१०२.ब्रेक आणि पॉवर हाऊसला जपा

१०२.ब्रेक आणि पॉवर हाऊसला जपा

गडीला ब्रेक का असतात? गाडी थांबविण्यासाठी! वेग कमी करण्यासाठी? का अपघात टाळण्यासाठी? याचे योग्य उत्तर आहे. गाडी अधिक वेगाने चालविण्यासाठी. आपल्या गाडीला ब्रेकच नसतील तर, आपण गाडी चालविण्याचे धाडसच करणार नाही. केले तरी वेग वाढविणार नाही. आपल्या गाडीला चांगले ब्रेक आहेत. हा विश्वास असल्यानेच आपण आपली गाडी सुसाट पळवितो.

आपले आईवडील आणि गुरुजन हेच आपल्या यशस्वी जीवनाच्या गाडीचे ब्रेक असतात. ते आहेत म्हणूनच आपल्या जीवनाची गाडी सुसाट चालू असते. परंतु काही जणांना ते अडथळे वाटतात. पण एक लक्षात ठेवा. आईवडील आणि गुरुजन नावाचे ब्रेक नसतील ना! तर कधी मोठा अपघात होईल! हे तुम्हाला कळणार पण नाही. आणि अपघातानंतर तुमच्या तोंडातून आई ग, किंवा बापरे असेच शब्द आपोआप येतील. म्हणून आपल्या यशस्वी जीवनाच्या गाडीच्या ब्रेकला म्हणजेच आईवडिलांना जपा.

विजेचा बल्ब हा एक गोल काचेचा तुकडा असतो. परंतु तो बल्ब जेव्हा पॉवर हाउसला जोडला जातो ना! तेव्हाच तो स्वतःही चमकतो, आणि इतरांनाही चमकवितो. उजेड देण्याची ताकद ही बल्बमध्ये नसते. तर ती त्या पॉवर हाऊसमध्येच असते. आपल्या यशस्वी जीवनाचे पॉवर हाऊस. म्हणजे आपले आईवडील आणि गुरुजनच असतात. हे विसरू नका. देव सोडून कोणीही परिपूर्ण नसतो. प्रत्येकातच काही तरी कमी असतेच ना. म्हणून आईवडिलांच्या चुका काढू नका. कारण ते पूजनीय असतात,

त्यांची परिपूर्णता तपासत बसू नका. आपल्याला खरे संस्कार देण्याचे काम आईवडीलच करत असतात. आणि संस्कार नसतील तर तुम्ही कदापि जीवनात आनंदी आणि यशस्वी होणार नाहीत. आणि चुकून झालाच तर, तो आनंद आणि ती यशस्विता अजिबात टिकणार नाही. स्वामी विवेकानंदांना एकदा एक तरुण भेटला आणि म्हणाला, तुम्ही नेहमीच आईचे गुण गाता. आईमध्ये असे विशेष काय आहे? ते मला सांगा.

विवेकानंद म्हणाले तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर, तू एक काम कर. तू एक किलोची वीट घे. ती फक्त ९ तास पोटावर बांधून तुला जे करायचे ते कर, त्यानंतर तू मला भेट. मुलाने पोटाला वीट बांधली, पण पोटावरील विटेमुळ त्याला जेवता येईना, उठता, बसता येईना. दोन-तीन तासांतच तो तरुण परेशान होऊन विवेकानंदाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मला ही कसली शिक्षा दिली. मला काहीच करता येईना. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तेव्हा विवेकानंद म्हणाले, बाळा तू एक वीट नऊ तास पोटावर सांभाळू शकला नाहीस. तुझ्या आईने या विटाच्या तीन पट जास्त वजनाचे बाळ, म्हणजे तुला स्वतःच्या पोटात नऊ महिने नऊ दिवस कसे सांभाळले असेल ! यापेक्षा आईचे कोणते मोठे उपकार असू शकतात. म्हणूनच म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा! आईविना भिकारी.

माझे आजी-आजोबा आणि आईवडील यांचा माझ्या यशामध्ये १०० टक्के वाटा आहे. कारण त्यांनी मला फक्त जन्मच न देता, माझ्यावर संस्कार केले, मला उच्च शिक्षणासाठी आणि एक चांगला माणूस होण्यासाठी प्रेरित केलं, म्हणूनच मी आज आनंदी आणि यशस्वी जीवन जगत आहे. तीच माझी ताकद आणि तेच माझे प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच मी ज्या ज्या क्षेत्रात काम केलं तिथे मला सर्वोच्च यश मिळालं. म्हणजेच मी हात लावीन त्याचं
सोनं होतं गेलं. याचं सर्व श्रेय माझ्या आजी-आजोबा आणि आईवडिलांना जाते. माझ्यापेक्षा अनेक लोक हुशार असतील, माझ्यापेक्षा जास्त कष्टही करीत असतील. परंतु शंभू महादेवाच्या कृपेने आणि आईवडील आणि आजी-आजोबाच्या आशीर्वादाने मला इतरांपेक्षा जास्तच यश दिले आहे. त्यांचे उपकार मला कदापि फेडता येणार नाहीत. म्हणूनच मी तीस वर्षांपासून ज्ञानदानाचे आणि पाच वर्षांपासून अन्नछत्राच्या माध्यमातून अन्नदानाचं कार्य करीत आहे, असे मला वाटते.

म्हणूनच मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे की, तुम्ही तुमच्या ब्रेक आणि पॉवर हाऊसला म्हणजेच आईवडील आणि गुरु जनांना जपा, त्यांचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी मिळवा आणि तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी व्हा. आणि हो तुमचे आईवडील कसेही असू द्यात, त्यांना आनंद देता आला नाही तरी किमान दुःख तरी देऊ नका, ही हात जोडून विनंती.

 

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!