ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं?
ध्येय गाठण्याचा आराखडा
आता एकदा काय करायचं व कोणत्या दिवसापर्यंत हे नक्की ठरविल्यावर, आपण प्रकल्पाचा आराखडा तयार करू या. सर्वात आधी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कोणत्या माहिती, ज्ञान, वस्तू, व्यक्ती, जागा, पैसा अशा साधनांची सविस्तर यादी करावी. त्याची उपलब्धता आपल्याला निश्चित करावी लागेल. त्यासाठी क्रमबद्ध कार्यक्रम लिहून काढा. आपल्या ध्येयाच्या दृष्टीने आवश्यक, पण आपण करू शकत नाही, अशा गोष्टींसाठी इतरांची मदत घ्यावी लागेल. जसं की तुम्ही चांगलं उत्पादन बनवू शकता, पण तुम्हाला विक्री करणे जमत नाही, तर त्यासाठी दुसर्या व्यक्तीची नेमणूक करा.
लक्षात ठेवा, तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला मित्र, शेजारी, नातेवाईक, सहकारी, भागीदार, अशा अनेक जणांची मदत लागणार आहे व होणार आहे. म्हणून सर्वांना घेऊन पुढे जाण्याची तयारी ठेवा. त्यासाठी मानवी स्नेहसंबंध सुधारण्यावर भर द्या. नवीन पद्धती, व्यवस्था, नियम शिकण्याची तयारी करा. आता थोडं आकड्यांशी खेळू या. समजा, तुमचं एक वर्षाचं ध्येय व तारीख ठरली. आता ते बारा महिने किंवा ५२ आठवड्यांत विभागा. पाहा, किती छोटं व सोपं झालं ते. क्रिकेटच्या सामन्यातही एका षटकात किती धावा करायच्या ते ठरवूनच ३००-३५० धावा ५० षटकांत उभारतात, हे तुम्ही पाहिले आहेच.
तर, त्यानुसार तुमच्या ध्येयाचा दर आठवड्याचा व दिवसाचा कार्यक्रम व आराखडा तयार करा. दिवसभरात किती काम करायचे, कोणाला भेटायचे, कोणाला फोन करायचे, ई मेल पाठवायच्या, कोणाकडून कोणते काम करून घ्यायचे, कोणाकडे कोणत्या कामाविषयी अहवाल मागवायचा, हे सर्व लिहून काढा. अशा यादीला to-do-list म्हणतात. करायची कामे लिहून काढल्यावर ती कामे होण्याची व आपण करण्याची शक्यता खूपच वाढते. पुढचं महत्त्वाचं काम म्हणजे पैशाचे हिशेब. तुमचं वार्षिक जमा-खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा. तुम्ही व्यवसायाशी संबंधित सर्व बाबींचा विचार करा.
त्यानुसार तुम्हाला तुमच्या उत्पादनाची वा सेवेची वाजवी किंमत ठरवता येईल. अशा अंदाजपत्रकाचं महिन्याच्या पातळीवरचं कोष्टक तयार करा व त्याचा आढावा घ्या. या सर्व गोष्टी लिहून काढून तुम्ही एक आंतरिक शिस्त तयार करता व तिचे पालन केल्यास तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होते. या तुम्ही बनविलेल्या आराखड्याचा मुख्य उपयोग तुम्हाला तुमच्या उद्दिष्टाची कायम आठवण देणे हा होय. त्यामुळे तुम्ही सदैव ध्येयाचा विचार करता व इतर गोष्टींत तुमचे लक्ष विचलित होण्याचे प्रमाण खूप कमी होते. आता तुम्हाला मनाची कार्ये, एकाग्रता, तर्क, गणित, आत्मविश्वास, संयम, आयोजन, भावना, स्मरणशक्ती यांची मदत आपल्या ध्येयपूर्तीसाठी कशी होईल, हे समजायला मदत होईल. मन हे चोवीस तास कार्यरत असते. आता तुम्ही त्याचा स्वेच्छेने वापर करून, त्यांवर नियंत्रण ठेवून ध्येय गाठण्यासाठी वापर कराल. एका दिवसात आपल्या मनात ५० हजार विचार येतात, त्यापैकी अर्ध्याहून अधिक विचार तुमच्या ध्येयाचेच असतील, तर तुम्ही ते विसरू शकणार नाही व तुम्ही यशस्वी होणारच! शंका वाटत असेल तर आधी करूनच बघा!
लेखक- अज्ञात (उद्योजक वक्ता)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
