‘लाईफ लाईन’ने सबकी लाईफ बना डाली…
लाईफ लाईनने मला काय दिले?
‘लाईफ लाईन कंपनीने मला काय दिले?’ हा प्रश्न मी कधी कधी स्वतःला विचारतो. त्याचे उत्तर येते, ‘मला सगळं सगळं काही दिलं. पैसा मिळाला, मानसन्मान मिळाला, चांगले वाईट अनुभवही मिळाले. पण माझी खरी कमाई कोणती असेल, तर मी लोकांच्या हृदयात स्थान मिळविलं.’ ‘प्रत्येक गावात घर बांधावे’ असे गोष्टीरूप सांगितले जाते, त्याचा अर्थ ‘माणसे जोडावीत’ असा आहे. ते माझ्या कामातून घडत गेले.बुलडाण्याची एक सत्यघटना आवर्जून सांगण्यासारखी आहे. २००३ मध्ये एकदा आमच्या फिल्ड ऑफिसरची मीटिंग बुलडाणा येथे होती. २०० एक फिल्ड ऑफिसर एकत्र आले होते. नेहमीप्रमाणे मीटिंगमध्ये शेवटचे भाषण माझे झाले. आभार मानण्यासाठी एक जण उभे राहिले. तेवढ्यात मला सांगण्यात आले, आपल्या आजच्या मीटिंगमध्ये तहसीलदारसाहेब आलेले आहेत. मला आनंद झाला, आम्ही तहसीलदरांना आदराने व्यासपीठावर बोलाविले, त्यांचा सत्कार केला. त्यांना थोडे बोलण्याची विनंती केली. त्याला होकार देत तहसीलदार बोलायला लागले. ते म्हणाले, “मी काही तुमच्या कंपनीचा एजंट वगैरे नाही. पण तरीही मी इथं आलो ते माझ्या मुलाच्या आग्रहामुळे. तो माझा एकुलता एक मुलगा असून अनेक दिवसांपासून मला आग्रह करीत होता की, धुमाळसाहेबांचं भाषण तुम्ही एकदा ऐकाच. मी कामांत व्यग्र राहत असल्याने नकार द्यायचो. पण अखेर स्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट पुरवावाच लागतो, त्यामुळे मी येथे आलो. मी मागे बसून शांतपणे धुमाळसाहेबांचं भाषण ऐकलं. अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे त्यांचं. त्यांचे विचार ऐकल्यावर दगडालाही काही तरी करण्याची इच्छा निर्माण होईल, असंच वाटतं. व्यक्तिमत्त्वविकास, बेरोजगारी, व्यावसायिक दृष्टिकोन व विमा यावर ते अतिशय पोटतिडिकोने बोलतात. मराठी माणूस व व्यवसाय या विषयावरही त्यांचे विचार खूपच उद्बोधक आहेत. तुमची कंपनी अतिशय अवघड पण तितकंच महत्त्वाचं काम करीत आहे. अपघातील विमा (टर्म इन्शुरन्स) विकणं हे खूप अवघड काम आहे. कारण या शब्दातच नकारात्मकता आहे. पण ते काम अतिशय कौशल्याने करवून घेण्याची हातोटी धुमाळसाहेबांमध्ये निश्चितच आहे. हजारो तरुणांना धुमाळसाहेबांमुळे दिशा मिळाली आहे. गोरगरीब, शेतकरी, शेतमजुराच्या कुटुंबांना संकटकाळात आधार मिळाला आहे. असं असलं, तरी कधी कधी मनात विचार येतो, इतक्या सगळ्या लोकांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या धुमाळसाहेबांना काही झालं तर? कारण ते रॉत्रदिवस रस्त्यावरून फिरत असतात. नितू मांडके यांच्यासारखे जगविख्यात हृदयरोगतज्ज्ञ वयाच्या बावन्नाव्या वर्षी स्वतःच हृदयरोगाने गेले. धुमाळसाहेब तर किती फिरतात. दुर्दैवाने एखादा अपघात झाला, तर पुढे काय होईल असा विचार मनात आला. अर्थात असं होऊ नये, कारण लाख मेले, तरी चालतील, लाखांचा पोशिदा जगला पाहिजे, अशी म्हणच आहे. म्हणूनच मी माझ्या आयुष्यातील किमान दोन वर्षं धुमाळसाहेबांना मिळावीत, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण त्यांचं कार्य खूप महान आहे, पिढ्या घडविणारं आहे. एवढे बोलून तहसीलदारसाहेब थांबले.
त्यानंतर एक मुलगा लगेचच उभा राहिला व त्याने विनंती केली, “कृपया मलासुद्धा बोलू द्या.” पाहायला गेले तर आमची मीटिंग संपलेली होती. पण त्या मुलाची उत्स्फूर्तता पाहून मी त्याला बोलण्याची परवानगी दिली. तो मुलगा म्हणाला, “आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं, ते तहसीलदार माझे बाबा आहेत. माझा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला आहे. आमच्याकडे बिलकूल शेती नाही. मी एम. कॉम. पर्यंतचं शिक्षण घेतलं. पण आताच्या काळात नोकरी मिळविणं किती कठीण आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. मीसुद्धा अनेक वर्ष नोकरीच्या शोधात होतो. या काळात मला खूप अपमान गिळावे लागले. वडिलांशी माझी तुलना केली जायाची. ‘याचा बाप कुठं, हा कुठं’ असे टोमणे दिले जायचे. मी पुरता निराश झालो होतो. अगदी आत्महत्या करावी, असे विचारही डोक्यात यायचे. पण याच दरम्यान एका मित्राने मला धुमाळसाहेबांच्या मीटिंगला नेलं. तिथे त्यांचे विचार ऐकले आणि माझे डोळे उघडले. मला माझ्या जगण्याचं, जीवनाचं मर्म सापडले. मी ही कंपनी जॉईन केली. एजंटाचा फिल्ड ऑफिसर झालो. आणखी दीड वर्षानी मला बक्षीस म्हणून हिरो होंडा मिळू शकते. मी मार्केटिंग ऑफिसरही होऊ शकतो. हे सगळं मिळो अथवा न मिळो, पण नजीकच्या भविष्यात मी एक यशस्वी उद्योजक होणार, हे निश्चित आहे. त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. आता माझे बाबा म्हणाले की, ‘धुमाळसाहेबांना काही झालं तर…’ बाबा, तुम्हाला सांगतो, एक तर धुमाळसाहेबांच्या बाबतीत असं काही होणारच नाही. आणि यदाकदाचित अशी दुर्दैवी घटना झालीच आणि ती बातमी मला कळली, तर मी माझं जीवन त्याच क्षणी संपवून टाकेन. कारण घुमाळसाहेबांमुळेच मी आजही जिवंत आहे. मला माझ्या जीवनाचा खरा अर्थ कळला आहे. यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र त्यांनी मला दिला आहे. तेच जर नसतील, तर मीसुद्धा जगणार नाही.’ त्या मुलाचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात टचदिशी पाणी आले. मी कोण कुठला, त्या मुलाचा माझा थेट असा कोणताच संबंध नाही. आजच्या कलियुगात स्वतःचा मुलगासुद्धा वडिलांप्रती इतकी आपुलकी, इतका मोठा त्याग करण्याची तयारीही दर्शविणार नाही, तिथे एक परका माणूस माझ्यासाठी पार जीव द्यायला निघतोय ! मला वाटते मनुष्य म्हणून आयुष्यात तुमची खरी कमाई कोणती असेल, तर अशी जिवाभावाची माणसे मिळणे हीच असेल. लाईफ लाईन कंपनीकडून मला काय मिळाले? तर अशी माणसे मिळाली. जी माझ्यावर जीव ओवाळून टाकतात. यश यश म्हणतात ते हेच असावे… असेच प्रेम मानसन्मान व पैसा आमच्या कंपनीत काम करणाऱ्या हजारो लोकांना मिळाला. यामधून किमान पाच हजार उद्योजक घडले आहेत. आज ते नोकरी न करता स्वतः उद्योजक, व्यावसायिक बनले आहेत व दुसऱ्यांना रोजगार देत आहेत. याचा मला सार्थ अभिमान वाटतो!
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
