महाराजांचे लष्कर व्यवस्थापन
सर्व साधारणपणे २५ घोडेस्वारांवर एक नियंत्रक. त्याचे पद हवालदार. प्रत्येक पाच हवालदारावर एक जमादार. तर अशा १० जमादारांवर एक अधिकारी. म्हणजे जवळपास १२५० सैनिकांवरील या अधिकाऱ्याला म्हणायचे एक हजारी मनसबदार. आता यातील २५० जे जास्त आहेत पैकी काही रजेवर असू शकतात. तर काही जायबंदी झाल्याने उपचार घेत असू शकतात किंवा इतर अन्य कारणामुळे मोहिमेच्या वेळी उपलब्ध होऊ शकत नाही असे गृहित धरूनच जवळपास वीस टक्के म्हणजे हजारामागे २५० सैनिक वाढीव ठेवलेले दिसतात. म्हणजेच १२५० सैनिकापैकी २० टक्के सैनिकांना रोटेशन व्हाईज रजा मिळण्याची व्यवस्था त्यात गृहित धरलेली असावी.
अशा पाच एक हजारी मनसबदारांवर एक प्रमुख अधिकारी त्याच्याकडे पंच हजारी हे पद असायचे. आणि अशा सर्व पंच हजारी मनसबदारावर जो सर्वोच्च असा घोडदळाचा अधिकारी त्याला म्हणायचे सरनोबत किंवा सेनापती (कमांडर इन चीफ). आता या घोडेस्वारांसाठी रसदेची केलेली व्यवस्था अशी असायची की, प्रत्येक हवालदाराच्या निर्देशाखाली एक पाणीपुरवठा करणारा घोडेस्वार असायचा तर एक जेवण-खावण याची काळजी घेणारा असायचा. पाणी पुरवठा सांभाळणाऱ्या घोडेस्वाराला भिस्ती असे म्हणतात. पखालीने पाणी भरून सैनिकांपर्यंत पोहचविण्याचे त्याचे मुख्य काम. आणि राखीव साठा म्हणून प्रत्येक घोडेस्वाराच्या जीन सामानामध्ये छोटी चामड्याची बनविलेली पाण्याची पिशवी असायची.
आणीबाणीच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे चार दिवस पिण्याचे पाणी पुरु शकेल अशी पिशवी प्रत्येक स्वाराकडे असायची. अर्थात पाण्याचे नियोजन कसे करावे याचे निर्देश असायचे. खाण्या-पिण्याची व्यवस्था करणारे घोडेस्वार नालबंदी या नावाने ओळखले जायचे. रात्रीच्या अंथरुणा-पांघरुणाची काळजी नसायची. प्रत्येक घोडेस्वाराच्या मांडेखाली एक घोंगडी आणि एक कांबळी कायम तयार असायची. मोहिमेवर असतांना अनावश्यक आणि अवजड वस्तु अजिबात सोबत घेतल्या जात नसायच्या.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
