यशाचे गुपित
पैसा नव्हे, लक्ष्मी मिळवा
पैसा व लक्ष्मी यात खूप मोठा फरक आहे. तुमच्या खिशात, बँकेत जे पैसे असतात, त्याला पैसाच म्हणतात. घरदार, व्यवसाय, गाड्या, दागिने, कपडेलत्ते, मोबाईल ही सर्व लक्ष्मीची रूपे आहेत. धनदौलत संपत्ती ही लक्ष्मी आहे. लक्ष्मी कमावताना तुम्हाला आशीर्वाद, दुवा मिळतील. त्यामुळे तुमच्या घरात सौभाग्य, सुखशांती नांदल. पण अनीतीने कमाई कराल, तर फक्त पैसाच मिळेल. पैशाबरोबर एखाद्याचा तळतळाट, शिव्याशाप मिळतील. यातून घरातील, तुमच्या मनातील शांती, समाधान गायब होईल.
तुम्ही फळे घ्यायला गेलात. दुकानदाराने तुम्हाला चांगली फळे दाखविली. प्रत्यक्ष पेटीत भरताना वरवर चांगली फळे भरून खाली तीन-चार फळे नासकी भरली. तुम्ही घरी जाऊन पेटी उघडून पाहता. त्यात नासकी फळे दिसल्यावर तुम्ही त्या दुकानदाराला मनातून शिव्याशाप देतात. त्याच्या दुकानात आता परत कधीच जाणार नाही, असे ठरविता. तुमच्या संपर्कातील लोकांनाही त्या दुकानदाराने केलेली बदमाषी सांगता. त्या दुकानदाराने किरकोळ फायद्यासाठी स्वतःचे किती मोठे नुकसान करून घेतले, हे लक्षात घ्या. एक तर त्याने गि-हाईकही गमावले. वरतून शिव्याशाप त्याच्या पदरात पडले. या उलट त्या दुकानदाराने गिऱ्हाइकाला सांगितले असते, “माझ्याकडे चांगली फळं थोडीच आहेत, तुम्ही दुसरीकडून घ्या किंवा उद्या माझ्याकडे या, मी देतो.” असे सांगितले असते, तर गिऱ्हाइकाचा त्याच्यावरील विश्वास वाढला असता. तो खरेदीसाठी आवर्जून तुमच्याकडेच आला असता. इतरांनाही त्याने सांगितले असते की, ‘तो एक अमुक अमुक दुकानदार खूप प्रामाणिक आहे, तुम्हाला फळं ध्यायची असतील तर त्याच्याकडेच जा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
