यशाचे गुपित
१. स्वतःला ओळखा (Who am I?) – माझा जन्म कशासाठी झाला आहे, मरण्यापूर्वी मी काय करणार आहे, हे एकदा मनाशी निश्चित करा. मानवी जन्माचे संपूर्ण सार्थक झाले पाहिजे, असे काम माझ्या हातून
घडले पाहिजे, असा निश्चय करा. यासाठी आधी स्वतःच स्वतःला काही प्रश्न विचारून उत्तरे मिळवा. स्वतःला जिंकायचे असेल, तर डोक्याचा, बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर करा. इतरांवर विजय मिळवायचा असेल, तर हृदयाचा वापर करा. कीर्ती व पराक्रम हेच खरे मानवाचे दोन डोळे आहेत.
२. ३ टक्क्यांत या यश मिळविणे म्हणजे फक्त पैसा कमवणे नाही. ९७ टक्के लोक पैसा म्हणजे यश समजून पैशाच्या मागे धावत असतात. परंतु पैसा हा उरलेल्या ३ टक्के लोकांच्या मागे स्वतःहून धावत येतो. हेच आजचे वैश्विक सत्य आहे. याच ३ टक्के लोकांकडे पैसा येण्याचे कारण म्हणजे ते फक्त पैशासाठी काम करीत नाहीत. ते काम हे त्यांच्यासाठी passion (आवड) असते. जीव ओतून काम करतात, म्हणूनच पैसा न मागता या ३ टक्के लोकांकडे जातो. खरे तर हेच ३ टक्के लोक जगावर राज्य करीत असतात. कोणत्याही क्षेत्रात हे टॉपचे ३ टक्के लोकच अमाप पैसा तसेच मानसन्मान, प्रतिष्ठा सर्व काही मिळवितात. उरलेला सगळा गाळच असतो. हेच उरलेले ९७ टक्के लोक याच ३ टक्के लोकांकडे पाहून, त्यांनाच आदर्श मानून व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पळत असतात.
३. आवड (Passion) २००२ साली आपला क्रिकेटचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. एका टेस्ट मॅचमध्ये भारताचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे बंटिंग करत असताना वेस्ट इंडिजच्या एका जलदगती गोलंदाजाचा वेगवान बाउंसर कुंबळेच्या चेहऱ्यावर आदळला, प्रचंड वेगाने आलेल्या त्या चेंडूमुळे कुंबळेच्या जबड्याचा वेध घेतला. तो जागेवरच कोसळला. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. जबडा तुटलेल्या अवस्थेत त्यावर बँडेज करून दुसऱ्या दिवशी कुंबळेने गोलंदाजी केली. त्याने जखमी अवस्थेत गोलंदाजी करीत १४ षटके टाकली व वेस्ट इंडिजच्या ४ विकेट्सही घेतल्या. यानंतर पुन्हा फलंदाजीची वेळ आल्यावरही कुंबळेने अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. याला म्हणतात Passion. खेळाप्रती प्रचंड आवड व समर्पित भाव काय असतो, हे या उदाहरणातून कुंबळेने दाखवून दिले. खरे तर जायबंदी झाल्यावर कुंबळे उर्वरित सामना न खेळता सेव्हन स्टार हॉटेलमध्ये आपल्या खोलीत आरामात बसू शकला असता. पण त्याने देशासाठी, संघासाठी झोकून दिले. इतके Passion दाखविल्यानंतर मानसन्मान, कीर्ती, पैसा कुंबळेला का नाही मिळणार? त्याने स्वतःच्या कार्याबाबत १०१ टक्के सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. त्यामुळेच तो कसोटी क्रिकेटमध्ये सहाशेहून अधिक बळी मिळविणारा ठरला. भारतातर्फे त्याचा हा विक्रम आजही कायम आहे.
४. बीज शुद्ध करा (Mind) बीज म्हणजे बी. म्हणजेच आपले अंतर्मन, हे शुद्ध व सामर्थ्यवान असले पाहिजे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी।’ हे संतवचन आपल्याला माहीतच आहे. म्हणजे बीज शुद्ध असले, तर फळेही चांगलीच येतात. ‘बोया बीज बबूल का, आम का फल कहाँसे आये?’ यासाठी बीज महत्त्वाचे असते. म्हणजे आपले मन महत्त्वाचे असते. ते पॉवरफुल असेल, तर अर्धे यश, अर्धी लढाई जिंकल्यातच जमा असते. म्हणूनच असेही म्हटले जाते की, युद्ध आधी मनात जिकावे लागते, मगच रणांगणात प्रत्यक्ष यश मिळते.
मोठे यश मिळवायचे असेल; तर आपल्या मनालाही एखाद्या बीजाप्रमाणे जपले पाहिजे, त्याला चांगले खतपाणी घातले पाहिजे. झाड जितके मोठे असते, तितके त्याचे बीज लहान असते. वडाचे झाड सर्वात मोठे, डेरेदार असते, त्याचे बी फक्त सुपारीच्या आकाराचे असते. नाराळाचे झाड सरळसोट असते, वरच्या बाजूला थोडीच पाने असतात. पण त्याचे बीज म्हणजे नारळ खूप मोठे असते. आपल्या विचाररूपी बीजाला मनाला असेच एखाद्या चांगल्या कार्यासाठी गाडून घ्यावे लागते. त्यातूनच यशरूपी कोंब बाहेर येतो, पुढे जाऊन तो फुलतो, बहरतो व त्याचे रूपांतर ‘मेगा सक्सेस’ रूपी मोठ्या वृक्षात होते.
५. ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन (Knowledge, Skill, Attitude) बीजारोपण व्यवस्थित झाल्यावर त्यातून कोब फुटतो. त्याचे व्यवस्थित संवर्धन करणे आवश्यक असते. मनरूपी कोंबाला ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन
याचे खतपाणी घालणे महत्वाचे असते, ते लहान असल्याने त्याच्यात काही व्हायरसरूपी कुविचार, किडे असे रोग पहायला नको असतात. पडल्य तरी ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोनाचा फवारा मारत राहिल्यास यशरूपी मोठे झाड निर्माण होतेच होते.
६. विश्वास (Belief) ध्येयावर विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे असते. आपले ध्येय, गोल यावर १०१ टक्के विश्वास प्रगट करीत रहा. ‘जगात अनेकांनी मोठे यश मिळविले आहे, मग मीसुद्धा ते मिळवू शकतो, नव्हे भी ते मिळविणारच!’ असा आत्मविश्वास मनात जागा करा. यासाठी त्या त्या क्षेत्रातील सर्वोच्च स्थानावर असलेल्या व्यक्तींना कायम नजरेसमोर ठेवा. त्यांच्या जागी तुम्ही पोहचला आहात, असे दृष्य मनःपटलावर सतत आणत जा. सावित्रीला असाच विश्वास होता, म्हणूनच तिने यमाच्या तावडीतून सत्यवानाचे प्राण परत आणले. अंतर्मनाला सतत सांगा, ‘माझे ध्येय तर सावित्रीइतके अवघड निश्चितच नाही. मग भी ते सहज मिळवू शकतो.’
‘मुत्राभाई एमबीबीएस’ चित्रपट आपण बहुतेकांनी पाहिला आहे. या चित्रपटातील कोमात असलेला आनंदभाई आपल्याला नक्की आठवत असेल, त्याला आपला मुन्नाभाई विश्वासाच्या जोरावरच पुन्हा माणसात आणतो. वास्तविक आनंदभाई, त्याचे कोमात जाणे व चमत्काराप्रमाणे तो पुन्हा चालू बोलू लागणे ही काल्पनिक नसून सत्य गोष्ट आहे. १९५४ मध्ये अमेरिकेत अशीच एक सत्यघटना घडली. तिचे एका रुग्णालयात आनंदभाईसारखेच अठरा रुग्ण चार वर्षांपासून कोमात होते. डॉक्टर मंडळींनी प्रयत्नांची शर्थ करूनही ते कोमातून बाहेर येत नव्हते. परंतु मेडिकलचा अभ्यासक्रम शिकण्यास आलेल्या एका विद्यार्थ्याला कायम विश्वास वाटत होता, ते रुग्ण बरे होतील. त्या विद्यार्थ्याने चार वर्षे आपला अभ्यासक्रम पूर्ण करताना त्या रुग्णांसाठी अथक प्रयत्न केले आणि तो त्यात यशस्वीही झाला. यालाच विश्वास म्हणतात.
७. लोक काय म्हणतील? मराठी माणूस व यश यांच्यामध्ये येणारा हा सर्वात मोठा मुद्दा आहे. यालाच ‘एलकेके’ असेही म्हणतात. म्हणजे ‘लोग क्या कहेंगे?’ मला या निमित्त राजेश खन्नाचे एक गाणे आठवते. ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना… छोडो बेकार की बातों में कहीं बित न जाए रैना’ किती अर्थपूर्ण गाणे आहे हे. लोक तर बोलतच राहणार, त्यांना त्यांचे काम करू द्यावे, आपण आपल्या लक्ष्यापासून विचलित व्हायचे नाही. लोक घोड्यावर बसू देत नाहीत पायीही चालू देत नाहीत, किंवा घोड्याला डोक्यावरही घेऊ देत नाहीत, ही गोष्ट आपण प्रत्येकाने लहानपणीच ऐकली, वाचलेली असेलच.
आपल्या महाराष्ट्रातील पाण्याची परिस्थिती पाहता, मराठी माणसाचे धोरण हे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असेच असले पाहिजे. दुर्दैवाने आपले धोरण असते, ‘याला अडवा, त्याची जिरवा,’ अशा जिरवाजिरवीत मराठी माणसाचा हात कोणीच धरू शकत नाही. इतर व्यापारी समाज मराठी माणसाच्या या नसत्या उद्योगाची मजा पाहत असतो. म्हणूनच लोक काय म्हणतील, याची चिंता करण्यापेक्षा आपल्या उद्दिष्टाची, आपल्या परिवाराची चिंता करा. तुम्ही एखादे काम करीत असाल, तर कोणी तरी तुमच्याकडे येतो. तो म्हणतो, “तो अमुक तमुक तुला असं म्हणत होता. माझं काही नाही, पण तो म्हणत होता.” असे बोलणाऱ्या व्यक्तीला जरा आडबाजूला घेऊन जा. त्याच्या मागील सीटवर (टिंगारीवर) दोन चांगले सणसणीत फटके ठेवून द्या. तो लगेच नरमेल आणि सांगेल, “दुसरं कोणी नाही, मीच तुमच्याबद्दल असं असं बोलत होतो, पण पलटी खाऊन.”
चांगलं काम न पाहवणारी दोन-चार टाळकी तुम्हाला जागोजागी भेटतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. रस्त्यावरून जाताना कुत्रे भुंकल्यावर जसे आपण दुर्लक्ष करतो किंवा कुत्र्यांना पावबिस्कीट टाकून पुढे चालत राहतो, तसेच आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करताना अशा नकारात्मक बाबींना खूप
गांभीर्याने घ्यायचे नसते.
८. कल्पनाशक्तीची ताकद (Power of Imagination) परमेश्वराने माणसाला दिलेली सर्वात मोठी ताकद कोणती असेल, तर ती कल्पनाशक्तीची. ‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ इतकी ताकद मानवी मनाच्या कल्पनाशक्तीत आहे. माझ्या मते विविध व्यावसायिकांमध्ये इंजिनिअरचे काम खूप अवघड असते. त्याच्या कल्पनाशक्तीवरच मोठमोठ्या गोष्टी साकार होऊ शकतात. कारण एखादा वकील किंवा डॉक्टर असेल, तर तो पुस्तकात शिकल्यानुसारच त्याचे कर्तव्य बजावतो. पण इंजिनिअरिंगचे तसे नसते. तो पुस्तकातून जरूर शिकतो; पण जेव्हा प्रत्यक्ष काम करायची वेळ येते, तेव्हा त्याची कल्पनाशक्तीच कामी येते. मोठमोठ्या इमारती, कारखाने, रेल्वेमार्ग, तलाव, धरणे, कालवे, भुयारी रेल्वे, मेट्रो, बोगदे तयार करताना इंजिनिअर आधी कल्पनाशक्तीने ते बांधकाम मनात आणतो. अनेक शक्यतांचा विचार करतो. मगच ते कागदावर व नंतर प्रत्यक्षात उतरवितो. एखादे धरण किया तलाव बांधायचे असेल, तर त्याला एकूण पावसाचा अंदाज आधीच घ्यावा लागतो. जसा पाऊस पडेल, तशी धरणाची भिंत इंच इंच बांधणे शक्य नसते. पाणी वाहून नेणारे कालवे बांधतानाही असेच बारीक, आखीव रेखीव नियोजन करावे लागते. आधी पाणी सोडून नंतर कालवे बांधता येत नाहीत. इमारती, घर बांधताना दरवाजा नेमका कुठे असावा, खिडक्या कोणत्या दिशेला असाव्यात हे सगळे आधीच ठरवावे लागते. हे काम कसेही करून चालत नसते. कोणत्याही कामाचा सखोल अभ्यास करणे, कच्चा आराखडा तयार करणे, ड्रॉइंग, स्केचेस साकारणे, मग मॉडेल तयार करणे अशी कामे इंजिनिअरला करावी लागतात. यासाठी तो आधी कल्पना करतो, नंतर ती प्रत्यक्षात उतरवितो. कोणत्याही क्षेत्रातील यशासाठी अशी कल्पनाशक्ती महत्त्वाची असते. आधी तुम्हाला जो व्यवसाय करायचा, त्याची कल्पना मनात आणायची, व्यवस्थित प्लॅनिंग करायचे व नंतर ते प्रत्यक्षात आणायचे असते. आपल्या व्यवसायाचे आपणच परिपूर्ण इंजिनिअर बनायचे असते.
९. सादरीकरण (Power of Presentation) व्यवसाय करताना तुमचे उत्पादन किंवा सेवा याचे व्यवस्थित सादरीकरण आवश्यक असते. असे म्हणतात, ‘बोलणाऱ्याचे हुलगे विकले जातात, पण न बोलणाऱ्याचे गहूही विकले जात नाहीत.’ म्हणूनच आपल्या सेवेचे, उत्पादनाचे सादरीकरण, अॅण्डिंग महत्त्वाचे असते. जादूगार भैरव हे नाव अनेकांनी ऐकले असेल, त्याचे खेळही पाहिले असतील, साधारण वीस वर्षांपूर्वी जादूगार भैरव यांचा प्रयोग मी नगरमध्ये पाहिला. ‘स्पीड आणि स्पीचचा बादशहा’ अशी ओळख निर्माण करणारा जादूगार भैरव जेव्हा स्टेजवर प्रवेश करतो, तेव्हा त्याचा पहिलाच डायलॉग असतो, “हां हां, मैं मुसलमान हूं, लेकिन गर्व से कहता हूं कि मैं हिंदुस्तानी मुसलमान हूं.” हा डायलॉग तो अशा आवेशात म्हणतो की, संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. यालाच म्हणतात First impression is last impression. तुम्हालाही तुमच्या उत्पादनाचे, सेवेचे असे फर्स्ट इंप्रेशन, छाप पाडता आली पाहिजे. यासाठी आधी स्वतः शिकले पाहिजे, तसे कसब आत्मसात केले पाहिजे.
एका गावात एक साधू होता. एका मुलाची आई साधूंकडे गेली व म्हणाली, “माझा मुलगा खूप गूळ खातो, काहीही करून त्याची ही सवय सोडायचा उपाय सांगा.” साधूने विचार केला व त्या मातेला सांगितले, “उद्या ये.” ती परत आल्यावर त्याने पुन्हा तिला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. असे जवळजवळ दहा दिवस चालले. शेवटी ती वैतागली व म्हणाली, “तुम्ही मला उपाय तर सांगत नाही, पण रोज ‘उद्या ये, उद्या ये’ करता.” त्यावर साधू उत्तरला, “बेटा, मीसुद्धा कालपर्यंत गूळ खूप खात होतो, आधी मी स्वतः ती सवय सोडायचा प्रयत्न केला. म्हणून तुला नंतर यायला सांगत होतो.” या गोष्टीवरून बोध नक्कीच घेतला पाहिजे. आधी स्वतः परिपूर्ण व्हायचे व मगच इतरांना सांगायचे.
१०. मला काय मिळणार? आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, ते करताना प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न नक्की विचारला पाहिजे, ‘या कामातून मला काय मिळणार आहे किंवा मी काय मिळवू इच्छितो?’ लोक
करतात म्हणून आपणही ते काम करतो, अशी वृत्ती उपयोगाची नाही. प्रत्येकाची आवडनिवड, जन्मजात गुण, सवयी वेगवेगळ्या असतात. आपण जे काम करतो, त्याची किमत आपल्याला कळली पाहिजे. नव्वद टक्के लोकांना आपल्या कामाची किमतच कळत नाही. काम कशासाठी करायचे, त्यातून काय मिळवायचे, हे एकदा कळले की, आवड निर्माण होईल. या आवडीतूनच तुम्ही संबंधित क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्याल.
११. प्रेमाने संवाद साधा यश मिळवायचे असेल, तर लोकांशी प्रेमाने वागले पाहिजे. न पटणारी गोष्ट प्रेमाने समजावून सांगितली, तर वाद टळतात व कार्यसिद्धी होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेत वकिली करीत होते. त्यांचा मुलगा सतरा वर्षांचा होता व तो नेहमी गांधीजीकडे कार चालविण्यासाठी हट्ट धरायचा. एकदा कारची सर्व्हिसिग करायची असल्याने गांधीजी त्याला बरोबर घेऊन गेले. स्वतः कोर्टात उतरले व मुलाला सांगितले, “गॅरेजमध्ये जाऊन कार सर्व्हिसिंग कर आणि कोर्ट सुटायच्या वेळेपर्यंत पुन्हा मला घ्यायला ये. आपण बरोबरच घरी जाऊ,” गांधीजींचा मुलगा कार घेऊन गॅरेजमध्ये गेला. त्या दिवशी विशेष गर्दी नव्हती. त्यामुळे त्याच्या कारची सर्व्हिसिंग लवकर झाली. कोर्ट सुटायला तर खूप अवकाश होता. त्यामुळे मुलगा कार घेऊन फिरायला गेला, नंतर मित्राबरोबर चित्रपट पाहायला गेला. या नादात त्याला वेळेचे भान राहिले नाही. सायंकाळी सहा वाजता शो संपल्यानंतर त्याला आठवले, कोर्ट तर पाच वाजताच बंद झाले असेल. बापू वाटत पाहत असतील. तो जोरात कार चालवत कोर्टात पोहचला. गांधीजी कोर्टाच्या आवारातच येरझारा घालत होते. मुलगा दिसल्यावर त्यांनी विचारले, “अरे, किती उशीर केलास? कुठे होतास इतका वेळ?” मुलगा आधीच घाबरलेला होता. तो म्हणाला, “आज गॅरेजवर खूप गर्दी होती, त्यामुळे कार सर्व्हिसिंगलाच उशीर झाला.” महात्मा गांधीना त्याचे उत्तर ऐकून धक्काच बसला. ते म्हणाले, “अरे, तू एकटा कार घेऊन गेल्यामुळे मी काळजीत होतो. त्यामुळे पाच वाजता कोर्ट सुटताच मी रिक्षाने गॅरेजवर गेलो. तिथे कळलं, तू लवकरच कार घेऊन गेलास.” मुलगा खजील झाला, आपले खोटे पकडले गेल्याने तो कावराबावरा झाला. अशा वेळी इतर कोणी बाप असता, तर त्याने मुलाला सडकून काढले असते. पण गांधीजी मनाशी म्हणाले, ‘माझ्या संस्कारातच काही तरी कमतरता राहिली, म्हणून मुलगा आपल्याशी खोटं बोलला.’ ते म्हणाले, “या खोटेपणाची शिक्षा तुला नाही तर मलाच मिळाली पाहिजे.” म्हणून ते सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या घराकडे पायी निघाले. मुलाला आपल्यामागे कार घेऊन येण्यास सांगितले. सतरा किलोमीटरची परेड करीत गांधीजी रात्री अकरा वाजता घरी पोहचतात. मुलगाही त्यांच्यामागे गाडी चालवीत आला. घरी आल्यावर तो ढसाढसा रडू लागला. गांधीजींची माफी मागून त्याने ‘पुन्हा आयुष्यात काहीही झालं तरी खोटं बोलणार नाही,’ असे वचन दिले. मारून, दम देऊन जी गोष्ट झाली नसती, ती गांधीजींनी प्रेमाच्या मार्गाने करून दाखविली.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
