नोकरीचा राजीनामा : नवी मुहूर्तमेढ
संदीप हरवतो तेव्हा
पुढे जाण्यापूर्वी मी नोकरीला असतानाच केलेला आणखी एक विमानप्रवासाचा अनुभव आवर्जून सांगण्यासारखा आहे. आयुष्य म्हणायला सोपे असते, पण तितकेच जगताना अवघड असते. कधी कोणता प्रसंग तुमच्यावर येईल, ते सांगता येत नाही. नियतीच्या उदरात लपलेल्या घटना अनपेक्षितपणे तुमच्यासमोर येतात. हे कसोटीचे क्षण असतात. त्याला तुम्ही कसे सामोरे जाता, यावर त्याचे चांगले-वाईट परिणाम ठरत असतात. काही घटना व प्रसंग तर कधीही आठवल्या, तरी मनाचा थरकाप उडतो.
माझ्या बाबतीतही म्हणजे माझ्या मुलाच्या बाबतीत तो लहान असतांना हा प्रसंग घडला. साधारण १९८७-८८ ची गोष्ट असेल, त्यावेळी माझी नोकरी व व्यवसायही जोमात चालू होता. मी कुटुंबाबरोबर पहिला विमानप्रवास दक्षिणेकडील राज्यात केला होता. या वेळी आम्ही उत्तर भारताचा प्लॅन केला. कोलकाता, जगत्रयपुरी, दार्जिलिंग, नेपाळ, दिल्ली व पुणे असा विमान प्रवास करून सहल करण्याचे नियोजन आम्ही केले, मी, माझी पत्नी, पाच वर्षाचा झालेला मोठा मुलगा संदीप असे आम्ही तिघे व आमचे एक नातेवाईक श्री. दिलीप चौधरी, त्यांची पत्नी व त्यांचा पाच-सहा वर्षांचा मुलगा. आमचा प्रवास सुरू झाला पुण्याहून, पुणे ते कोलकाता विमानाने, कोलकाता ते जगनाथपुरी ते परत कोलकाता असा प्रवास रेल्वेने करायचा. पुढे कोलकाना येथूनच दार्जिलिंग, दिल्ली व शेवटी पुणे असे विमानप्रवासाचे प्लॅनिंग करून तिकिटेशी बुक केली. ठरल्याप्रमाणे कोलकात्याला पोहचल्यावर तिथे दोन दिवस मुक्काम केला. रात्रीच्या ट्रेनने आम्ही जगन्नाथपुरीला रवाना झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता तिथे पोहचलो. जगन्नाथपुरी म्हणजे चार धामांपैकी एक धाम. ओडिशातील मोठे धार्मिक तीर्थक्षेत्र. तिथे जगन्नाथ (श्रीकृष्ण), बलराम व सुभद्रा यांची मंदिरे आहेत. जगन्नाथपुरीची रथयात्रा अवघ्या विश्वात प्रसिद्ध आहे. आम्ही हॉटेलमध्ये उतरून फ्रेश झालो व पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर भटकंती केली. तिथे मनसोक्त फिरल्यानंतर बरोबर दुपारी दोन वाजता आम्ही जगन्नाथाच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो. दर्शनासाठी भली मोठी रांग होतीच. चौकशी केल्यावर समजले की, दर्शन बारीत थांबलो, तर कमीत कमी सहा ते सात तासांनी दर्शन मिळेल. आम्हाला तर संध्याकाळी साडेपाच वाजता परतीची ट्रेन होती. त्यामुळे दर्शनासाठी थांबलो तर ट्रेन हुकणार होती. तसे झाले असते, तर पुढच्या सगळ्याच प्रवासाचे वेळापत्रक बिघडले असते. आमचे विमानाचेही बुकिंग आधीच झालेले होते. मी सगळ्यांना ही अडचण सांगितली व म्हणालो, “आपण पंढरपूरला गेल्यावर अनेकदा कळस दर्शन घेतोच की, मग इथेही आपण देवाचं बाहेरूनच दर्शन घेऊ. आपली ट्रेन चुकली, तर सगळंच गणित बिघडेल.”
पण माझ्या पत्नीने या प्रस्तावाला नकार दर्शविला, “चार धाम यात्रेपैकी एका मोठ्या तीर्थस्थळी आलो आहोत. इतक्या लांब आल्यावर देवाचं बाहेरूनच दर्शन घ्यायचं व परत जायचं हे बरोबर नाही.” मी परोपरीने समजावून सांगितलं की, रिझव्हेंशन असलेली ट्रेन गेली, तर सगळ्याच ट्रीपचा खेळखंडोबा होईल. पत्नी अजिबात ऐकायच्या मनःस्थितीत नव्हती. आमचे कडाक्याचे भांडणच झाले. शेवटी माझ्या म्हणण्यानुसार सगळ्यांनी देवाचे बाहेरूनच दर्शन घेतले व आम्ही ट्रेनने परत कोलकात्याला पोहचलो. कोलकात्यात आल्यानंतर परत एकदा दिवसभर शहरात भटकंती केली. रात्रीचे आठ वाजले होते. हॉटेलपासून एक-दीड किलोमीटरवर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचे ठरविले. आम्ही पायी पायीच रेस्टॉरंटपर्यंत गेलो. जेवण करून बाहेर आलो. तो कोलकात्यामधील मोठा चौक होता. बाहेर आल्यावर आमच्या लक्षात आले की, आमचा संदीप दिसत नाही. चौकातून प्रत्येक दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर फर्लांगभर जाऊन पाहिले. संदीप कुठेच दिसला नाही. आता काय करायचे? माझी पत्नी तर रस्त्यातच बसली व मोठ्याने रडायला लागली. मला तर काहीच सुचेना काय करावे ते. रेस्टॉरंटमध्ये चौकशी केली, चौकातील दुकानदारांकडे चौकशी केली. लहान मुलगा पाहिला का म्हणून. संदीप फक्त पाच वर्षांचा होता. मराठी सोडून कोणतीच भाषा त्याला येत नव्हती. कोलकात्यात एक तर बंगाली भाषा किंवा इंग्रजी. हिंदी कळणारेही थोडेच लोक. आता काय करायचे? इकडे पत्नी रडता रडता मला बोल लावत होती, “तुम्ही जगन्नाथपुरीला देवाचं दर्शन न घेता आम्हाला बाहेरूनच इकडं आणलं. देवाचाच कोप झाला. त्यानेच शिक्षा दिली”.
एक तासभर आम्ही आजूबाजूच्या परिसरात संदीपला शोधत होतो. मी खूप घाबरलो होतो. गावी गेल्यावर त्यांना काय सांगायचे, असा प्रश्न माझ्यासमोर होता. रात्रही झाली होती, रस्ते सामसूम होत होते. या अनोळखी शहरात जवळचे असे कोणी नाही. पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवायचे ठरविले. मला आठवले की, आमच्या कंपनीचे रिजनल मॅनेजर विजय चक्रवर्ती हे कोलकात्यालाच होते. पण त्यांच्या घरचा दूरध्वनी क्रमांक नव्हता. कार्यालयाचा होता, पण कार्यालय तर बंद झालेले होते. मी खूपच हतबल झालो. गावाकडे कोणत्या तोडाने जायचे? त्यांना काय सांगायचे? विमानप्रवासाच्या हौसेपायी मुलाला हरवून आलो? पत्नीचे रडणे अजिबात थांबत नव्हते. तिने मला सांगितले, “जगन्नाथपुरीच्या दिशेने तोंड करून देवाची माफी मागा, चुकलं म्हणा. मुलगा सापडू दे, अशी विनंती करा.” तिच्या म्हणण्याप्रमाणे मी रस्त्यातच डोके टेकविले, जगन्नाथाची माफी मागितली माझ्याबरोबर जे नातेवाईक होते, त्यांना सांगितलं, “मी या दोघीना हॉटेलवर रूममध्ये सोडून येतो. तोपर्यंत तुम्ही इथंच थांबा. मी परत आल्यावर आपण पोलिसांत तक्रार करायला जाऊ.” त्यानुसार मी त्या दोघींना घेऊन हॉटेलवर आलो. माझी पत्नी काही केल्या रूममध्ये जाण्यास तयार होत नव्हती. ‘आधी संदीपला आणा,’ असे ती वारंवार म्हणत होती. आम्ही ज्या अप्सरा हॉटेलमध्ये उतरलो होतो, ते पाच मजली होते. पाचव्या मजल्यावर रिसेप्शन काउंटर होतं. पत्नीला बळेच वरती रिसेप्शनजवळ घेऊन गेलो. तिथे पाहतो, तर आमचा संदीप आरामात तिथल्या सोफ्यावर बसून टी. व्ही. पाहत होता. मी आश्चर्यात पडलो. त्याला विचारले, “अरे, तू इथं कसा आलास?.” त्यावर तो म्हणाला, “मला घाईची लागली होती, म्हणून मी रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर पळत पळत हॉटेलमध्ये आलो.” मी त्याला विचारले, “अरे, पण तुला एवढ्या मोठ्या शहरात हॉटेल कसं सापडलं?” तो म्हणाला, “मी रस्ता लक्षात ठेवला होता.” त्याचे ऐकून मी धन्य झालो. पत्नीने त्याला जवळ घेतले. आई-मुलाची ती भेट, तिचे रडणे आजही डोळ्यासमोरून जात नाही. माझा आनंद तर गगनात मावत नव्हता. मी मनोमन जगत्रायाचे आभार मानले. एका मोठ्या प्रसंगातून देवानेच आम्हाला तारले होते.
कोलकात्यात असा शेवट गोड करून आम्ही सकाळी सात वाजता विमानतळावर पोहचलो. दार्जिलिंगजवळ बागडोरा विमानतळावर उतरलो. तिथून आपल्याकडील माथेरानसारखी एक मिनी ट्रेन दार्जिलिगला जाण्यासाठी सज्ज होती. कडाक्याच्या थंडीत त्या ट्रेनमध्ये बसून निसर्गरम्य दार्जिलिंगला पोहचलो. थंडी इतकी होती की, हॉटेलमधील रूममध्ये पोहचेपर्यंत हातपाय चांगलेच गार पडले होते. रूममध्ये हिटर सुरू केल्यावर जरा उबदार वाटले. दार्जिलिंगला उंच डोंगरावरून मनमोहक अरुणोदय (सन राईज) पाहण्याचे नियोजन आम्ही केले होते. त्यासाठी रात्री साडेबारा वाजता जीपने त्या डोंगरावर गेलो. तोपर्यंत थंडीलाही सरावलो होतो. साडेतीनच्या सुमारास सनराईज पॉइंटला पोहचलो. तिथे सूर्योदय पहाटे चार-साडेचारच्या आसपासच होतो. तांबडे फुटायला लागले. अतिशय मनमोहक दृष्य पाहताना देहभान हरपायला होते. निसर्गाचा हा करिष्मा मनात साठवत होतो. अशाच वातावरणात आम्ही दार्जिलिंगची पिकनिक पूर्ण केली. दोनच मुक्काम करून परत बागडोरा विमानतळावरून नेपाळमधील विमानाने काठमांडूला पोहचलो. पशुपतिनाथ मंदिरात माझ्या आवडत्या भोलेनाथाचे दर्शन घेतले. दोन दिवस काठमांडूला फिरल्यावर विमानाने दिल्लीला पोहचलो. दिल्लीतही दोन दिवस भटकंती केली व तिथून विमानानेच पुण्यनगरीत दाखल झालो. माझे सुनील पालवे नावाचे मित्र आम्हाला घ्यायला लोहगाव विमानतळावर आले होते. ते वडगाव शेरी येथे राहायचे. त्यांच्याच घरी मुक्काम करून बसने नगरला पोहचलो. या सर्व प्रवासात अनेक गमतीजमती केल्या. निसर्गाने भरभरून दिलेले सौंदर्य न्याहाळाले. पण संदीपचे हरवणे काही केल्या विसरले जात नव्हते. नंतर एकदा संदीपसाठी बोललेला तो नवस फेडण्यासाठी मी सहकुटुंब जगन्नाथपुरीची यात्रा केली. यावेळी कोणार्क एक्स्प्रेसने दौंडहून ट्रेनने गेलो. या पिकनिकदरम्यान पुरीचा बीच परत पाहिला, देवाचे मनोभावे दर्शन घेतले. कोणार्कचं जगप्रसिद्ध सूर्यमंदिर पाहिले. भुवनेश्वरच्या मंदिरासह तेथून जवळच असलेल्या नंदनकानन झूलॉजीकल पार्क अभयारण्यालाही भेट दिली. पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूची अप्रतीम शिल्पेही पाहिली.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
