‘लग्नाची बेडी’ अन् ‘उद्याचा संसार’…

‘लग्नाची बेडी’ अन् ‘उद्याचा संसार’…

 

एके दिवशी सुनंदाने घरी नॉनव्हेज केले. माझा लहान भाऊ विक्रम त्यावेळी आमच्याबरोबरच राहायचा, वहिनीने नॉनव्हेज केल्यामुळे त्याने खूप कल्ला केला. मी ते मटणाचे पातेले फेकून दिले.

 

मराठवाडयातील एका सर्वसाधारण गावातून शिक्षणासाठी औरंगाबादला आल्यावर मला कधीच वाटले नव्हते, माझ्या करिअरची सुरुवातही याच शहरात होईल. पण स्टेट बँकेत कॅशियरची नोकरी मिळाली आणि मी औरंगाबादेत स्थायिक झालो. त्या काळच्या प्रथेप्रमाणे नोकरी मिळाल्यावर छोकरी मिळण्याचाही मार्ग जरा जास्तच सुकर झाला. नोकरी लागल्याने मी औरंगाबादलाच स्थिरस्थावर होत असताना गावाकडे माझ्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, औरंगाबादला मी माझ्या लहान भावाला विक्रमला सोबत नेले होते. मी शिकत असल्यापासून तो माझ्याबरोबरच होता. त्याला आठवीला हायस्कूलसाठी देवगिरी हायस्कूलला प्रवेश मिळवून दिला होता. विक्रम आमच्या घरातील सर्वात धाकटा. त्यामुळे जरा जास्तच लाडाकोडात वाढलेला. त्याला शाळा शिकायची तितकी आवड नव्हती. त्यामुळे मी त्याला मारूनमुटकून अभ्यासाला बसवायचो. त्याच्यासाठी स्वयंपाक करणे, त्याला जेवूखाऊ घालणे सगळे मी करायचो. या काळात माझा आणखी एक भाऊ हनुमान नॉनमॅट्रिक होऊन शेतीवाडीचे काम करायला लागला. आजोबांनी त्याला आमच्या पिठाच्या गिरणीवर बसविले. त्याची शाळा कायमची सुटली होती. विक्रमचे तसे होऊ नये, त्याने शिकावे म्हणून मी त्याला माझ्याबरोबर ठेवले होते. कधी कधी अभ्यास करीत नसल्यास मी त्याला स्वयंपाकाच्या उलथण्याने मारायचोही. बळजबरीने का होईना त्याला मी शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले व तो मॅट्रिक उत्तीर्ण झाला. पुढे त्याला कॉलेजमध्येही प्रवेश मिळवून दिला.

जुळून आल्या रेशीमगाठी

आम्ही दोघे भाऊ इकडे औरंगाबादेत असताना घरी माझ्यासाठी वधुसंशोधन सुरू होते. मी बँकेत नोकरीला असल्याचे कळल्याने लग्नाच्या बाजारात माझा भाव चांगलाच वधारला होता. त्याकाळी शेतकरी कुटुंबात काही जुन्या परंपरा होत्या. मुलगी करायची, तर पहिली पसंती मामाच्या मुलीला असायची. त्यातही गावातल्या गावात किंवा अगदीच लांब म्हटले तर गावापासून पाच-दहा किलोमीटरच्या परिघात सोयरीक केली जायची. त्या काळात हुंड्याची प्रथाही होती. तशी ती आजही आहे, पण कायद्यामुळे हुंड्याऐवजी त्याला आता ‘वरदक्षिणा’ असे गोंडस नाव देण्यात आले आहे. लग्नाच्या बाजारात नवरदेव उभा राहिला की, त्याच्याकडील जमीनजुमला, नोकरी तीही सरकारी आहे का याचे मोजमाप व्हायचे. बैलाच्या बाजारात जसा बैल उभा केल्यावर त्याच्यावर बोली लावली जाते, तसाच काहीसा प्रकार असायचा. मी तर स्टेट बँकेत नोकरी असलेला होतो. त्यामुळे माझ्यावर अनेकांच्या नजरा होत्या. परंतु म्हणतात ना की, लग्नाच्या रेशीमगाठी या स्वर्गातच बांधल्या जातात. त्याप्रमाणे माझे लग्न जुळले ते आमच्या गावापासून सुमारे शंभर सव्वाशे किलोमीटर लांब असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मिरीजवळील शंकरवाडी या गावातील जाधव कुटुंबातील मुलीशी. नेवासा व पाथर्डी तालुक्यांच्या सीमेवरील या
गावातील प्रतिष्ठित व मोठा बैलबारदाना असलेल्या कुटुंबात माझी सोयरीक जुळली. ही लग्नगाठ जुळताना किती योगायोग जुळून आले, हेही सांगितलं पाहिजे. माझ्यापेक्षा मोठे बंधू भगवानराव यांचेही त्याच वेळी लग्न निश्चित झाले होते. नगर तालुक्यातील मठपित्री येथील रावसाहेब बोरकर यांच्या पुतणीशी भगवानरावचे लग्न ठरले होते. बोरकर पाटील तेव्हा नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. तालुक्यातील एक मोठे प्रस्थ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा व माझे सासरे दादासाहेब दगडूजी जाधव यांचा परिचय होता. दादासाहेब जाधव हे जिल्हा परिषदेत कृषी अधिकारी होते. त्या दोघांच्या बोलण्यात स्थळाचा विषय निघाला व माझे नाव पुढे आले. बोरकर स्थांना घेऊन आमच्या गावी आले. त्यांनी आमचे घर, माडी, शेतीवाडी सगळे पाहिले. मुक्कामालाही थांबले होते. सकाळी लवकर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आमच्या आईने पाहुणचार करायचा म्हणून भल्या पहाटे चारलाच उठून डाळीचे लाडू, भात असे सणवाराप्रमाणे जेवण केले. पाहुणे आधीच आमचे घरदार पाहून मनातून खुश झाले होते. त्यातच आईच्या सरबराईने व एकूणच घरातील वातावरणामुळे त्यांनी लगेच होकारही दिला. हे सगळे त्यांनी मला प्रत्यक्ष पाहिले नसताना होत होते. त्या काळी तशी पद्धतच होती. मुलगा किंवा मुलगी दोघांच्याही पसंतीपेक्षा घरच्यांची पसंती महत्त्वाची असायची. मुलीकडच्यांनी होकार सांगून मुलगी पाहण्यासाठी माझ्या वडिलांना निमंत्रण दिले. त्यानुसार माझे मामा, वडील व भाऊ मुलगी पाहण्यासाठी शंकरवाडीला गेले. त्यांनी मुलगी पाहिली. माझ्या सासऱ्यांचे वडील दगडूजी लाडूजी जाधव पाटील ही त्यांच्या पंचक्रोशीतील बडी असामी होती. नगरमधील अनेक व्यापाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. गावातही त्यांचा दरारा होता. जमीनजुमलाही आमच्यापेक्षा खूप जास्त होता. मोठे कुटुंब होते. माझ्या वडिलांनी, मामांनी हे सगळे पाहून त्यांच्या मुलीला होकार दिला. लगेचच बैठक घेतली व लग्नातील देण्याघेण्याचे ठरविले. मी आधी सांगितल्याप्रमाणे त्याकाळी हुंड्याची बोलाचाली आधी व्हायची. मुलीकडच्यांनी हुंड्याचे विचारल्यावर वडिलांनी सांगितले, “पन्नास हजार रुपये रोख आणि लग्न संध्याकाळी करून द्यायचं. लग्नात नवरदेवासाठी लाईटची गाडी पाहिजे.” त्याकाळी खेड्यापाड्यात बीज एवढी पोहचली नव्हती. त्यामुळे बड्या घरच्या लग्नांत नवरदेव लाईटिंग असलेल्या गाडीत पारण्याला नेला जात असे. त्याची शान वेगळीच असायची. “बाकी लग्नकार्य तुमच्या पद्धतीनं चांगलं लावून द्या,” असे वडिलांनी त्यांना सांगितलं. समोरच्यांनी हसतहसत लगेचच या गोष्टींना मान्यता दिली. अपेक्षेपेक्षा अर्धेच मागितले, म्हणून समोरच्यांनीही खुशीत होकार दिला.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!