∼ माणकचंद बोथरा ∼
राजूर ते अकोले दरम्यानची एक छोटीशी वस्ती! डोंगरवस्तीला असलेले आदिवासी कुटुंब. त्यांचा शेतीचा तुकडा… गुर-वासरं… कुडाच्या झोपड्या आणि त्यातून बाहेर आलेल्या बांबूवर टांगलेले ‘पारस’ कंपनीचे ‘अनब्रेकेबल’ घमेले. जिथं टीव्हीच काय, पण जाहिरातीचा साधा कपटाही कधी पोचला नसेल… तिथ ‘पारस पॉलिमर घमेलं’ पोचलं. ही किमया आहे, पारसच्या विश्वासाची… त्याच्या अफाट गुणवत्तेची. …. वर्षभर काळ्या मातीत राबणाऱ्या बळीराजासाठी अशी अवजारे बनवायची होती की, ज्यांच्या कष्टाला सोन्याची फळे यावीत’… माणकशेठ बोथरा सांगत होते! पारसच्या आजच्या अफाट पसाऱ्याचा डोलारा ज्यांनी आजही आपल्या कर्तृत्वाने पेलून धरलाय, असा ७० वर्षांचा तरुण !
माणकजींचा जन्म ३१ जानेवारी १९४२चा. स्वातंत्र्याच्या लढाईचा तो काळ… हेच बाळकडू पण शेतकऱ्यांच्या शेतीच्या प्रगतीचे, शेती साहित्य स्वातंत्र्याचे त्यांनी ‘पारस’च्या माध्यमातून आणले. माणकजींचा कर्तृत्वाचा हा इतिहास नगरी मातीनेच घडविला. नगरमध्येच जन्म… शालेय जीवन दादा चौधरी विद्यालयात झाले. पण शालेय जीवनातील उनाडकीमुळे घरच्यांनी त्यांना थेट चांदवडच्या शाळेत टाकले. एक वर्षानंतर ते पुन्हा नगरला आले व व्यवसायात दृष्टी वळवली.
येथूनच माणकजींची माणसं ओळखण्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. कुठल्याही व्यवसायात यशस्वी व्हायचे म्हटलं की, कौशल्य हवे ते माणसाशी संवाद साधण्याचे व आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी स्वतः शेतीमधून जाणले होते. कुळ म्हणून १५ एकर शेतीत माणकशेठ यांनी नांगर धरला होता, पेरणी केली होती, बैलगाडीही हाकली होती. याच अनुभवाचा उपयोग त्यांनी व्यवसायात केला.
भ्रमंतीतून अनुभव समृद्ध-
तसा बोथरा परिवाराचा मूळ व्यवसाय ‘गुळाचा’. पण त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेल्या विविध एजन्सींतून माणकशेठ गावोगाव फिरले. तिथे त्यांनी सिमेंट विकले, टाटाचे ऑईल विकले. असे एक ना अनेक उद्योग करत अनुभवाच्या बिनभिंतीच्या शाळेत माणकजींमधील उद्योजक घडत गेला. आता ग्रामीण भागात शेतकऱ्याला काय हवे हे त्यांनी बरोबर हेरलं. त्यावेळी प्रवरा कंपनीची नांगरफाळाची एजन्सी बोथरा परिवाराकडे होती. या परिवाराच्या विश्वासावर जिल्हाभरातील ‘बळीराजा’ त्यांच्याकडून नांगरफाळ घ्यायचा. ‘प्रवरा’ अचानक बंद पडली. पण शेतकऱ्यांची मागणी तर प्रचंड होती, तिला कसं थोपवायचं.
उपलब्ध असलेल्या कामगार व अन्य कंपन्याही या मागणीला पुरेशा नव्हत्या. नेमका हाच प्रश्न माणकशेठच्या आयुष्याला आव्हान देणारा ठरला… नव्हेच तर शेतकऱ्यांच्या व बोथरा परिवाराचा परिस स्पर्श ठरला. गरजेतून मुहूर्तमेढ रोवली गेली ‘पारस’ उद्योगसमूहाची.
‘गुळाच्या’ व्यवसायाकडून ‘नांगरफाळाकडे’ वळताना त्यांना कुटुंबाचा बराच विरोध झाला. पण स्वतःच्या अंतःर्मनाशी त्यांनी संवाद केला, “तू करतोय ते बरोबर करतोय. आता यातच आपल्याला भविष्य घडवायचे स्वतःच्या हिंमतीवर” मनाचा कौल जिद्दीत अवतरला व सुरू झाला ‘पारस’चा खडतर प्रवास…
अगोदरच्या व्यवसायात ग्रामीण भागात असलेल्या जनसंपर्काचा ‘पारस’च्या उभारणीत फायदा झाला. माणकजी गावोगाव जात. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेत. त्यांच्याशी संवाद करत. मग नगरला आल्यावर त्यावर देहभान हरपून कृतिशील विचार करत. यामधून घडला कुठलेही व्यावसायिक शिक्षण न घेतलेला संशोधक… यातूनच उभी राहिली केडगाव औद्योगिक वसाहतीमधील पहिली फौंन्ड्री… व बांधला गेला ‘पारस’ समूहाचा ग्रामीण शेतकऱ्यांच्या हृदयाशी संवाद साधणारा अतुट धागा…
शेतीचा अनुभव असलेल्या माणकजींना शेतकऱ्यांच्या अडचणी अवगत होत्या. त्यांच्या मागणी व गरजेनुसार पारस समूहाने प्रारंभी अनेक प्रकारचे नांगरफाळ बनविण्यास सुरुवात केली. अल्पावधीत आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रभर बळीराजाची मने जिंकली. आपले स्पर्धक असलेल्या कंपनीचे उत्पादन तीन महिने टिकत असेल, तर त्यामध्ये अधिक चांगल्या दर्जाचा माल वापरायचा. ‘पारस’चे उत्पादन दुसऱ्यापेक्षा दुप्पट टिकले पाहिजे. ‘पैसा’ हे सर्वस्व नाही तर ‘विश्वास’ हे हीच पूजा मानून त्यांनी सातत्याने उत्पादनात गुणवत्ता वाढविणारे बदल केले. यामधून ४ बैली, ६ बैली नांगरफाळ, बलराम, विदर्भासाठी ‘अजित’ अशा १५ प्रकारच्या नांगर फाळांची रेंजच बाजारात आणली. ‘ग्राऊंडर डिकोल्टर’ अर्थात शेंगा फोडणीसाठी लागणाऱ्या यंत्रात काही सुधारणा आवश्यक होत्या. माणकर्जीमधला अनुभवी संशोधक त्यांना स्वस्थ बसू देईना. ६ महिने ‘तीन’ जणांनाबरोबर घेऊन त्यांनी हे उत्पादन परिश्रम करून शेतीसाठी वरदान ठरविले. याच उत्पादनाची थेट ‘दक्षिण आफ्रिके’ला निर्यात करून अहमदनगरचा उद्योगपती काय करू शकतो, हे सगळ्या जगाला दाखवून दिले. त्यांनी तयार केलेले ‘पाभरी’ हे यंत्र समस्त शेतकऱ्यांना वरदानच ठरले. ‘पारस’च्या स्पर्शातून शेतकऱ्यांच्या जीवनात नवनवीन प्रगत साहित्याचा प्रवेश प्रगतीकारक ठरला. यातूनच पारसची यशस्वी वाटचाल सुरू झाली.
उद्योगरत्न पुरस्काराने गौरव –
माणकशेठ यांची चिकित्सक वृत्ती व जिद्द तसेच त्याला कुटुंबाचा
मिळालेल्या पाठिंबा व कामगार वर्गाचे श्रम यामधून ‘पारस’ ब्रेड अल्पावधीत राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला. या परिश्रमाची पावती ही मिळणारच. १९८४-८५ साली जिल्हा उद्योग केंद्राचा जिल्ह्यातील ‘पहिला उद्योगरत्न पुरस्कार’ नगरच्या ‘पारस’ उद्योगसमूहास मिळाला. तत्कालीन जिल्हाधिकारी अजय मेहता यांच्या हस्ते झालेल्या या गौरवाने माणकशेठ यांचा ऊर भरून आला. आजवर केलेल्या खडतर प्रवासाची ही शाबासकीची थाप होती. यावेळी सर्वांना बरोबर घेऊन हा पुरस्कार स्वीकारताना आपला पुढचा प्रवासही ‘पारस’चे नाव उज्ज्वल करणारा ठरावा अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
आधी धाडसाने निर्णय घ्या. घेतलेला निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करून दाखविणाराच खरा बिझनेसमन… माणकशेठजींचा हा यशाचा साधा मंत्र. ‘एमआयडीसी’तील काही आंतरराष्ट्रीय कंपन्याचे जॉब वर्कही पारस कंपनीने या आधी केले. पण साहेबी हुजरेगिरी या स्वाभिमानी माणसाला पचनी पडली नाही. करायचं ते स्वतःचंच हाच खाक्या त्यांनी मुलांमध्येही रुजविला.
वास्तविक माणकशेठजींना पोलिओ झालेला. त्यामुळे फौंन्ड्रीतल्या वर्कशॉपपासून वेगळे ऑफिस न बनविता थेट शॉपमध्येच खुर्ची टाकून कामगारांमध्ये राहूनच त्यांनी कंपनी चालविली. गुणवत्ता, प्रामाणिकपणा व सचोटी या त्रिसूत्रीवर त्यांनी कामगारांशी तसेच शेतकरी आणि ग्राहकांबरोबरची नाती जोपासली. कुळ म्हणून शेती केलेला हा माणूस कष्टाची किंमत जाणून आहे, म्हणूनच पारस परिवारातील माणूस स्वतःला असुरक्षित समजत नाही. एवढा त्यांचा विश्वास आहे.
‘युनियन’ बाजी ठरली अडचणीची –
१९८० ते १९८५ काळात नगर जिल्ह्यात ‘युनियन’ मुळे उद्योगाला खूप त्रास झाला. ‘पारस’ उद्योगालाही त्याची झळ पोहोचली. एकवेळ अशी आली की सुमारे अडीच महिने हा उद्योग बंद राहिला. पुढे विसंवादाचे संवादात रुपांतर झाले व कामगार हे पारस कुटुंबातील एक सदस्य झाले. आजही ४० वर्षांपासूनचे कामगार त्यांच्यासमवेत काम करीत आहेत. ‘सर्व श्रमिक संघाच्या’ माध्यमातून माणकशेठ यांनी कामगारांशी साधलेला मुक्त संवाद ‘पारस’ची नाळ घट्ट करणारा ठरला.
व्यायाम, धार्मिकता व गो-प्रेम हे त्यांच्या अंगी ठासून भरलेलं. पहाटे पाचला माणकशेठजींचा दिनक्रम सुरू होतो.
देवपूजा आटोपून कितीही काम असो, ते बाजारात गायीला चारा आणण्यासाठी जाणार. आपल्याकडे असणाऱ्या ५० गाींना तो चारा देणार व मगच पुढचे काम सुरू. मोजकेच पण वेळेवर जेवण, योग- प्राणायाम आणि पूरक व्यायाम यांच्या बळावर त्यांनी तब्येतीला उत्तमरित्या जपलंय. अजूनही दोन वेळा ते सगळ्या कंपनीचा आढावा घेतात. ‘सतत काम हाच माझा छंद.. व पारस माझा श्वास.’ माणकशेठ जेव्हा सांगतात त्यातूनच त्यांची ‘पेंशन’ दिसून येते. आजही ‘बुलन ट्रॅक्टर डॉन इंम्पीमेंट’ हा संशोधनाचा उद्योग गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा चालू आहे.
आज ‘पारस’ हे मानात उच्चारलं जाणार ‘बॅण्डनेम’ आहे. आवश्यक तेवढं जरूर शिका, पण माणसं ओळखण्याची कला सर्वात महत्त्वाची… हा त्यांचा मंत्र त्यांच्या मुलांनीही जोपासला आहे. पेमराज, संतोष आणि सतीश… त्यांचा आदर्श पुढे चालवत आहेत. पारस उद्योगसमूहाच्या माध्यमातून देशभर आपल्या उत्पादनाचा ठसा त्यांनी उमटविला आहे. गुणवत्ता, सचोटी, विश्वासाच्या जोरावर १९९४ नंतरच्या भूकंपानंतरची तब्बल ११ हजार नांगरांची शासनाची ऑर्डर त्यांनी दोन महिन्यांत पूर्ण करून हे आव्हान यशस्वीपणे पेलले. पारस उद्योगसमूहाचे आधारवड असलेल्या माणकशेठ यांचा व्यवसाय त्यांचे चिरंजीव पेमराज, संतोष व सतीश यांनी समर्थपणे, दूरदृष्टीने चालवला. आज त्यांच्या फांद्या संपूर्ण देशभर पसरल्या आहेत.
वयाच्या १६ व्यावर्षी पेमराज हे सर्वात मोठे चिरंजीव माणकशेठ यांच्या उद्योगाची धुरा वाहू लागले. वडिलांच्या कर्तृत्वाचा आदर्श पेमराज यांनी शिक्षण व व्यवसाय दोन्ही चालू ठेवून पुढे चालविला. स्वतःतील इंग्रजी भाषेची कमतरता माणकशेठ यांनी मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन पूर्ण केली. पेमराज, संतोष व सतीश यांच्या कल्पक बुद्धीमत्तेने ‘पारस’ला आणखी नवी झळाळी मिळाली.
नांगरफाळापासून मिरॅकलपर्यंत –
प्रगतीचे असंख्य टप्पे अनुभवताना पारसचा आलेख सतत उंचावतानाच दिसतो. १९८५ साली ‘पारस’ने दुसऱ्या फौंन्ड्रीचा शुभारंभ करून व्याप्ती वाढविली. १९९० साली ‘स्प्रे पंपाचे युनिट च्या रुपाने नवीन क्षेत्रात प्रवेश केला. १९९२ साली पारसने सुरू केलेले ‘काळ्या’ पाईपचे युनिट हे पारसला प्रगतीच्या शिखरावर घेऊन गेले. अखंड परिश्रम, गुणवत्ता, श्रद्धा यामुळे नशीबही ‘पारस’च्या मागे धावू लागले. रोनक इंडस्ट्रीच्या माध्यमातून चालू झालेल्या या युनिटने उच्चांकी उत्पादन केले. म्हणूनच की काय तीन महिन्यांनी दुसरी.. व सहा महिन्यांनी… तिसरी मशीन घेऊन त्यांनी नवा आलेख निर्माण केला. १९९५ साली पीव्हीसी पाईपचे नवे उत्पादन तयार करताना मशीन कोणती घ्यायची हा मोठा प्रश्न होता. मात्र, वडिलांची शिकवणूक व संदेश… क्वॉलिटीमध्ये तडजोड
नाही… गुणवत्ता महत्त्वाची, पैसा नाही… आणि मग उभी राहिली जर्मन तंत्रज्ञानाची नवीन इंडस्ट्री… मग पारसने कधीही मागे वळून पाहिले नाही. पाठबळ होते ते वडिलांचे…
२००० साली पवन चक्क्यांच्या माध्यमातून ‘पारस’ने निसर्गाच्या स्त्रोतात प्रवेश करून तो प्रकल्प पूर्ण केला. पारसच्या इतिहासातील सोनेरी पान होते ते. २००१ साली पीव्हीसी पाईप फिटिंगचे सुटे भाग, ड्रेनेज सिस्टीम तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. पारस कुटुंबाचे पेमराज, संतोष व सतीश हे त्रिकुट यासाठी जोमाने कामाला लागले.
“वाजवी दर, गुणवत्ता व तत्पर सेवा असेल तर जगातील कोणाशीही तुम्हाला स्पर्धा करता येते,” असे स्वाभिमानीपणे सांगताना पेमराज यांनी भूतकाळातील आठवणींना स्पर्श केला. या उत्पादनासाठी या बंधूनी रात्रीचा दिवस करून दोन वर्षांत १ लाख किलोमीटरची भ्रमंती केली. प्रस्थापित व्यावसायिकापेक्षा उपेक्षितांना त्यांनी आपलेसे केलं. त्यांना मदतीचा हात दिला… उभे केलं… आज ते धावू लागलेत. पारस उत्पादनाचा परिस स्पर्श होता तो… पेमराज भरभरून बोलत होते. २००४ साल हे पारस उद्योगसमूहाला ‘मिरॅकल’ ठरले. त्याचे कारण
होते, त्यांनी जबरदस्त संशोधन करून निर्माण केलेलं ‘अनब्रेकेबल’ उत्पादन. वेगवेगळे पॉलिमर वापरून थेट धातूंच्या वस्तूची बरोबरी करणारी जीवनावश्यक उत्पादने पाहून ग्राहकांच्या त्याच्यावर ‘उड्याच’ पडल्या. एका ठराविक कंपनीची मक्तेदारी मोडीत काढून पारसच्या इतिहासात ‘समृद्धी’ आली. यामध्ये अनेक अडचणी, आव्हाने, कोर्ट कचेऱ्या ‘पारस’ला कराव्या लागल्या. या सगळ्या प्रयत्नांनंतर त्यांना यश आलं व त्यामधून भारतभर ‘मिरॅकल’ची १७५ प्रकारच्या उत्पादनाची रेंज ‘पारस’ने सादर केली. थेट काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ‘पारस’ने मिरॅकलच्या माध्यमातून बळीराजाच्या जीवनात समृद्धी आणली. काश्मीरमध्ये या उत्पादनाची एवढी प्रचंड विक्री झाली की, पारसने तेथील विक्री प्रतिनिधीला थेट ‘मारुती’ मोटार बक्षीस दिली. आज पारसचे देशभरात २२५ डिलर्स आणि ७०० कर्मचारी आहेत. लवकरच ‘पारस’चे वॉटर टँक आणि सोलर पॉवर प्लॅटस् सुरू होत आहेत. या ‘पारस’ उद्योगसमूहाच्या कुटुंबाबरोबरच बोथरा परिवाराने समाज हे सुद्धा कुटुंब मानले. समाजाच्या अनेक सामाजिक उपक्रमात बोथरा कुटुंब दानशूरपणाच्या माध्यमातून ‘समाजऋणा’तून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटल विश्वस्त संस्था, अस्मिता उद्योजकता संघटना, यासारख्या एक ना अनेक संस्थेसाठी बोथरा परिवार आपले योगदान देण्यात आघाडीवर आहे. साध्या राहणीमानाचे आणि अत्युच्च विचारसरणीचे माणकशेठ बोथरा दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेत ते यामुळेच. यशाच्या मोजमापाची खरं तर कुठलीही फूटपट्टी नसते. पण अपयशाने खचला नाही आणि यश आलं म्हणून मातला नाही, असा हा समाजाभिमुख उद्योजक ! “विकासाच्या वाटा अहमदनगरच्या दिशेने येत आहेत,” असा सतत सकारात्मक विचार करणारा बिझनेसमन तरुणांना सल्ला देतो… ‘अभ्यास, धाडसी निर्णय आणि त्वरित अंमलबजावणी’ हे सूत्र राबवा, यश तुमच्यासमोर जोडून उभे राहील. गुणवत्तेचा परिस स्पर्श लाभलेला ‘पारस‘ उद्योगसमूह हा नवउद्योजकांसाठी आदर्शच आहे.

