पिठाची गिरणी… भाऊबंदकी

पिठाची गिरणी… भाऊबंदकी

टोकाची भाऊबंदकी काय असते, हे मी लहानपणीच पाहिले आहे, अनुभवले

आहे. स्वतःचे नुकसान झाले, तरी चालेल, पण समोरच्याचेही नुकसान झाले

पाहिजे अशी रीस लागलेली असते.

ग्रामीण भागात किंवा शहरातही भाऊबंदकी काय असते, हे सगळ्यांनाच माहिती असेल. प्रत्येकाने याचे चांगलेवाईट अनुभव कधी ना कधी घेतलेच असतील, माझ्या लहाणपणीची भाऊबंदकीची एक आठवण अजून माझ्या स्मरणात आहे. त्या काळात गावात वीज नव्हती. कालांतराने विजेचे खांब पडले व घराघरातील चिमण्या जाऊन पिवळे बल्ब उजेड देऊ लागले. गावात वीज आल्यावर आमच्या आजोबांनी प्रथम आमच्या शेतातील विहिरीवर विजेवर चालणाऱ्या मोटारी बसविल्या. त्यामुळे पाणी हाताने उपसण्याचा ताण बराच कमी झाला.

श्रमाला थोडी उसंत मिळाली. याच काळात आमच्या आजोबांच्या डोक्यात पिठाची गिरणी सुरू करण्याची कल्पना आली. मनात नवनव्या कल्पना निर्मित करून त्या प्रत्यक्षात आणण्याचा त्यांचा स्थायीभाव होता. वृत्ती जिज्ञासू होती, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. वीज येण्याअगोदर पिठाची गिरणी रस्टन इंजिनावर चालायची.

आता गावात वीज आल्याने गिरणी सुरू करायला पाहिजे, असे आजोबांना वाटले. कारण तेव्हा गावात एकच पिठाची गिरणी होती. दुसरी गिरणी चेट सात-आठ किलोमीटर लांब. त्यामुळे एकुलती एक पिठाची गिरणी जोरात चालू होती. त्या गिरणीचालकाने सुरुवातीला पायलीला चार आणे (पाच किलोची एक पायली) असा भाव ठेवला होता व तो वाढवत एक रुपयापर्यंत नेला. याच काळात आमचे किराणादुकानही तितके चालत नव्हते. म्हणून मग आजोबांनी पिठाच्या गिरणीकरिता वीजकनेक्शन मिळविण्यासाठी वीज मंडळाकडं रीतसर अर्ज केला. परंतु वीज मंडळाचे साहेब काही केल्या आमचा अर्ज मंजूर करीत नव्हते. आजोबांनी चौकशी केली, तेव्हा कळले की, दुसऱ्या गिरणीवाल्याने साहेवांना पैसे देऊन आम्हाला वीज कनेक्शन मिळू नये यासाठी झोल केला आहे. आजोबा व वडिलांना ही गोष्ट मनाला खूपच लागली. त्याकाळी आमच्या शेतात जोड गहू पिकत असे. आमचा ऊसही गुन्हाळावर जात असल्याने घरात गुळाच्या ढेपा असत. वडिलांनी एक जोड गव्हाचे पोते व गुळाची ढेप लाईटवाल्या साहेबांच्या घरी पोहोचती केली. एवढे सगळे केल्यावर साहेब खूष झाला व त्याने आमचा अर्ज मंजूर करून वीज जोड दिला. गिरणीचे मशीन लावले व पुन्हा एकदा आम्हा भावंडांची गिरणीवर नेमणूक झाली, आम्ही या नव्या धंद्यात उत्साहाने काम करू लागलो. आम्हाला गिरणीसाठी आधीच्या गिरणीवाल्याशी स्पर्धा करायची होती. आजोबांनी सांगितले, “तो एक रुपया पायली घेतो, आपण पायलीला

बारा आणे म्हणजे पंचाहत्तर पैसे असा भाव ठेवू.” भाव कमी असल्याने आमच्या गिरणीत तुफान गर्दी होऊ लागली. त्याचा धंदा कमी झाला. त्यानेही मग या स्पर्धेत उतरत आमच्यासारखाच पायलीला बारा आणे असा भाव केला. त्या काळी शाळेच्या खापराच्या पाटीवर पेन्सिलीने भाव लिहिण्याची पद्धत होती. त्याने बारा आणे भाव केल्यावर आजोबांनी लगेच आमच्या गिरणीचा दळणाचा भाव आठ आणे पायली केला. आमचे पाहून समोरच्या गिरणीवाल्यानेही आठ आणे पायली भाव केला. आजोबांनी त्याची जिरवायचीच, असे ठरवले
होते. त्यामुळे मग आमच्या गिरणीत पायलीला चार आणे असा भाव करण्यात आला. आता मात्र समोरचा गिरणीवाल्य परेशान झाला. शेवटी त्याल्यही चार आणे पायली असा भाव करावा लागला. त्यावरही आजोबा शांत बसले नाही. त्यांनी आम्हाला सांगितले, “पाठीवर लिहा आमच्याकडे दळण फुकट आणि वरती गुळाचा विनदुधाचा चहाही प्या.” हे ऐकून आम्ही चक्रावून गेलो होतो पण आजोबा ठाम होते. एकदा मी आजोबांना विचारले, “असे भाव कमी करून आपण तोट्यात जाऊ.” त्यावर ते म्हणाले, “समाजाची, गावाची सेवा करायला नको का? त्यासाठी थोडी झळ सहन करायला पाहिजे.” पण पुढे जेव्हा आजोबांनी दळण फुकट व वरतून चहा असा प्रकार केला, तेव्हा मला काहीच समजेना. त्यावर आजोबांनी मला सांगितले, “दुसरा गिरणीवाला जो आपला भाऊबंद आहे ना, त्याला आपल्याला धंधातून आहवं करायचे.” मी म्हटले, “पण असं केल्यानं आपलंही नुकसानच होतंय ना?” पण आजोबा आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

याच काळात आणखी एक अशीच घटना घडली. आमच्या शेताशेजारीच दुसऱ्याचे शेत होते. बांध जरा वाकडा होता व समोरच्याने तो बांध सरळ करून आमची दोन गुंठे जमीन हडप केली. आजोबांनी हे प्रकरण बेट कोर्टात नेले. सुनावण्या होऊन निकाल आमच्या बाजूने लागला. मला सारखे वाटत होते की दोघांमध्ये समेट व्हावा. एक एक गुंठा ठा प्रत्येकाने घ्यावा व वाद मिटवावा. परंतु समोरचे भाऊबंद व आमचे आजोबा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट त्यांचे म्हणणे होते, दोन एकर जमीन गेली तरी बेहत्तर, आपण दिल्ली म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत लवू. मी वयाने खूपच लहान होतो. माझ्या बुद्धीप्रमाणे मी आओबांना, वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. एका गुंठ्यासाठी शंभर गुंठे घालविण्यात कोणते शहाणपण आहे, असे मला वाटायचे. मी ते बोलूनही दाखवायचो. पण त्याचा उपयोग होत नव्हता.

मला कधी काळी ऐकलेली एक गोष्ट आठवते. एका गावात महादेवाचे एक मंदिर होते. त्याठिकाणी दोन तरुण भाऊबंद महादेवाची श्रद्धेने पूजा करीत असत. भोळा शंकर एके दिवशी एका भावावर प्रसन्न झाला व त्याने त्याला सांगितले, “तुला काय हवं ते माग.” त्यावर तो भक्त म्हणाला, “मी उद्या विचार करून मागतो काय मागायचं ते.” या दोघांचे हे बोलणे दुसरा भाऊ दाराआडून ऐकत होता. पहिला भक्त निघून गेल्यावर हा दुसरा भक्त देवाजवळ गेला व देवाची आराधना करू लागला. देव काही त्याच्यावर प्रसन्न होईना. त्यामुळे त्याने देवाला सांगितले की, “तुम्ही माझ्यावर प्रसन्न होऊन दर्शन दिलं नाही, तर मी तुमच्या पिंडीवर डोके आपटून जीव देईन.” त्याने तसे केलेही. त्याची ही आर्त हाक ऐकून देवालाही दया आली व तो प्रकट झाला. महादेवाने त्याला म्हटले, “मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, बोल, तुला काय पाहिजे? हवं ते माग.” तेव्हा हा भक्त देवाला म्हणाला, “देवा, आता माझ्या अगोदर माझा भाऊबंद आला होता, तेव्हा तुम्ही त्याला वर दिला की, जे हवं ते देईन. हे सगळं खरं आहे का?” देव म्हणाले, “हो, मी तसा वर त्याला दिला आहे.” त्यावर हा भक्त म्हणाला, “माझा भाऊबंद शिकलेला, डोकेबाज आहे. मला तर काय मागावं, हे कळत नाही; पण त्याला जे घाल, त्याच्या डबल मला मिळालं पाहिजे.” देव म्हणाले, “तथास्तु!” आता या भक्ताचे व देवाचे बोलणे आधीच्या भक्ताने दाराआड उभे राहून ऐकले होते. तो त्वरित देवासमोर आला व म्हणाला, “मला जे द्याल, त्याच्या डबल तुम्ही माझ्या भाऊबंदाला देणार आहात का? का? हे जर खरं असेल; तर माझा एक हात, एक पाय, एक डोळा गेला तरी चालेल; पण माझ्या त्या भाऊबंदाचे दोन्ही हातपाय, डोळे गेले पाहिजेत. मी एका डोळ्याने आंधळा होईन, अपंग होईन. पण त्याचं सर्वस्वच जाईल!” हे ऐकून देवही हतबल झाला.

तर अशी ही भाऊबंदकीची कथा आहे. दुसऱ्याचे वाईट चिंतून वाईट करण्यासाठी आपले कितीही नुकसान झाले, तरी चालेल ही मानसिकता म्हणजे भाऊबंदकी. खेड्यापाड्यात आजही ही विचारधारा कायम आहे. यातून समाजाचे अतोनात नुकसान होते, पण पर्वा कुणाला? एवढे महाभारत भाऊबंदकीतून झाले. पण त्यापासून कोणी काही शिकायला तयार नाही, यासारखे आपल्या समाजाचे दुसरे दुर्दैव नाही.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!