलने केलेला असल्याने गीतांजलीचा सुपर फास्ट वेग वेगळाच अनुभव द्यायचा. मला स्पीडची मोठी आवड होती. कारने चाललो असलो आणि एखाद्या गाडीने मागून येऊन ओव्हरटेक केले की, अस्वस्थ व्हायचो. मी माझा स्पीड वाढवून त्याला मागे टाकायचो. जेवण करताना माझ्या पत्नीचा स्पीड माझ्यापेक्षा कमी असायचा. मी तिला गंमतीने “तुझं जेवण म्हणजे झुकझुक गाडी आणि कुर्दुवाडी!” असे म्हणायचो. माझे जेवण व काम कसे गीतांजली एक्स्प्रेससारखे…. सुपर फास्ट. आज इतक्या वर्षानंतर पत्नीने तिचा स्पीड वाढविला नाही व मी माझा स्पीड कमी केलेला नाही. आयुष्यातही प्रत्येक जणाला सगळे काही स्पीडने हवे असते. त्यासाठी गीतांजली एक्स्प्रेसप्रमाणे धावावे लागते. तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहचू शकता. हे उदाहरण मी अनेकदा माझ्या भाषणात मुद्दाम देत असतो. अशा वेळी हत्तीसारखे डौलात नव्हे तर घोड्यासारखे चौखूर उधळत जायचे असते.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
