२. Bureaucratic : प्रशासक लालफीत पद्धत
नेतृत्व करण्याची ही पद्धत फक्त सरकारी कार्यालयातच वापरली जाते. इथे प्रत्येक निर्णय घेताना नेता कायदा काय म्हणतो नियम काय सांगतो ते पाहून काटेकोरपणे निर्णय घेतो. अगदी साधा चहा मागवायचा म्हटलं तरी त्याबाबत काय नियम आहेत ते पाहूनच ते पुढील आदेश देतात. इथपर्यंत नियम कायदे पाहून निर्णय घेतले जातात. तुमचं काम कितीही महत्वाचं आणि तातडीची असलं तरी ते नियम आणि कायद्याच्या कचाट्यातून पुढे जावे लागते. अर्थात कोणताही निर्णय घेताना कोणताही अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा सल्ला विचारत नाही. आणि निर्णय चुकला तर अंगावर कधीही घेत नाहीत. काम कसं अगदी कायद्यावर बोट ठेवूनच. या पद्धतीचा सगळ्यात मोठा फटका लोकशाहीला बसतो. कारण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पातळीवर निर्णय अंमलबजावणी करण्यात एवढा वेळ जातो की तोपर्यंत नवीन आदेश येऊन धडकलेला असतो. आणि जुने काम नव्या नियमात बसवता येत नाही. मग सोपं काम म्हणजे ते काम सोडूनच द्यायचे हि पद्धत.
पण महाराजांच्या राज्यात ही लालफितशाही अजिबात चालत नव्हती. एकदा एका शेतकऱ्याने महाराजांचा घोडाच महाडजवळ अडविला. महाराजांनी त्या वृद्ध शेतकऱ्याला कारण विचारले तेव्हा त्याने निर्भय पणे सांगितले माझे कर परताव्याचे दोन पैसे अजून मिळाले नाहीत. महिना होऊन गेला. महाराजांनी त्या शेतकऱ्याला स्वतःच्या सोबत रायगडावर आणला आणि संध्याकाळ होण्याअगोदर त्याला त्याचे परताव्याचे दोन पैसे अधिक त्रास झाल्याबद्दल चार पैसे देऊन रवाना केले. ते चार पैसे अधिकाऱ्याच्या पगारातून कापून त्याला वेळेत काम करायची तंबी दिली. ही घटना जवळपास १६७६ ची आहे. म्हणजे माहितीचा अधिकार २००५ नसून १६७६ आहे हे आपण समजून घ्या. कदाचित तोच शेतकरी पुन्हा अण्णा हजारेंच्या रुपाने जन्माला येऊन आता मोठ-मोठ्या राजकारण्यांना धडा शिकवित आहे. असं म्हणायला जागा आहे.
लालफितीचा कारभार असाच चालू राहिला तर आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी परिस्थिती निर्माण होते म्हणून असला नेतृत्वाचा प्रकार जनतेच्या नियंत्रणातच असलेला योग्य होईल.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
