‘लग्नाची बेडी’ अन् ‘उद्याचा संसार’…
पहिला ट्रक आणि सासऱ्यांची शिकवण
माझे लग्न झाल्यावर घडलेला आणखी एक प्रसंग आवर्जून सांगण्यासारखा आहे. त्या प्रसंगात मला सासऱ्यांकडून एक मोठा धडा मिळाला. माझी औरंगाबादला नोकरी व्यवस्थित चालू होती. तिकडे माझे थोरले बंधू गावाकडे कारभारी झाले होते. राजकीय मंडळींमध्ये त्याची उठबस असायची. कडा साखरकारखाना जोरात होता. त्यावेळी त्यांच्या डोक्यात आले, आपण एखादा ट्रक घ्यावा व कारखान्यावर लावावा. त्यापूर्वी आमची ट्रॅक्टर ट्रॉली कारखान्यात जात होती. वडील बंधूंना कळले होते की, माझ्या सासुरवाडीकडील एक जुना ट्रक त्यांना विकायचा आहे. त्याने ही गोष्ट वडिलांना सांगितली. त्यांना ट्रक घेतल्यावर होणारे फायदे पटवून दिले. वडीलही तयार झाले. त्या दोघांनी मला औरंगाबादहून नगरला माझ्या सासुरवाडीला बोलावून घेतले. आम्ही गप्पा मारत असताना वडिलांनी व भावाने ट्रकचा विषय काढला. “सध्या काही पैसे देतो, उरलेले नंतर देतो, तुम्ही आम्हाला ट्रक द्या.” असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. माझे सासरे मात्र जागेवरच ‘नाही’ म्हणाले. ते म्हणाले, “आम्हाला सगळ्यांना मिळून तेरा मुली व चार बहिणी आहेत. आम्ही एक तत्त्व कायम पाळलं आहे, ते म्हणजे मुलीशी, बहिणींशी म्हणजे पाहुण्यांशी आर्थिक व्यवहार करायचे नाहीत.” त्यांचा असा स्पष्ट नकार ऐकल्यावर भाऊ, वडील चिडले. ते तिथून बाहेर आले. मला म्हणाले, “काय तुझे सासरे? जावयाची अजिबात किंमत नाही त्यांना.” मलासुद्धा सासऱ्यांचे हे वागणे पसंत पडलेच नव्हते. मी रागातच त्यांच्याकडून निघालो व थेट औरंगाबादला पोहचलो. नंतर काही दिवसांनी सासरे माझ्याकडे औरंगाबादला आले. माझा राग कमी झालेला नव्हता. शेवटी त्यांनी मला शांतपणे सांगितले, “मी तुम्हाला ट्रक फुकटही देतो. मला त्याचं काही नाही. पण एक सांगतो, तुमचा भाऊ आज ट्रक घेऊन जाईल, पण पैसे देणार नाही. ते तुम्हालाच द्यायला लावेल.” मी म्हणालो, “तसं काही होणार नाही. माझा विश्वास आहे त्याच्यावर.” माझा आग्रह पाहिल्यावर सासरे ट्रक द्यायला तयार झाले.
आम्ही काही पैसे त्यांना दिले. त्यानुसार एमटीडी ४०४० हा ट्रक आमच्या दारात आला. सर्वात थोरले बंधू पांडुरंग यांनी तो ट्रक कारखान्यावर लावला. त्याचे चांगले पैसेही मिळू लागले. त्याआधी भगवानरावने गावात पहिली दूध डेअरी सुरू केली होती. यासाठी सहकारी संस्था स्थापली होती. भगवानराव चेअरमन झाले व मोठे बंधू पांडुरंग यांचा मुलगा विजय धुमाळ त्या दूध संस्थेचा सेक्रेटरी बनला होता. पुढे तो महाराष्ट्र शासनाच्या सेवेत एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून नोकरीला लागला, ट्रॅक्टर, दूध डेअरी व आता ट्रक असा गावातील कारभाराचा व्याप चांगला बावत होता. या दरम्यान आम्ही एक पाईपलाईन केली, नदीवरून दीड ते दोन हजार फुटांची पाईपलाईन केली. शेती विकसित केली. घरी भाांना दूध उत्पादनासाठी गायी घेऊन दिल्या. हे सगळे मी बँकेकडून कर्ज कावून करीत होतो. शेवटी मला नोकरी मिळाली असली, तरी शेती फुलावी, गावाकडे सगळे रांगेला लागावे, असे मला वाटत होते. त्यामुळे मी कर्ज काढून शेतीत गुंतवत होतो. हे करीत असताना ट्रकचे उरलेले पैसे द्यायची वेळ आली, तेव्हा सासऱ्यांनी वर्तविलेले भाकीत खरे ठरल्याचा अनुभवही मी घेतला. त्याचे काही नाही, पण सासऱ्यांच्या दूरदृष्टीची, अनुभवाची प्रचिती मला यानिमित्ताने आली.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
