महाराजांचे लष्कर व्यवस्थापन
महाराजांच्या घोडदळाचा विचार केला तर त्यात दोन प्रकारचे घोडेस्वार असायचे. एक ‘बारगीर’ आणि दुसरे म्हणजे ‘शिलेदार’. ज्या घोडेस्वारांना घोडा चालविण्याचे प्रशिक्षण, जीन सामान, आणि हत्यार सर्व काही सरकारातूनच दिले जायचे त्यांना ‘बारगीर’ असे म्हणत. तर ज्यांच्याकडे स्वतःचा घोडा आहे, ज्यांनी स्वतःचे प्रशिक्षण स्वतः पूर्ण केले आहे आणि जे स्वखर्चाने त्यांचे शत्र, घोडा, जीन सामान बाळगतात ते स्वयंपूर्ण असे घोडेस्वार म्हणजेच ‘शिलेदार’.
महाराजांच्या सैन्यात कायमस्वरुपी पगारावर काम करणाऱ्या या बारगीरांना एकत्रित हुजुरातीची फौज म्हणजेच ‘सरकारी फौज’ असे म्हटले जायचे. विशेष मोहिमेवर जातांना ज्या अधिक सैनिकांची गरज लागायची तेवढेच सैनिक भरती करण्याचे काम तेथील अंमलदार, सुभेदार यांच्याकडे दिले जायचे. मोहिमेपुरते फौजेत दाखल होणाऱ्या या शिलेदारांचे नेतृत्व त्या-त्या अधिकाऱ्याकडे असायचे व संपूर्ण फौज एकत्रितपणे एकनिष्ठ होऊन मोहिम फत्ते करायची. जो जसा लढाईत पराक्रम गाजविल तसा त्याचा मानसन्मान आणि मरातब केला जाई. तर महाराजांच्या घोडदळाचे असे कायम फौज (तैनाती फौज, हुजुरातीची पागा) आणि राखीव फौज असे दोन प्रकार.
कायम फौजेत ‘बारगीर’ तर राखीव फौजेत सर्व ‘शिलेदार मंडळी’. बरं, ही सर्व मंडळी बारगीर असो वा शिलेदार मंडळी या सर्वांनी दसऱ्यापर्यंत शेती करायची आणि शेतीची कामे संपल्यावर लष्करी मोहिमा आखल्या जायच्या. म्हणजेच काय तर हक्काचे उदरनिर्वाहाचे काम अगोदरच संपवून मगच मावळ्यांनी मुलुखगिरीवर म्हणजेच मोहिमेवर निघायचे. घरच्या मंडळींच्या सर्व व्यवस्था पार पाडूनच बाहेर पडायचे. शिवाय महाराज ज्यांना ज्यांना मोहिमेवर पाठवायचे त्यांना चार-पाच महिन्यांचा पगार आगाऊ दिला जायचा आणि मगच त्याला मोहिमेवर नामजत करायचे. शिपायाच्या घरच्या मंडळींना घरातील कर्ता माणूस परत येई पर्यंत काय करावे याची काळजी नसावी याची महाराजांनी घेतलेली ती दक्षता होती. शिपायाला लढाईची जबाबदारी देतांना महाराज त्याच्या कुटूंबाची जबाबदारी घेत होते. ‘रयतेचे पालक’ म्हणतात ते
बालाच. राजा म्हणून सैनिकावर अधिकार चालवितांना राजाची कर्तव्येही घरातील वडीलधाऱ्या माणसांप्रमाणे पार पाडणारे जाणते राजे होते शिवाजी महाराज.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
