‘लाईफ लाईन’ने सबकी लाईफ बना डाली…

‘लाईफ लाईन’ने सबकी लाईफ बना डाली…

विमानप्रवास, क्रूझ सफारी व परदेश वाऱ्या

आमच्या कंपनीत आम्ही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना बोनस म्हणून आकर्षक गिफ्ट द्यायचो. वयाच्या बेचाळिसाव्या वर्षापर्यंत मी माझा वाढदिवस कधी साजरा केला नाही. पण आमच्या कंपनीतील काही मंडळींनी ठरविले, धुमाळ सरांचा प्रत्येक वाढदिवस अँड सेलिब्रेशन झाला पाहिजे. त्यानुसार मग दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आम्ही चारपाचशे मंडळींना तीन दिवस महाबळेश्वरला घेऊन जायचो. तिथे त्यांच्या निवासाची, भोजनाची, स्थळदर्शनाची व्यवस्था करायचो. सगळ्यांना महाबळेश्वरहून बसने प्रतापगडावर न्यायचो. तिथे आमचे काही गाईंडही ठरलेले असायचे. दुसऱ्या राज्यांतील लोकांसाठी हिंदी भाषेत वर्णन करणारे गाईड असायचे. शाहिरीच्या रूपात ते गाईड प्रतापगड व छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगायचे. प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. यानंतर पुन्हा महाबळेश्वरला येऊन दुपारनंतर माझ्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू व्हायचे. रात्री मुक्काम करून सगळेजण दुसऱ्या दिवशी आपापल्या गावी परतायचे. अशा कार्यक्रमांतून आमच्यात एक टीम स्पिरिट तयार व्हायचे. विशेष म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला भाषण करायला पूर्ण बंदी असायची. आमच्या टीममधील लोकच त्या दिवशी बोलायचे. माझ्याबद्दल, कंपनीबद्दल, त्यांच्या कामाच्या अनुभवाबद्दल दिलखुलास बोलायचे.

आमच्या कंपनीचे काम करणारे बहुतेक एजंट लहान शहरे, गावातील असायचे. त्यांनाही विमानात बसायची स्वप्ने पडायची. मी त्यांची ही इच्छा पूर्ण करायचे ठरविले. आम्ही औरंगाबाद, नांदेड, लातूर, सोलापूर, नाशिक, नागपूर, हैदराबाद, सुरत येथून त्यांची मुंबईसाठी विमान प्रवासाची सोय करायचो. मुंबईला मोल्यपूर त्यांच्या मुंबईदर्शनाची व एक दिवसाच्या मुक्कामाची सोय करायचो. दुसऱ्या दिवशी त्यांना विमानाने मुंबईहून पुण्याला आणायचो, त्याकाळी मुंबई-पुणे-दुबई अशा आंतरराष्ट्रीय रूटवर विमान धावायचे. मी त्या विमानात मुंबई ते पुणे अशी शंभर दीडशे तिकिटें बुक करायचो. ठरलेल्या दिवशी सकाळी आमची मंडळी विमानतलनाल यायची. इंटरनॅशनल फ्लाईट असल्याने तपासणी, चेक इनचे सोपस्कार पार पाडण्यासाठी तीन तास आधीच विमानतळावर यावे लागायचे. लोक आश्चर्याने आमच्या जत्थ्याकडे पाहायचे. मुंबई ते पुणे हा रस्ते प्रवास तीन तासांचा असताना ही मंडळी त्यापेक्षा जास्त वेळ विमानतळावर का घालवत असतील, असा प्रश्न त्यांना पडायचा. पण त्यांना काय माहीत, विमानात एकदा बसण्यासाठी आमची मंडळी तीन काय तीस तासमुद्धा विमानतळावर प्रतीक्षा करतील. मुंबई ते पुणे हा अवघ्या पंधरा-वीस मिनिटांच्या विमानप्रवासानेही आमची मंडळी खूप खूश व्हायची. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विमानप्रवासाचे अप्रूप दिसायचे. त्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद महा खूप समाधान देऊन जायचा.

विमानप्रवासाबरोबरच मी अनेकदा आमच्या कंपनीतील लोकांना मुंबई-गोवा-मुंबई ही क्रूझ सफारीही घडवायचो. स्टार क्रूझ लिखा या आलिशान क्रूझमध्ये सुमारे एक हजार जणांना घेऊन आम्ही समुद्रसफारीचा सेव्हन स्टार आनंद लुटला आहे, पाण्यावर चालणारे सेव्हन स्टार हॉटेलच असायचे ते. रात्रीच्या वेळी चांदण्यात समुद्रातून प्रवास करण्याचा तो अनुभव अवर्णनीय असायचा. एका वेळी जवळपास पाच ते सात हजार लोक त्या क्रूझमधून प्रवास करायचे. तिथून परत आल्यावर आमची मंडळी किमान सहा महिने त्या मंतरलेल्या अवस्थेत असायची. कंपनीमार्फत मी अनेक परदेशी सहलीही आयोजित केल्या. पाचशेहून अधिक लोकांना मी सिगापूर, मलेशिया, बँकॉक, पटाया अशा अनेक देशांची सैर घडविली. त्यांच्या परदेशप्रवासाचे स्वप्न पूर्ण केले. या कामी चैतन्य ट्रॅव्हल्सचे श्री. किशोर मरकड व श्रीपूजा इंटरनॅशनलचे श्री. निलेश वैकर यांचे सहकार्य लाभले.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!