महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती
शायिस्तेखानावर छापा घालण्यासाठी महाराजांनी रणनीती बनविली आणि त्यानुसार शत्रू अगोदरच बेसावध असेल असा दिवस महाराजांनी निवडला. तो दिवस होता औरंगजेबाच्या राज्यरोहणाच्या वर्धापनदिनाचा म्हणजे मोगलांच्या फौजेसाठी उत्सवाचा. आणि त्यात रोजाचा महिना चालू होता. दिवसभराचा उपवास सोडून लाल महालातील अर्धे पहारेकरी, चाकर गाढ झोपले होते तर बाकीचे हौसे शौकीन पहारेकरी नगारखान्यात वाद्य वाजवित आनंद साजरा करीत होते. मावळ्यांनी नगारखान्याचाच ताबा घेऊन जोरजोरात वाद्य वाजविले. त्यामुळे महाराज वीस हजार फौजेच्या गराड्यातून लाल महालात आत पोहोचले तरी काहीच कळले नाही.
५ एप्रिल १६६३ला मध्यरात्री शायिस्तेखानावर छापा पडला. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा मोगल पाठलाग करणारच होते, महाराज तानाजी मालुसरेसह हिंगण्यातील आंब्याच्या बागेत पोहोचले आणि इशारतीचा कर्णा वाजला. कात्रजच्या घाटात बैलांच्या शिंगाना आणि झाडांना बांधलेले टेंभे तेथील मावळ्यांनी पेटविले. आणि मोगलांचे लक्ष तिकडे जावे म्हणून जोरजोरात ढोल सुद्धा वाजविले. महाराज व त्यांचे सैन्य कात्रज घाटामध्ये आनंद साजरा करत आहेत असा मोगलांचा एका क्षणात भास व्हावा या मानसिकतेने महाराजांनी हे सगळे केले.
अचानक पडलेल्या मर्माघाती छाप्याने गोंधळलेल्या मोगलांचे दहा हजारांचे सैन्य अंधारात बेभान होऊन पाठलागावर निघाले. तोपर्यंत महाराज सिंहगडाच्या उलट्या
दिशेने गेले होते. आणि एक इशारतीचा कर्णा वाजताच कात्रजच्या घाटात ढोल नगारे वाजविणारे मावळेही वाद्य तेथेच टाकून घाट ओलांडून पुरंदराकडे पळाले. शत्रूची पहिली मुसंडी आमराईकडे येण्याच्या वेळी कात्रजकडे त्यांचा मोर्चा वळविला गेला. आणि शत्रू कात्रजकडे अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर तेथील सैनिकांनी आपली दिशा सासवडमार्गे पुरंदराकडे वळवून आखणी दिशाभूल केली. शत्रू सैनिकांनी महाराजांचा वेगाने पाठलाग केला परंतु दिशा चुकली आणि महाराजांना तेवढेच करायचे होते. संदेश वहनासाठी महाराजांनी याठिकाणी ध्वनी आणि प्रकाश या दोन्ही माध्यमांचा चपखलपणे उपयोग केलेला दिसतो.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
