कष्टाळू धुमाळ
माझी माय माउली : ‘बाई’
शेतीवाडीच्या कामात माझे वडील वाघ असतील, तर वडिलांप्रमाणेच माझी आई ताराबाई हीसुद्धा कामाला वाघीण होती. तिने कुटुंबासाठी केलेल्या कष्टाला जगात तोड नसेल. तिचा दिवसही पहाटे चार वाजताच सुरू व्हायचा. उठल्याबरोबर अंघोळ वगैरे आटोपून ती घरापासून दीड-दोन किलोमीटर लांब असलेल्या नदीवर पाणी भरायला जायची. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा सर्व ऋतूंत तिचा दिनक्रम कायम असायचा. डोक्यावर एक मोठा हंडा, त्याच्यावर घागर व काखेत आणखी एक घागर घेऊन ती पाण्याच्या एक दोन नाही तर पाच पाच खेपा करायची. जवळपास बारा-पंधरा किलोमीटरची पायपीट ती डोक्यावर भरलेला हंडा व घागर घेऊन करायची. एवढ्या खेपा केल्यावर घरातील रांजण भरत असे. बरे, एवढे पाणी आणल्यावर जराही विश्रांती न घेता ती पुढच्या कामाला लागत असे. थांबणे तिला माहितीच नव्हते, पाणी भरून झाल्यावर आमच्या घरातील ९ जणांचा तसेच ४ सालदार गड्यांचा व ३ कुत्र्यांचाही स्वयंपाक ती करीत असे. वेळेत आम्हा भावंडांना उठविणे, आमच्या अंघोळीपांघोळीचे पाहणे, आमची न्याहारी उरकणे व सगळे आवरून देत शाळेत पाठविणे असे सगळे उरकल्यानंतर सकाळी बरोबर दहा वाजता ती स्वयंपाकाची पाटी डोक्यावर घेऊन शेतात कामाला पोहचत असे. एवळ्या शेताची मालकीण असूनही ती सगळ्यात आधी रानात पोहचत असे. तिच्यानंतर ११ वाजता रोजंदारीवरील बाया यायच्या. त्यांच्या अगोदर माझ्या आईचे काम सुरू झालेले असायचे. आताच्या काळात मॅनेजमेंटमध्ये लिडिंग फ्रॉम फ्रंटला महत्त्व आहे. म्हणजे हाताखालच्या माणसांना प्रेरित करायचे असेल, तर आपण स्वतःच त्या कामासाठी पुढे यायचे. माझे दादा, आई असेच काम त्याकाळात करीत असत. शेतात दिवसभर राबताना मध्ये काही काळ दोन घास पोटात ढकलायचे व पुन्हा सूर्यास्तापर्यंत शेतातील कामे करायची, यानंतर घरी यायचे. घरी आल्यावरही थांबणे नाहीच. कारण घरात खाणारी तोंडे संध्याकाळच्या जेवणाची वाट पाहत असायची. घरी आल्याआल्या आई पुन्हा स्वयंपाकाला लागायची. सकाळप्रमाणेच संध्याकाळीही तितक्याच लोकांचा स्वयंपाक करायचा. सर्वांचे हवे नको ते पाहायचे. सगळ्यांची जेवणे झाल्यावर मग स्वतः जेवायचे. त्यानंतर पुन्हा उष्टीखरकटी काढायची, भांडी धुवायची, झाकपाक करायची, दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची. एवढी सगळी कामे केल्यावर मग कुठे तिची पाठ जमिनीवर टेकायची.
आईची माया काय असते, याची एक आठवण आजही माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात आहे. मी सातव्या इयत्तेत असताना माझे अर्धे डोके दुखायचे. गोळ्याऔषधांनाही ते दुखणे दाद देईना. नंतर कळले की, त्याला अर्थशिशी असे काही तरी म्हणतात. तर माझे हे दुखणे पाहून आईचा जीव कासावीस व्हायचा. सूर्य जसजसा वर चढायचा तसे डोके दुखायला सुरू व्हायचे… दुपारनंतर सूर्य मावळतीला लागला की हळूहळू डोकेदुखी थांबायची.. जिवाची खूप तगमग व्हायची. आईसुद्धा हैराण झाली होती. तिला कोणी तरी सांगितले की, ‘रात्री बरोबर १२ वाजता बांगड्या न वाजवता नवनाथला तूप व पुरणपोळी खाऊ घाला. असे सलग तीन दिवस करा. नक्की फरक पडेल, त्याची डोकेदुखी राहील.’ आईच ती… तिने आपल्या पाडसासाठी हे करायचे ठरविले.
पुरणपोळी तर माझ्यासाठी सर्वात आवडीचा जिन्नस… आजही आहे. तीन दिवस मध्यरात्री जागून तिने मला पुरणपोळी खाऊ घातली. आणि खरोखरच तीन दिवसांत माझे दुखणे पळाले. पण मला पुरणपोळी अशी सोडावी वाटत नव्हती. मी आईला म्हणालो, “डोकं दुखायचं पूर्ण थांबलेलं नाही, अजून तीन चार दिवस खाल्लं, तर नक्की राहील.” त्या माउलीने कोणतीही तक्रार न करता माझे ऐकले. आणखी ३ मध्यरात्री मला पुरणपोळी खाऊ घातली. मुलासाठी इतके कष्ट घेणारी माउली मिळाली. आई, तुझे हे थोर उपकार सात जन्मांतही मी फेडू शकणार नाही.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
