‘लाईफ लाईन’ने सबकी लाईफ बना डाली…
टीम वर्क
लाईफ लाईनमध्ये मी सर्वात जास्त महत्त्व टीम वर्कला दिले. कारण मोठे काम करायचे, तर टीम वर्क महत्त्वाचे असते. मी स्वतः उत्तम भाषण करीत असे. कोणत्याही कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माझे भाषणच असायचे. पण मी सगळीकडे एकाचवेळी भाषण करू शकत नव्हतो. यासाठी माझ्या टीममधील प्रत्येकाने सभाधीट व्हावे, याकडे माझे कटाक्षाने लक्ष असायचे. रिसोड येथील श्री. डी. पी. गोरे आमच्या टीममध्ये होते. आज ते प्रभावी वक्ते म्हणून विदर्भात ओळखले जातात. ते मूळचे फोटोग्राफर होते. आमच्या कंपनीत एजंट म्हणून जॉईन झाले होते. मी एजंट किंवा फिल्ड ऑफिसरच्या मीटिंगमध्ये प्रत्येकाला स्टेजवर येऊन बोलायला लावायचो. एकदा औंढा नागनाथला प्रशिक्षण कार्यक्रम लावला होता. गोरे यांच्यासह अनेक जण होते. मी सगळ्यांना बोलायला लावले. पण गोरे तसेच बाकीचे काही जण घाबरत होते. मी समजावून सांगितले, ‘घाबरू नका’ म्हणालो. पण तरीही त्यांचे धारिष्ट्य होत नव्हते. मग मी गंभीरपणे जरा दम दिला, “तुम्ही जर बोलला नाही, तर मी तुम्हाला विहिरीतच ढकलून देईन.” यामुळे काही जण घाबरतच स्टेजवर गेले व बोलायला लागले. गोरेसुद्धा स्टेजवर पोहचले, पण त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. मी त्यांना धीर दिला, म्हणलो, “हातातील कागदावरचे तर वाचून दाखवा.” त्यांनी तसे केले. त्यांच्यात आत्मविश्वास आला. पुढे काही काळाने गोरे उत्तम वक्ता झाले. राजकारणातही गेले, तिथेही त्यांची भाषणं गाजू लागली. छायाचित्रकार म्हणून कॅमेऱ्यातून इतरांच्या चेहऱ्यावरील भाव नजाकतीने टिपणारे डी. पी. गोरे स्वतःच्या अंतरीचे भाव तितक्याच नजाकतीने आपल्या जिभेवर शब्दरूपाने खेळवू लागले. आजही कधी भेटले, तर ते त्या पहिल्या भाषणाची आठवण काढून माझे मनापासून आभार मानतात, असे हजारो व्यक्तिमत्त्वांमध्ये नेतृत्वाचे गुण पेरून त्यांना मोठे होताना पाहणे खूपच समाधानकारक आहे.
नक्षलीशी गाठ आंध्रप्रदेशातील करीमनगर, आदिलाबाद क्षेत्र हा नक्षलींचा प्रभाव असलेला परिसर होता, आजही आहे. एकदा कंपनीच्या मीटिंगनिमित्त त्या भागात गेलो होतो. एका गावातून दुसऱ्या गावात असा प्रवास सुरू होता. एके ठिकाणी मीटिंग संपायला रात्रीचे आठ वाजले. आम्ही पुढच्या मीटिंगसाठी जंगलातून असलेल्या रस्त्याने संबंधित गावात पोहचलो. तिथे गेल्यावर स्थानिक मंडळी आश्चर्याने आमच्याकडे पाहतच राहिली. आम्हाला काही समजेना, काय झाले ते. त्यावर त्यांच्यापैकी एकाने सांगितले, “तुम्ही आता ज्या रस्त्याने आला, त्या रस्त्याने दिवस मावळल्यावर कोणीही ये-जा करीत नाही, तो सगळा रस्ता नक्षलीचा वावर असलेला आहे. थोडी जरी शंका आली, तरी नक्षली लगेचच खून करतात.” ते ऐकून आम्हीही घाबरलोच। मनात म्हटले, ‘नक्षलींशी गाठ पडता पडता वाचलो आपण, शंभूमहादेवाचीच कृपा म्हणायची. ‘याच भागात आदिलाबादला एकदा कंपनीचा महाइनामी सोहळा होता. एका युवकाला आम्ही चांगल्या कामासाठी हिरो होंडाची दुचाकी बक्षीस दिली. ते बक्षीस घेताना त्याच्याबरोबर त्याची पत्नीही आली होती. गाडीची चावी घेताना ती सारखी रडत होती. कार्यक्रम संपल्यानंतर मी तिल्ला जवळ बोलावून विचारले, “का रडत होतीस सारखं?” त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून मी उडालोच. तिने सांगितले, “माझा नवरा पूर्वी नक्षली होता. एकदा तुमच्या मीटिंगला आला, तुमचं भाषण ऐकून तो इतका प्रभावित झाला की, त्याने ते काम सोडलं व तुमच्या कंपनीचं काम करू लागला. यातून आमची परिस्थिती खूप सुधारली आहे. आज तुमच्या हातून गाडीची चावी घेताना ते सर्व आठवलं.” हे ऐकून मला मनोमन खूप समाधान वाटले. आपल्या बोलण्याने मार्ग भरकटलेल्या एका तरुणाला जीवनाचा खरा मार्ग सापडला, याचा विशेष आनंद झाला. ‘क्रांती ही बंदुकीच्या गोळीने होते’ यावर माओवादी किंवा नक्षलवाद्यांचा ठाम विश्वास. त्यासाठी इतरांचे किंवा स्वतःचे रक्त सांडणे हा त्यांचा परिपाठ. परंतु वाक्चातुर्याने मी एकाच्या तरी जीवनात अहिंसक क्रांती घडवून आणली, हेही नसे थोडके.
असे हजारो तरुण माझ्या विचारांनी घडले, त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. हजारो कुटुंबांना सावरण्याचे काम माझ्या विमा व्यवसायामुळे झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात जवळपास पाच हजार घरे अशी आहेत, ज्या घरात माझा माझा फोटो लावलेला आहे. अक्षरशः देवाप्रमाणे ते मला पूजतात. मला कोणीतरी असे फोटो आणून दाखविते, तेव्हा माझे त्या लोकांच्या अंतर्मनात असलेले स्थान पाहून खूप समाधान मिळते. मी परमेश्वराचे आभार मानतो, की या कामासाठी त्याने माझी निवड केली, मला तशी सद्बुद्धी दिली.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
