व्यवसायाचे बीजारोपण

व्यवसायाचे बीजारोपण

माझे पहिले यशस्वी भाषण

मी स्वीकारलेला व्यवसाय हा बोलल्याशिवाय पुढे सरकणारा नव्हता. माझे सिनिअर बोलले होते, म्हणूनच माय या व्यवसायाची माहिती झाली, आता हेच काम मला करायचे होते. माझा अभ्यास, ज्ञान खूप उच्च दर्जाचे होते. मी सायन्स शिकलेलो व त्यातही गणिताचा विद्यार्थी असल्याने उत्पत्राचे कॅलक्युलेशन इतरपिक्षा मला जास्त चांगले माहिती होते. वन टू वन चर्चा करायला बसलो, तर मी कोणाला हार जात नसे. अतिशय प्रभावीपणे समजातून सांगायचो, पण असे सगळ्यांसमोर स्टेजवर उभे राहून बोलायचे म्हटले की, माझे अवसान गळायचे. पण मी आता तिसऱ्या पदावर होतो. उभे राहून बोलण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. माझा एक ज्युनिअर (फिल्ड ऑफिसर) डॉ. शिरोडे हा वैजापूरचा होता. मी औरंगाबादला राहत होतो. त्याने माझ्या सिनियरला म्हणजे आमच्या मामेसासऱ्यांना विनंती केली, “माझे वडील शाळेचे हेडमास्तर आहेत. त्यांच्या काही मित्रांना मीटिंगला बोलावतो. तुम्ही दोघे (म्हणजे मामे सासरे व मी) तिथे या. माझे सिनिअर नगरला, तर मी औरंगाबादला होतो. मीटिंग वैजापूरला होती, मामेसासरे नगरहून डायरेक्ट वैजापूरला येणार होते. मी औरंगाबादहून निघालो. नियोजित वेळेच्या आधी मी वैजापूरला दाखल झालो. तिथे माझे सिनिअरच प्रमुख वक्ते होते. मी गेलो तेव्हा तीस-चाळीस लोक जमलेले होते. मीटिंगची वेळ होऊन गेली. पण आमचे सिनिअर काही आले नाहीत. इकडे माझ्या फिल्ड ऑफिसरच्या वडिलांनी मीटिंग हॉलमध्ये समोरच्या बाजूला दोन खुर्य्या मांडून ठेवल्या होत्या. सिनिअरसाठी व माझ्यासाठी. त्यांनी मला खुर्चीवर बसवून माझी ओळख करून दिली, “हे स्टेट बँकेचे मोठे साहेब आहेत. या कंपनीचे अतिशय हुशार, धडाडीचे वरिष्ठ अधिकारी आहेत.” भरपूर कौतुक केले त्यांनी माझे. यानंतर मी मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्यांनी केली.

झालं.. ज्या गोष्टीची भीती वाटत होती, तीच गोष्ट माझ्यासमोर उभी राहिली. बाका प्रसंग आला होता. मीटिंग तर सुरू करावी लागणार होती. नसता आलेले सगळे निराश होऊन परतले असते. चांगला बिझनेस हातचा गेला असता. मी मनात म्हणालो, ‘चला, सुरुवात तर करावीच लागेल.’ मी ठरविले, उभे राहून बोलण्यापेक्षा खुर्चीतच बसून बोर्डाकडे तोंड करायचं व बोर्डावर लिहीत लिहीत बोलायचं. मला सगळी माहिती होतीच. फक्त कसे बोलायचे, कशा पद्धतीने सादरीकरण करायचे हे कळत नव्हते. मी खुर्चीवर बसूनच बोलायला सुरुवात केली. नंतर मी त्यात इतका मग्न झालो की, खुर्चीवरून कधी उठलो आणि कधी उभे राहून अतिशय व्यवस्थित बोलत राहिलो, हे मलाच कळले नाही. तब्बल एक तास सतरा मिनिटे मी सलग बोलत होतो.

शेवटी मी बोर्डावर एक अंड्याचा आकार काढला. त्यामधून अनेक बाण काढले व म्हणालो, “या व्यवसायातून तुम्हाला काय मिळणार आहे? तर मान, सन्मान, पैसा, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, देशसेवेची संधी, समाजसेवा अशा अनेक गोष्टी मिळणार. हा व्यवसाय म्हणजे एक सोन्याचं अंडं आहे. हे अंडं खायचं, पण सोन्याचं अंडं देणारी कोंबडी कापायची नाही. म्हणजे सरळमार्गाने व्यवसाय करायचा. लोकांच्या पैशांची अफरातफर करायची नाही. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही.” शेवटी मोडक्या तोडक्या हिंदीत एक शेर सांगितला, “खुदाने भी आज तक उस कौम की हालत नहीं बदली, जिसे खुद खयाल न हो अपनी हालत बदलने का, म्हणून खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है!” एवढे बोलून मी खुर्चीवर बसलो. त्या वेळी असलेल्या चाळीस-पंचेचाळीस लोकांनी टाळ्यांचा जो कडकडाट केला, त्याचा आवाज आजही कानात निनादत असतो. नंतरच्या काळात मी दहा हजार लोकांसमोर भाषणे केली. टाळ्यांचे असंख्य कडकडाट ऐकले. पण माझ्या पहिल्या भाषणाचा टाळ्यांचा कडकडाट काही औरच होता. आजही त्या भाषणाची आठवण आली की, मन आनंदित होते.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!