जडणघडणीचा काळ : जगण्याच्या व्यवहाराचे शिक्षण

जडणघडणीचा काळ :

जगण्याच्या व्यवहाराचे शिक्षण

आजोबा म्हणायचे, ‘तू नोकरदार बन, शेतकऱ्याचे सगळं आयुष्य मातीत

रावण्यात जातं. माझा एक तरी नातू ‘साहेब’ झालेला मला पाहायचा आहे.

आपल्या ओट्याला जीप लागली की, मी धन्य होईन.”

बालपण हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप मौल्यवान काळ असतो. मातीच्या गोळ्याला कुंभार जसा आकार देतो, तसे तो घडतो. आपल्या संस्कृतीतही बालसंस्काराला महत्त्व आहे. नकळत्या वयात झालेले संस्कार, लागलेले वळण आयुष्यात कायम बरोबर राहतं. माझ्या सुदैवाने माझा जन्मच एका संस्कारी कुटुंबात झाला. जिये मला कष्टाची, प्रामाणिकपणाची, नीतिमत्तेची शिकवण मिळाली. काही गोष्टी आवर्जून शिकविल्या गेल्या, काही गोष्टी मी निरीक्षणातून शिकलो.

आमचे कुटुंब मुळातच शेतकरी कुटुंब असल्याने आजोबा, वडील प्रत्यक्ष शाळेपेक्षाही जीवनाच्या शाळेतच अधिक शिकले. आजी, आईही तशा अर्थाने अडाणीच. पण या सर्वांचे एका बाबतीत एकमत होते – आम्ही भावंडांनी खूप शिकावे, मोठे व्हावे. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर, “बाबांनो तुम्ही शिकूनसवरून मोठे व्हा.. साहेब व्य!” वडील नेहमीच आम्हाला शिक्षणाचं महत्त्व सांगत. त्या काळात आमच्या गावात शिक्षणाचा एवढा प्रसार नव्हता. गावात सातवीपर्यंत सरकारी शाळा होती. शाळेपेक्षा मुले आपापल्या घरच्या शेतीवाडीतच जास्त रमत्त. आम्हा भावंडांना मात्र शाळेत जाण्यासाठी घरूनच पाठबळ मिळाले. मला स्वतःलाही कशी कोणास ठाऊक पण लहान वयातच शाळेविषयी गोडी लागली होती. त्यामुळे मी प्राथमिक शिक्षणासाठी गावातीलच सरकारी शाळेत दाखल झालो. शाळेत जे शिकविले जात होते, ते मी मनापासून शिकायचो. घरी आल्यावर चिमणीच्या उजेडात अभ्यास करायचो. त्या काळी चौथीला बोर्डाची परीक्षा असायची. आमच्या गावापासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेल्या बेलगावला या परीक्षेसाठी जावे लागे. मला मुळातच अभ्यासाची आवड होती व शिक्षकांनी माझी तयारीही चांगली करवून घेतली होती. त्यामुळे आत्मविश्वासाने चौथीची बोर्ड परीक्षा दिली. विशेष म्हणजे मी आमच्या गावात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. घरी सगळ्यांना खूप आनंद झाला. वडिलांचा आनंद तर गगनात मावेना. त्यांनी आम्हा भावंडांना सांगितले, “तुम्ही शिकत रहा. तुमच्या शिक्षणासाठी पैशाची कमतरता कधी पडू देणार नाही. वेळ पडली, तर जमीन विकेन, पण तुम्ही शिका, बाबांनो.”

 

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!