नोकरीचा राजीनामा : नवी मुहूर्तमेढ
शेतकऱ्यांचे दुःख
एकदा आमच्या बँकेने अशाच एका शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये कर्ज दिलं होतं. त्यावरील व्याज वाढत जाऊन थकबाकीची रक्कम पोहचली साठ हजार रुपयांवर अनेकदा त्यांच्याकडे चकरा मारायचो. तंबी द्यायचो. ‘तुमची शेती बँकेकडे गहाण आहे, तिच्यावर जप्ती आणू’ असे सांगायचो. ‘थोडे तरी पैसे भरा’ असे म्हणायचो. मी समजावून सांगायचो, “बाबा, मीसुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला शेतकऱ्याची अडचण माहिती आहे. पण इथे बँकेला नियमाप्रमाणे काम करावं लागतं. आमच्यावर वरतून प्रेशर असतं. शे दोनशे, पाचशे रुपये तरी भरा.” दरवेळी वसुलीला गेलो की, ‘पुढच्या वेळी जप्तीची नोटीस आणेन’ अशी धमकीच द्यायचो. एकदा मध्ये दोन महिने त्याच्याकडे जाणे झाले नाही. मला बँकेतील सहकाऱ्याने वसुलीची यादी दिली. गावात आल्यावर पाहिले; तर त्या शेतकऱ्याचे नाव होतेच. त्याने एकही रुपया भरला नव्हता. मी दुपारच्या वेळी त्यांच्या शेतातील घरी गेलो. घर म्हणजे नावालाच होते. ते एक ठिगळ लावलेले छप्परच होते. मी गेलो, तेव्हा सगळीकडे शांतता होती. दारात म्हातारा म्हातारी बसलेले होते. त्या शेतकऱ्याचे आईवडील होते ते. दोन-तीन लहान मुले अंगणात खेळत होती. माझी चाहूल लागताच शेतकऱ्याची पत्नी बाहेर आली. मी कशासाठी आलो, हे तिने बरोबर ओळखले. एवढ्यात माझ्याकडे पाहून तिने मोठ्याने हंबरडा फोडला. धाय मोकलून रडायला लागली, क्षणभर काय चाललेय, हे मला कळेना. ती रडत रडतच मला सांगायला लागली. तिचा ३०-३२ वर्षाचा तरुण नवरा काही दिवसांपूर्वीच रस्ता अपघातात वारला. २५ एक वर्षांची ती बाई.. पदरात दोन तीन लेकरं.. म्हातारे सासू-सासरे. आधीच असे वातावरण आणि त्यात मी त्यांच्या दारात उभा. मागच्या वेळी मी सांगितले होते की, मी पुढच्या वेळी जप्तीची नोटीस घेऊन येणार, त्यामुळे तिला वाटले आता आणखी एक संकट कोसळणार, त्यामुळे ती मला पाहताच रडायला लागली होती. अशा वेळी मी पैसे मागणे दूरच राहिले. मी तिचे कसेबसे सांत्वन केले. तिच्या मुलांसाठी काही पैसे दिले व परत आलो.
या घटनेनं मी खूप अस्वस्थ झालो होतो. असे कितीतरी शेतकरी, शेतमजूर अशा अपघातात मरण पावत असतील. त्यांची बायका-मुले उघड्यावर पडत असतील. त्यांच्या प्रपंचाचे काय होत असेल या विचाराने मी दुःखीकष्टी झालो. आमच्या बँकेत माझे वरिष्ठ होते, त्यांना मी सर्व वृत्तांत सांगितला. त्या मृत शेतकऱ्याला कर्जमाफी मिळण्यासाठी काही करता येईल का, असे त्यांना विचारले. दुर्दैवाने माझ्या आणि त्यांच्याही हातात काही नव्हते. आम्ही नियमांना बांधील होतो. परंतु तरीही प्रयत्न करायला काय हरकत आहे, असे म्हणत मी वरिष्ठ कार्यालयाला सविस्तर अर्ज लिहितो, त्या अर्जावर तुम्ही शिफारस द्या, अशीही विनंती केली. त्या अधिकाऱ्याने माझी विनंती ऐकल्यावर त्यास स्पष्ट नकार दिला. उलट मला सल्ला दिला, “तुम्हाला चांगला पगार आहे. तुम्ही तुमच्या पगारातून दरमहा पाच हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या कर्जखात्यात भरा. वर्षभरात त्याचे कर्ज फिटून जाईल.” प्रॅक्टिकली मला हे शक्य नव्हते. मलाही माझा संसार होता, पत्नी, दोन मुले, गावाकडची जबाबदारी होती. आधीच मी शेतीसाठी कितीतरी कर्ज घेतले होते. त्याचे हप्ते फेडत होतो. मी हे सांगितल्यावर त्यांनी मला गप्प राहण्याचा सल्ला दिला. पण मी या घटनेने बेचैन झालेलो होतो. मला काही तरी करायचे होते. मार्ग दिसत नव्हता. राज्यात, देशात असे कितीतरी शेतकरी मरत असतील. त्यांच्यासाठी काही करता येत नाही का? मी या प्रश्नाचे उत्तर स्वतःच शोधण्याचे ठरविले. या दरम्यान मला एक गोष्ट समजली. भारत सरकारचा एक विमा आहे. यात ६० रुपये भरले की, एक लाखाचे विमा कवच मिळते. मी विचार केला, त्या शेतकऱ्याने कदाचित ६० रुपये भरून विमा काढला असता, तर आज त्याच्या कुटुंबीयांना एक लाखाची रक्कम मिळाली असती. त्यातील ६० हजार रुपये आमची वसुली करून मी त्याच्या कुटुंबीयांना उरलेले ४० हजार रुपये देऊ शकलो असतो. तेवढाच त्याच्या उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला आधार मिळाला असता. पण आता ते शक्य नव्हते. या घटनेने मला विम्याचे महत्त्व कळले. अडीअडचणीत विमाच कामाला येऊ शकतो, हे उमगले. मग आपण हाच विम्याचा व्यवसाय का करू नये, असे माझ्या मनात आले. एकदा मनाने ठरवल, की, मी ते काम हातात घेतोच. मी एकूणच सगळ्या गोष्टींचा बारीक विचार केला. मी निश्चय नाही तर निर्धारच केला. नोकरी सोडायची व पूर्णवेळ विमाव्यवसायात उतरायचे. एखादी घटना जीवनाला कशी कलाटणी देते, त्याचे हे उदाहरण होय. तोपर्यंत माझ्या बँकेच्या नोकरीला तेरा वर्षे झाली होती. मी माझ्या निर्णयाबाबत मित्रांशी, नातलगांशी बोललो.
एकानेही मला ‘नोकरी सोड’ असं सांगितलं नाही. ‘काहीही कर, पण नोकरी सोडू नकोस’ असाच सल्ला प्रत्येक जण देत होता. पण आता मी कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतो. मला सांगण्यात आले, “आणखी दोन वर्ष तरी नोकरी करच. पंधरा वर्ष सेवा झाल्यावर किमान पेन्शन तरी मिळेल.” मात्र माझा निर्णय झालेला होता. आता मागे फिरायचे नाही. मी बँकेत गेलो व आमच्या मुख्य मॅनेजरच्या हातात माझे राजीनामा पत्र ठेवले. त्या सद्गृहस्थांनी मला परोपरीने समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वय ५९ वर्षे होते. अख्खी हयात त्यांनी बँकेच्या नोकरीत घालविली होती. ते वडीलकीच्या नात्याने म्हणाले गाले की, “बाळ, तू बहुजन समाजातून आला आहेस. आधीच पाटलांच्या पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत. मिळाली तरी त्यांची मजल जिल्हा बँकेच्या पुढे जात नाही. इतक्या पगाराची, इतक्या सवलती असलेली, मानसन्मानाची नोकरी सोडण्याचा आत्मघातकीपणा तू करू नकोस. माझा अनुभव सांगतो. तुझ्यासारखा वेडेपणाचा विचार करून जे बाहेर गेले, ज्यांनी नोकऱ्या सोडल्या, त्यांचे हाल मी डोळ्यांनी पाहिले आहेत. व्यवसायात यशस्वी होणाऱ्यांचं प्रमाण नगण्य आहे. दहापैकी सात जण रस्त्यावर येतात. दोन लोक रडतखडत कसे तरी जीवन जगतात. दहापैकी एखादाच यशस्वी होतो.” त्यांनी मला खूप समजावून सांगितले. मला राजीनाम्याच्या निर्णयापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला. त्यांची प्रामाणिक तळमळ मला समजतही होती. पण मी ठाम होतो. राजीनामा दिल्यानंतर एक महिन्याचा नोटीस पिरियड असतो. त्यांनी राजीनामा ठेवून घेतला. पण नोटीस पिरियडमध्ये शांतपणे पुनर्विचार करायला सांगितले.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
