व्यवसायाचे बीजारोपण
सिनेमा आणि बाउंस बँक !
आम्ही पिक्चर पाहायला गेलो. त्या सिनेमात एका जिद्दी इसमाची गोष्ट होती. शून्यातून तो इसम कसा बाउंस बँक करतो, कसा उभा राहतो, स्वप्न पूर्ण करतो हे अतिशय चांगल्या पद्धतीने दाखविण्यात आले होते. अर्थात तो सिनेमा असल्याने मी ते जास्त सिरीअस घेतले नाही. प्रत्यक्ष जीवन व सिनेमा यात अंतर असते, हे मला माहिती होते. पिक्चर संपला व आम्ही एका गार्डनमध्ये गेलो. तिथे गेल्यावर माझे सिनिअर मला म्हणाले, “तुम्हाला धंदा करायचा नाही, तर नका करू. पण व्यावसायिक दृष्टिकोन कसा असतो, हे समजून घ्या.” त्यांनी सांगितले, “आपण लेझीम खेळतो. तेव्हा एक पाऊल पुढे टाकतो व लगेच दोन पावलं मागे येतो.” मी म्हणालो, “हो, असंच असतं.” त्यावर ते म्हणाले, “आपली मराठी माणसं लेझीम खेळल्याप्रमाणे व्यवसाय करतात. तुम्ही व्यवसाय सुरू करण्याअगोदर किती प्रेरित, उत्साहित होता. तुम्ही व्यवसायातील पहिलं पाऊल विश्वासानं टाकलं. पण तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात नकार मिळाला. त्यामुळं तुम्ही निराश झालात. लेझीम खेळताना तर फक्त दोन पावलं मागे यावी लागतात, तुम्ही तर दहा पावलं मागे आलात. व्यवसायच सोडून द्यायला निघालात. तुमची इच्छा नसेल, तर नका करू व्यवसाय. पण एक सांगतो, हा व्यवसाय जगावेगळा आहे. तुम्हाला फक्त एकदाच डायरेक्ट विकायचं आहे. मागायचं फक्त एकदाच आहे. नंतर तर फक्त द्यायलाच जायचं आहे. तेही रोजगार द्यायचा आहे, सल्ला द्यायचा आहे. पैसे नाही द्यायचे. फुकटच्या सल्ल्यानेच पैसे कमवायचे आहेत. पण तुम्ही नाही कमावणार. तुमची फुकटची पाटिलकी त्यात आडवी येतेय. खोटी प्रतिष्ठा तुम्हाला मागे खेचत आहे. असं केलं, तर तुमचं विमानात बसायचं स्वप्न कधीच साकार होणार नाही, असो तुमची पाटिलकी, तुमची नोकरी तुम्हाला लखलाभ असो. तुम्ही जन्मभर चाकरीच करीत बसा. अशा मानसिकतेमुळे तुम्ही जीवनात कधीच यशस्वी उद्योजक होऊ शकणार नाही. एक जण नाही म्हणाला म्हणून जग संपलं का?” त्यांनी मला प्रथमच एसडब्ल्यू, एसडब्ल्यू, एसडब्ल्यू हा फॉर्म्युला सांगितला, पहिला एसडब्ल्यू म्हणजे ‘सम विल’, दुसरा ‘सम वाँट’ व तिसरा ‘सो व्हॉट?’ एक नाही म्हटला म्हणून सगळेच नाही म्हणतील, असे काही नसते. हे ऐकल्यावर माझ्या मनाला पुन्हा उभारी मिळाली. मी जिद्द बाळगण्याचे ठरविले व बाउंस बैंक झालो.
सिनिअरने मला सांगितले, “तुमचा कोटा पूर्ण करून विमानात बसायचं स्वप्न साकारायचं असेल, तर पहिले सहा हजार रुपये तुमच्या खिशातून भरा. तुमच्याच नावावर पॉलिसी घ्या. तुमचा कोटा पूर्ण करा व या अफलातून व्यवसायात चांगलं करिअर घडवा. बाकी निर्णय तुमचा आहे, तो तुम्हालाच घ्यायचा आहे.” मी मनातून पुन्हा पहिल्या उत्साहापर्यंत पोहचलो होतो. मी बँकेतून सहा हजार रुपयांचे कर्ज घेतले. स्वतःच्या नावावर एक पॉलिसी काढली. अर्थात एजंट म्हणून पत्नीचेच नाव होते. आमचा कोटा पूर्ण झाला, अशा तन्हेने माझ्या व्यवसायाचे बीजारोपण मी स्वतःचीच पॉलिसी काढून केले. त्यावेळी एक गोष्ट ठरविली. आता पॉलिसीसाठी कोणत्याही नातेवाइकाच्या दारात जायचे नाही. या अनुभवातून एक गोष्ट नमूद करतो, आपली मराठी माणसे नेहमी म्हणतात की, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मला वाटते, ते बरोबर नाही. मग काय बरोबर आहे? तर चुकीचा स्वीकार करून सुधारणा करणाऱ्या व्यक्ती जीवनात यशस्वी होतात, यावर माझा विश्वास आहे. Acceptance and Correction of the mistake are the first step towards the success.
म्हणून मी ठरविले, दुसऱ्यांना काही मागता न येणे ही माझी कमजोर कड़ी आहे. त्याचा स्वीकार केला व यापुढे इतरांकडून काही न मागता त्यांना काही तरी चांगले द्यायचे हे लक्षात ठेवून काम करायचे. व्यवसायात मी पहिल्या पदावर काठावर पास झालो, म्हणजे स्वतःच्या घरातून पैसे भरून. पुढे मात्र मी सर्वोत्तम काम करायचा निर्धार केला. आता माझी पत्नी फिल्ड ऑफिसर अर्थात डेव्हलपमेंट ऑफिसर झाली होती. चार एंजटांना पास करायचे असताना मी चाळीस एजंट नेमून त्यातील सतरा जणांना पास केले. त्यामुळे मी तिसऱ्या पदावर पोहचलो. आता एजंट बनवायचे काम संपले. आता त्यांना मदत करणे, मार्गदर्शन करणे, सल्ला देणे एवढेच काम होतं. छोट्या छोट्या मीटिंग घेऊन त्यांच्यासमोर भाषणे करण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले. मी खेडेगावातल्या शाळेत शिकलेलो, तसा लाजराबुजराच होतो. सभाधीटपणा नव्हता. सर्वांसमोर उभे राहून बोलण्याचे धाडस होत नव्हते. मनातून भीती वाटायची. आमची वरिष्ठ मंडळी बाहेरगावहून यायची. तीच मीटिंगमध्ये भाषणे करायची. सर्वांना प्लॅन समजावून सांगत असत. माझ्याकडे फक्त शेवटी आभार मानायचे काम असे. त्यालाही माझी तयारी नसायची. आभार मानायची वेळ आली की, मी काही तरी कारण काढून मीटिंग हॉलबाहेर पळून जायचो.
एकदा असेच शेवटचे भाषण सुरू होते. मी चुळबुळ करून नेहमीप्रमाणे बाहेर जाण्याच्या बेतात होतो. तोच भाषण करणाऱ्याने आपले भाषण आटोपते घेत घोषण केली, “आता धुमाळसाहेब आभाराचे भाषण करतील.” माझी तारांबळ उडाली. आता सगळ्यांसमोर माझे नाव पुकारले गेले असल्याने बाहेरही पळता येत नव्हते. माझे पाय लटपट करायला लागले. मी तसाच उभा राहिलो व स्टेजवर जाऊन माईकसमोर उभा राहिलो. घशाला कोरड पडली होती. तिथे आभाराऐवजी ‘आपल्या सर्वांना आशीर्वाद देतो,’ असे दोन तीन शब्दच तोंडातून बाहेर पडले. तेवढेच बोलून मी पटकन खाली बसलो. असा हा प्रसंग मला अजूनही आठवतो. नंतर मी धीट झालो, हजारोंच्या सभांना अतिशय प्रभावीपणे मार्गदर्शन करू लागलो. नंतर नंतर भाषण करायची सवयच लागली. पण भाषणाचा तो पहिला प्रसंग आजही आठवतो. कधी कधी हसूही येते. एवढे मात्र खरे की, त्या वक्त्याने माझे नाव पुकारून जो खो दिला, तो ‘खो’ मला वक्ता करण्याचा पाया ठरला.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
