‘लग्नाची बेडी’ अन् ‘उद्याचा संसार’…
आणि सुनंदाने नॉनव्हेज खाणे सोडले
टिळा झाल्यावर लग्नाची तारीख ठरविण्यात आली. ११ मे १९८०. दोन दिवस आमचा लग्न सोहळा चालला. त्याकाळी तशी प्रथाच होती. त्यावेळी लग्नानंतर सोळाव्या दिवशी सत्यनारायण पूजा केली जायची. त्यालाच ‘सोळावा’ म्हणत. तो झाल्यावर मी पत्नीला घेऊन औरंगाबादला आलो. तोपर्यंत मी पूर्वी रहायचो त्याच ठिकाणी २५ ऐवजी ४० रुपये महिना असलेली जरा मोठी खोली भाड्याने घेतली होती. लहान भाऊ विक्रम माझ्यासोबत होताच. आमची खोली बऱ्यापैकी लहान होती. त्यामुळे लग्नात पत्नीला मिळालेले गृहपयोगी
साहित्यही तिथे बसले नव्हते. नवीनच सोयरीक असल्याने एकमेकांच्या चालीरीती समजून घेत होतो. मराठा समाजातील असलो, तरी आमच्याकडे संपूर्ण शाकाहार असायचा. गावच शाकाहारी होते. सुनंदाकडील सगळे नॉनव्हेज खाणारे होते. सुनंदालाही ते आवडायचे. त्यावरून एकदा एक चांगलाच वादाचा प्रसंग उद्भवला, सुनंदाचा भाऊ प्रकाश दादासाहेब जाधव हा त्यावेळी औरंगाबाद येथेच मेडिकल कॉलेजला होता. तोसुद्धा खोली घेऊन राहायचा, एकदा त्याने नॉनव्हेज तयार करून बहिणीला आवडते म्हणून ते आमच्या खोलीवर आणले. सुनंदाने ते आनंदाने खाल्ले व उरलेले तसेच भांडभात ठेवून दिले. मी बँकेत होतो. तोपर्यंत विक्रम खोलीवर आला व त्याने भांडपात नॉनव्हेज पाहिले. झालं मी घरी आलो आणि विक्रमने एकच कल्ला केला, “आपल्या खोलीत नॉनव्हेज आलंय, मी आता काही इथं राहत नाही. मी चाललो गावाकडं, सगळ्यांना सांगणार.” मी या गोष्टीनं धास्तावलो. विक्रम गावाकडे जाऊन काहीबाही सांगेल, तर नंतर मलाच मनस्ताप सहन करावा लागेल. मीसुद्धा नॉनव्हेज घरात आल्याने रागावलोच होतो. मी ते मटणाचे पातेले उचलले आणि बाहेर फेकून दिले. सुनंदाला सांगितले, “असं नॉनव्हेज पुन्हा या घरात नको. तुला खायचंच असेल, तर तुला तुझा मार्ग मोकळा आहे. तू माहेरी जाऊन काय खायचं ते खा. माझ्याकडे असं अजिबात चालणार नाही.” माझा रुद्रावतार पाहून सुनंदाही घाबरली. विक्रमलाही बरे वाटले. या घटनेमुळे सुनंदाने त्या दिवसापासून पुन्हा नॉनव्हेजला हात आणि तोंड लावले नाही.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
