राजकारणी साहित्यिक – यशवंतराव गडाख

                          • यशवंतराव गडाख •

 

यशवंतराव कंकरराव गडाख… आगळंवेगळं राजकीय व्यक्तिमत्त्व. राजकारणात राहूनही साहित्य-संस्कृतीत रमणारं यशवंतराव चव्हाण व शरदराव पवार या दिग्गज नेत्यांनंतरचं आश्वासक नाव म्हणून गडाखांचे नाव घेतले तर ते वावगे ठरणार नाही. चव्हाण व पवारांनी साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात स्वतःचा जसा ठसा उमटवला, तसाच आता गडाखांनीही उमटवला आहे. ‘अर्धविराम’ हे गडाखांचे पहिले पुस्तक चक्क पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे. राजकारणात राहून साहित्य-संस्कृतीला आपलेसे करणारे यशवंतराव गडाख आता राजकारणापेक्षा साहित्य क्षेत्रातच जास्त रमले आहेत. ‘अर्धविराम’नंतर ‘सहवास’ व ‘अंतर्वेध’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत, राज्याच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद तसेच सोलापूरच्या ‘भैरूरतन दमाणी’ या पुरस्कारांचे कौंदण या पुस्तकांना लाभले आहे. त्यामुळेच आता ‘साहित्यिक यशवंतराव गडाख’ असे नवे नाव साहित्य क्षेत्रानेही स्वीकारले आहे. नव्हे आता साहित्यिकांनाही यशवंतराव आता आपल्यात सर्वार्थाने सामील झाल्याचा आनंद वाटू लागला आहे.

अभ्यासनीय व्यक्तिमत्त्व –

यशवंतराव गडाखांचे जीवन राजकारणातील नव्या पिढीने खरे तर अभ्यासण्याजोगे आहे. गरिबीत बालपण, राजकीय संघर्षात तरुणपण, समाजकारणात गृहस्थाश्रम व आता वानप्रस्थाकडे प्रस्थान ठेवताना साहित्य क्षेत्रातील मुशाफिरी अशा चार टप्प्यातील ‘यशवंत’ अशा या व्यक्तिमत्त्वावर राजकीय व सामाजिक क्षेत्रात उमेदवारी करणाऱ्यांनी ‘पीएच.डी’ करणे वावगे ठरणार नाही. कारण, समाजाचे अनेक कंगोरे अनुभवलेल्या या व्यक्तिमत्त्वाचे जीवन नव्या पिढीला दिशादर्शक ठरणारे आहे. राजकारणात राहूनही माणूस मोहापासून अलिप्त कसा राहू शकतो, राजकीय ताकदीचा सामाजिक अभिसरणासाठी कसा उपयोग करवून घेऊ शकतो, साहित्य लेखनातून मनस्वी संवेदनशीलता कशी जपू शकतो, याचे उक्ती व कृतीतून उदाहरण देणारे यशवंतरावांचे जीवन म्हणूनच प्रोत्साहन व प्रेरणादायीच म्हणावे लागेल. सोनई (ता. नेवासे) येथील एकत्र कुटुंबात वाढलेल्या यशवंतरावांना लहानपणापासून शेतीची आवड होती. वडील कंकरराव गडाख फौजदार असल्याने नोकरीनिमित्त ते बाहेरच असायचे. घरी आईसमवेत तसेच अन्य नातेवाईकांसमवेत यशवंतराव शेतात काम करायचे. वडिलांप्रमाणे आपणही फौजदार व्हावे,

असे त्यांना वाटायचे. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. सोनईला आथमिक शिक्षणानंतर नगरला बी.ए. बी.एड्. करून शिक्षकी पेशा त्यांनी स्वीकारला. विद्यार्थी घडवता घडवता आजूबाजूचा परिसरही विकसित व्हावा या उद्देशाने छोट्या-मोठ्या समाजसेवेची आवड त्यांनी जवकसित आगळ्यावेगळ्या कामातून मित्रपरिवारही जमा होत गेला. आणि राजकारण म्हणजे काय, हे कळण्याच्या आतच गावक आणि आग्रहाखातर १९६७ मध्ये नेवासे पंचायत समितीची निवडणूक त्यांनी लढविली. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन चक्क वयाच्या २४व्या वर्षी पंचायत समितीचे सभापतीही झाले. विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल पडले असताना दुसरीकडे सभापती झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसातच त्यांची ‘सीआयडी’ मध्ये निरीक्षकपदी निवड झाली होती! पण आयुष्यातील या निर्णायक वळणावर राजकारणात राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय त्यांनी मनापासून स्वीकारलाच नव्हे, तर राजकारणाला समाजकारणाची व साहित्य-सांस्कृतिक सेवेची जोड देऊन स्वतःचे वेगळेपणही सिद्ध केले. पोलिस अधिकारी होऊन गुन्हेगारीचे निर्दालन करण्याच्या सामाजिक कामापेक्षा कांकणभर सरस असे राजकारण समाजकारणात राहून समाज घडविण्याचे काम त्यांनी कृतीतून दाखवूनही दिले.

संस्कृतीचे संस्कार –

यशवंतरावांच्या मनावर सामाजिक व सांस्कृतिक संस्कार हे बालपणीच सोनईत झाले. एकत्र कुटुंबात व सोनईसारख्या खेडेगावात जुन्या वाड्यात लहानचे मोठे झालेल्या यशवंतरावांवर आजूबाजूच्या सांस्कृतिक व सामाजिक वातावरणाचा परिणाम होत होता. त्या काळात गावात दिवसभरात एकच एसटी यायची. संथ समाजजीवन, उदासवाणे वातावरणात, लोकल बोर्डाच्या शाळेत दिवसा शिक्षण व रात्रीच्यावेळी कंदिलाच्या प्रकाशात तेथेच शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायची. अशा काळात भारतीय व मराठी संस्कृतीतील नागपंचमी, पोळा, दिवाळी असे सण म्हणजे उत्साहाची धमाल असायची. शेतात दिवसभर काबाडकष्ट केलेल्या स्त्रिया नागपंचमी सणाच्या काळात रोज सायंकाळी फेर धरायच्या, रिंगण करून गाणी म्हणायच्या, झोका खेळायच्या. अशा वातावरणानंतर पुढे बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कौतुकी नदीवर नेऊन आंघोळ घालायची, सजवायचे व सायंकाळी मारुतीच्या देवळात दर्शनाला न्यायचे. चांगल्या बैलांना त्यावेळी सरपंचांकडून बक्षिसे मिळायची. अभिमानाचा क्षण तो असायचा. दिवाळीत मातीची घरे सारवायची, पोचेरा करायचा, किराणा सामान आणायचे. घरोघरी लाडू, करंज्या, शंकरपाळी असे फराळाचे पदार्थ व्हायचे. महिलांची लगबग सुरू असायची. लहान मुले त्याकाळी दुर्मिळ असलेले फटाके… विशेषतः लवंगी फटाका, टिकल्या उडविण्यात दंग

असायचे. संक्रांतीला घरोघरी जाऊन तीळगुळ गोळा करायचे. जातीपातीच्या व्यवस्थेचा लवलेश नसलेल्या या काळात बारा बलुतेदार व अन्य धर्मिक मंडळी एकमेकांकडे आवर्जून जायची-यायची, आनंदात सहभागी व्हायची. अशा सगळ्या वातावरणात संस्कृतीने संवेदनशील झालेले मन अस्वस्थ होते ते आताचा काळ पाहून. बदलत्या कृषी संस्कृतीत यांत्रिकीकरणाने कामे सोपी झाली असली तरी गोठ्यातील बैल मात्र हरवल्याची खंत यशवंतरावांना आहे. ही खंत त्यांना खरी जाणवली ती घरातील एका पोळ्याच्या सणाच्या दिवशी.

या दिवशी घरात मातीचे बैल आणून पुजले गेले आणि काळाच्या ओघात समाजात किती बदल झाले, याचे चिंतन त्यांना अस्वस्थ करून गेले. पूर्वी कधीही पाहिले नव्हते असे दांडिया व गरबा नृत्य तसेच दिव्यांची रोषणाई व झगमगाट या सध्याच्या दृश्याने सांस्कृतिक परंपरांना उत्सवी रुप आल्याची व त्यातील संस्कृती कमी झाल्याची खंत त्यांना आहे. पण काळाचे बदलते स्वरुप तसेच सण हे ‘इव्हेंट’ झाल्याचा बदल स्वीकारण्याची मनाची तयारीही ते ठेवतात.

वाचनाची आवड जोपासली –

गडाखांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. अर्थात त्यांच्या शाळेतील शिक्षक मोहोळ सर यांना त्याचे श्रेय. ते नगरहून विविध पुस्तके आणून मुलांना वाचायला द्यायचे. या वाचनाला त्यावेळी दिशा नव्हती, पण वाचन होत होते. गावात दोन-तीन पेपर यायचे, त्यांचेही वाचन होऊन समाजात काय चालले, याची माहिती व्हायची. पुढे नगरला कॉलेजला गेल्यावर नगर कॉलेजची लायब्ररी हे गडाखांचे हक्काचे ठिकाण झाले. खासदार झाल्यावर संसदेच्या लायब्ररीतील अनेकविध पुस्तकांचे वाचन त्यांनी आवर्जून केले. लहानपणापासूनच ‘गदिमा’, व्यंकटेश माडगुळकर यांच्या पुस्तकांसह अन्य अनेक लेखकांच्या पुस्तकांची पारायणे केल्याने संवेदनशील मनाची जडणघडण होत गेली. शाळा, वाचन व शेती यात बालपण असे रमले. शेतात आईसमवेत यशवंतरावांचेही कष्ट होते. मोटा हाकणे, दारे धरणे, पेरणी करणे, धान्य उपटणे, खळे करणे, पोते भरणे, पहाटे भाजी तोडणे, बाजारात घेऊन जाणे अशी शेतीची सर्वप्रकारची कामे त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे कष्ट काय असतात व घाम गाळून जेव्हा तो धान्य- भाजीपाला पिकवतो, त्यावेळी त्याचे मोल काय असते, हे जाणून असलेले हे व्यक्तिमत्त्व, जेव्हा भाजी बाजारात ग्राहक भाजीचे भाव कमी-जास्त करतात, हे पाहुन दुःखी होते.

सोन्याच्या दुकानात जाऊन तुम्ही भावाबाबत घासाघीस करू शकत नसाल तर मग भाजी घेताना तो करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असे त्यांचे सांगणे आहे. उलट, सोन्यापेक्षा महत्त्वाच्या असलेल्या व पोटाची खळगी भरणाऱ्या अन्नधान्याचे व ते पिकविणाऱ्या कष्टकऱ्याचे मोल करणे म्हणजे संस्कृतीचे मोल करण्यासारखे ते समजतात.

राजकीय कारकीर्द फुलली –

पूर्वीची लोकल बोर्ड व्यवस्था रद्द होऊन १९६२च्या सुमारास पंचायत राज व्यवस्था सुरू झाली होती. त्यानंतरच्या पाच वर्षातच म्हणजे १९६७मध्ये यशवंतराव गडाखांचा राजकारणातील प्रवेश झाला. अर्थात तोही तसा अपघातानेच. बी. ए. बी.एड्. होऊन शिक्षकाची नोकरी करीत असताना गावातील पहिला ग्रॅज्युएट असलेल्या यशवंतरावांना पंचायत समिती निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला. पहिलीच निवडणूक जिंकून चक्क नेवासे पंचायत समितीचे सभापतीही झाले. गावात शाळा, रस्ते, समाजमंदिरे अशी कामे सुरू झाली. गावोगाव दौरे सुरू झाले. ग्रामीण भागाची दुरवस्था, जनतेचे हाल जाणवू लागले आणि यातूनच मग ग्रामीण भागाचे अर्थकारण व शिक्षणाच्या रुपाने समाजकारण बदलण्याची आस लागली. मुळा साखर कारखान्याची व मुळा एज्युकेशन सोसायटीची उभारणी यातूनच झाली. ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलण्यात मुळा साखर कारखाना यशस्वी झाला तर मुळा एज्युकेशन संस्थेने ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या रुपाने आत्मविश्वास दिला. बाहेरच्या जगात ताठ मानेने जगण्याची व वावरण्याची शक्ती दिली. मुळा कारखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिला वीज प्रकल्पही त्यांनी कार्यान्वित केला. दरम्यान यशवंतराव जिल्हा परिषदेच्या राजकारणात रमले. आधी उपाध्यक्ष व नंतर अध्यक्षपदाच्या माध्यमातून जिल्हाभरातील ग्रामीण अर्थकारणाला दिशा दिली. नगर जिल्ह्यात श्वेतक्रांतीची म्हणजेच दुधाच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारे यशवंतराव गडाखच. त्यांनीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना जिल्हा परिषदेचे एका वर्षाचे सर्व विभागांचे बजेट फक्त दुग्धोत्पादनासाठीच वापरले! त्या काळात संकरित गाया शेतकरी घेत नव्हते. या गायांचे दूध निकस असते, असा गैरसमज होता. पण यशवंतरावांनी स्वतः ५० गाया घेऊन गावात आणल्या व चक्क गावातील प्रमुख मंडळींना एक-एक गाय घेऊन जाण्याची विनंती केली. अनेकांनी भीतभीतच गाया नेल्या, पण या गायांचे सर्वाधिक दूध उत्पादन व त्यापासून उपलब्ध होणारा पैसा हळूहळू सर्वांना समजू लागला आणि आता १५ ते २० लाख लिटरवर दूध संकलन जिल्ह्याचे झाले आहे. जिल्हा परिषदेचे संपूर्ण बजेट दुग्धोत्पादनावर खर्च करण्याच्या निर्णयाची जशी राज्यभर चर्चा झाली, तशीच गडाखांच्या आणखी एका निर्णयाचीही राज्यात वाखाणणी झाली. जिल्ह्यातील शंभरच्यावर लोककलावंतांना एकत्र करून त्यांचा जिल्हा परिषदेतर्फे सत्काराचा अनोखा कार्यक्रमगडाखांनी केला होता. जिल्हा परिषदेचा निधी म्हणजे ग्रामीण भागातील खड्डे बुजवणे, रस्ते करणे, गटारी करणे या कामासाठीच वापरला पाहिजे असे नाही तर ग्रामीण समाजजीवन ज्यांनी आपल्या अस्तित्वाने समृद्ध केले, अशा उपेक्षित लोककलावंतांचा गौरव करून त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी जिल्हा परिषदेच्या निधीतून केला. अर्थात झारीतील शुक्राचार्य म्हणून ख्याती असलेल्या प्रशासन सेवेतील पगारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे लोककलावंतांच्या सत्काराचे कामच नाही, असा पवित्रा घेतल्याने त्यावर्षीच्या जिल्हा परिषदेच्या लेखा परीक्षणातही या कार्यक्रमाच्या खर्चावर आक्षेप घेतला गेला. चक्क ज्यांच्यामुळे हा खर्च करावा लागला, त्यांच्याकडून या पैशांची वसुली करण्याचे आदेशही निघाले. पण अशा अवस्थेतही यशवंतराव डगमगले नाहीत. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना भेटून वस्तुस्थिती समजावून सांगितली. ग्रामीण उपेक्षित कलावंतांच्या सत्कारातून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकासाच्या कार्याला हातभार लागला व लौकिक मिळाल्याचे स्पष्ट केल्याने वसंतदादांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. पुढे लेखा परीक्षणातील आक्षेप दूर झाले व गडाखांचा हा उपेक्षितांचा गुणगौरव राज्यभर गाजला. यशवंतरावांची ही संवेदनशील व सामाजिक वृत्तीच पुढे वसंतदादांकडून गौरविली गेली. नगर जिल्हा परिषदेने त्यांच्या काळात राबविलेले गावा- गावात कृत्रिम रेतन प्रकल्प व गावा-गावात शाळा हे दोन्ही पॅटर्न राज्याने स्वीकारले.

राजकीय उलथापालथ –

जिल्हा परिषदेच्या राजकारणात लौकिक मिळविलेल्या यशवंतरावांनी १९७१मध्ये विधानसभा निवडणूक लढविली. पण पहिल्याच निवडणुकीत अपयश आले. पण हार मानली नाही. समाजसेवा व गावागावांतील संपर्क जोरात होता. पुढे लोकसभेची उमेदवारी मिळून खासदारही झाले. संवेदनशील मनाच्या यशवंतरावांना दिल्लीचे दरबारी राजकारण फारसे मानवले नाही. तेथे नेत्यांची चालणारी हांजी हांजी, युपी-बिहारकडच्या खासदारांचे ऐशारामी जीवन, वर्षे वर्षे आपल्या मतदारसंघात न जाता दिल्लीतच राहण्याची त्यांची वृत्ती यशवंतरावांना अस्वस्थ करायची. देशातील गरीब माणूस ज्या आशेने त्याच्या नेत्याकडे पाहतो, ती आशा दिल्लीतील नेतेमंडळी धुळीस मिळवितात, हे अनुभवणे त्यांना क्लेशदायी वाटत होते. मराठी खासदारांचीही दिल्लीतील परस्परांशी असणारी तुटकपणाची वागणूकही त्यांना अस्वस्थ करीत असे. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण, शरद पवार व प्रमोद महाजन या मराठी नेत्यांनीच दिल्लीच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्याचा आनंद ते मानतात. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या वाट्याला सापत्नभावाची वागणूक केंद्राकडून मिळते, त्याचे कारण महाराष्ट्रातील प्रश्न व विकास कामांसाठी मराठी खासदार एकत्र येत नाहीत, हे असल्याचे ते सांगतात.

यशवंतराव दोन वेळा खासदार झाल्यानंतर तिसरी १९९१ची निवडणूक चांगलीच गाजली. या निवडणुकीतील त्यांच्या विजयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. तेथे त्यांचा विजय अवैध ठरला, पुढे सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले. सहा-सात वर्षे राजकीय विजनवास नशिबी आला. पण तो काळही इष्टापत्ती मानून साहित्य सेवेला त्यांनी वाहून घेतले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी महोत्सव, ७०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन अशा साहित्योत्सवात हे व्यक्तिमत्त्व रमले. या काळात मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून सोनई व  परिसराचा विकास होत असताना गरीब जनता मात्र कर्जाच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र त्यांना अस्वस्थ करायचे. मुला-मुलींच्या लग्नासाठी उचल मागायला रोज शेकडो शेतकरी कारखान्यावर यायचे. साधेपणाने लग्न करा, कर्ज घेऊ नका, उचल घेऊ नका असे सांगूनही हुंडा व अन्य मानसन्मानासाठी पैसे उसने घेतले जायचे. हा प्रकार बंद व्हावा म्हणून व समाजापुढे काहीतरी आदर्श असावा म्हणून यशवंतरावांनी आपल्या तिन्ही मुलांचे विवाह अगदी साध्या पद्धतीने केले. मोठे चिरंजीव आमदार शंकरराव गडाख यांचा विवाह नोंदणी पद्धतीने केला. दुसरे चिरंजीव विजय यांचा विवाह सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात केला तर धाकटे चिरंजीव प्रशांत यांचा विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात करून एक आगळावेगळा व आदर्श पायंडा निर्माण केला.

साहित्य सेवाच सर्वश्रेष्ठ –

नगरला ७०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असताना राज्यभरातील नामवंत साहित्यिकांशी यशवंतरावांचा परिचय वाढला. या संमेलनाचे नियोजन सुरू असताना त्यात मदत करणारांशी रोज सायंकाळी गप्पा रंगायच्या. या गप्पांतून सोनई व परिसरातील स्वतःचे बालजीवन व सांस्कृतिक दर्शन ते सांगायचे. त्याचवेळी मित्रांनी आग्रह केला व मदतीचीही तयारी दाखविली आणि या सगळ्या आठवणी यशवंतरावांनी शब्दबद्ध केल्या त्या त्यांच्या ‘अर्धविराम’ या पुस्तकाच्या माध्यमातून. जवळपास स्वतःचे आत्मचरित्रच स्पष्ट करणाऱ्या या पुस्तकाने यशवंतरावांचा राजकीय व सामाजिक जीवनप्रवास उलगडून दाखवला. या पुस्तकाला विविध पुरस्कारही मिळाले व त्याची हिंदी आवृत्तीही प्रकाशित झाली. पाच बहिणींच्या पाठीवर झालेल्या यशवंतरावांना लहानपणी कशाची बाधा होऊ नये व इडापिडा टळावी यासाठी आईने त्यांना गावातील मातंग समाजातील साकरबाईंच्या ओटीत टाकले. तेव्हा साकरबाईंनी यशवंतरावांच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवून दिलेला आशीर्वाद तसेच दर भाऊबीजेला यशवंतरावांना ओवाळण्याचा साकरबाईंना मिळणारा पहिला अधिकार अशा सगळ्या आठवणींची पखरण असलेल्या ‘अर्धविराम’चे साहित्य विश्वातून विशेष कौतुक झाले. राजकारणी व्यक्ती एवढी संवेदनशील असू शकते, यावर साहित्य क्षेत्रातील दिग्गजही आश्चर्यचकित झाले. पुढे हे पुस्तक पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमात घेतले तसेच त्याची हिंदी आवृत्तीही प्रकाशित झाली, यातच यशवंतरावांच्या सिद्धहस्त लेखणीचे कौतुक समाविष्ट आहे. पुढे ‘सहवास’ या दुसऱ्या पुस्तकातही दिग्गज साहित्यिकांच्या आठवणींचा पट त्यांनी उलगडला. ग. दि. माडगुळकर, शांताबाई शेळके, गुलजार, बासू भट्टाचार्य, डॉ. गिरीश कार्नाड, विंदा करंदीकर अशा मान्यवरांच्या सहवासात तसेच महाबळेश्वर, अंबोली व अन्य ठिकाणचा पाऊस व वातावरण अनुभवत लाभलेल्या मित्रांच्या सहवासाचा हा आठवणींचा पट साहित्य रसिकांना आगळीवेगळी अनुभूती देणारा ठरला. अंतर्वेध’ या तिसऱ्या पुस्तकाच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या गावच्या व गावाबाहेरच्या देशभरातील विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनवैशिष्ट्यांचा धांडोळा त्यांनी घेतला आहे. पुस्तके लिहिणे हे स्वतःच्या लौकिकासाठी नाही तर समाजासाठीचे देणे ते मानतात. कारण जुन्या पिढीतील माणसांनी खूप काही पाहिले आहे, भोगले आहे. सुख-दुःख सहन केले आहे. जुन्या पिढीच्या तुलनेत नंतरच्या व आजच्या पिढीला दुःख फारसे माहीत नाही. अशा स्थितीत पूर्वसंचित नव्या पिढीपर्यंत जावे व त्यांच्या यशाचा डोलारा कोणत्या कष्टप्रद इतिहासावर उभा आहे, हे त्यांना जाणवावे या हेतूने पुस्तकांचे लिखाण केल्याचे ते सांगतात. उद्याच्या पिढीतील कोणी ही पुस्तके वाचल्यावर आपला इतिहास किती समृद्ध होता, संस्कृती किती उच्च दर्जाची होती व साध्या भाजी-भाकरीतही कौटुंबिक जीवन किती सुखमय होते, याचे दर्शन त्यांना व्हावे व आपले गतिमान जीवन काहीसे संथ करून हरवलेले सुखाचे क्षण त्यांनी टिपावेत, एवढ्याच माफक उद्देशाचे हे साहित्य लिखाण पिढ्यान् पिढ्यांना लढण्याचे बळ देणारे, संघर्ष शिकविणारे, संस्कृती जपण्याचे व कौटुंबिक स्वास्थ राखण्याचे बाळकडू पाजणारे नक्कीच ठरणार आहे.

समृद्ध जीवनप्रवास –

पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक, राज्य सहकारी बँक, खासदारकी, पुढे विधान परिषदेची आमदारकी या माध्यमातून शेती व शेतकरी विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या यशवंतराव गडाखांचा समृद्ध जीवनप्रवास उदयोन्मुख पिढ्यांना मार्गदर्शक आहे. जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, थायलंड, इटली, रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, न्यूझिलंड अशा अनेकविध देशांच्या दौऱ्यांसह भारतातील उत्तर व दक्षिण भारतीय संस्कृती व समाजरचनेचा त्यांनी केलेला अभ्यास त्यांना अनुभवसंपन्न तर करवून गेलाच. शिवाय साहित्य लेखनातून प्रकट झालेले हे अनुभवी शहाणपण पुढील पिढ्यांना यशाचा मंत्र देऊन गेले आहे. यशवंतरावांना जीवनात पत्नी सौ. शारदा गडाख यांची लाभलेली साथ मोलाची आहे. कारण राजकारणात व समाजकारणात रमलेल्या यशवंतरावांना आपली मुले कितवीत शिकतात, हेही माहीत नसायचे. पण त्यांनी समाजासाठी पत्करलेली वडीलकी सौ. शारदा गडाख यांनीही आपली मानली. समाजाच्या सेवेत रत असलेल्या यशवंतरावांना प्रोत्साहन देणे हे कर्तव्य मानले. त्यामुळेच राजकीय व सामाजिक कार्याचे उत्तुंग शिखर ते गाठू शकले. यशाच्या व नावलौकिकाच्या शिखरावर असतानाही मातीचे ऋण मात्र ते विसरलेले नाही. पुनर्जन्म मिळाला तर सोनईच्या मातीतच व गडाखांच्या परिवारातच मिळावा, अशी त्यांची भावना आगळीवेगळीच मानली पाहिजे. जीवनात जे उदात्त व उन्नत आहे, तेच परमेश्वरस्वरुप असल्याची त्यांची भावनाही सकारात्मकविचार स्पष्ट करते. प्रदीर्घ राजकारणानंतर, निसर्ग जपवणूक, साहित्य सेवा तसेच शेती, शिक्षण, सहकारातील जीवनप्रवासात पुरोगामित्वाचा टेंभा न मिरविता मुलांचे साध्या पद्धतीने व सामुदायिक विवाह सोहळ्यातील विवाह, जातीपातीच्या राजकारणापलीकडे जाऊन सर्वधर्म समभाव जपण्याचा केलेला कृतिशील प्रयत्न, दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह व ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलवून गेला आहे व पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी ठरले आहे.

error: Content is protected !!