११. विस्ताराची रणनिती बनवा.
१) युद्ध –
शिवबाराजे युद्ध म्हणजे हजारो लाखोंचा सैन्यसागर मैदानात उतरणे, हजारी लोकांचा जीव जाणे आणि लाखो लोक जायबंदी जखमी होणं. युद्ध हे कोणत्याही राजाला परवडणारे नसतेच. परंतु अस्तित्त्वासाठी स्वतःच्या रक्षणासाठी अनेकदा लादलेल्या युद्धांना नाईलाज म्हणून सामोरे जावे लागते. बलाढ्य सेना असणारे, शक्तीचा उन्माद करणारे, अहंकाराने ग्रासलेले आणि सत्ता मिळविण्याच्या लालसेने व्याप्त असे बादशहा तुमच्यावर अशी युद्धे लादण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा आपणाला शक्यतो युद्ध टाळायचे परंतु पर्याय नसेल तर मग युद्ध करायचे पण ते मर्यादित युद्ध करूनही ते जिंकायचे ही रणनिती ठेवा.
मर्यादित युद्ध करायचे म्हणजे मनुष्यहानी टाळायची. आपलीच काय पण शत्रूची माणसे तरी का मारली जावी जे मारले जाऊ नयेत असे वाटते त्यांना कौल द्या. त्यांना शस्त्र टाकण्याचे आवाहन करा. शरण येण्याची संधी द्या आणि विनाकारणची मनुष्यहानी टाळा. पण जे हत्यार सोडणार नाहीत त्यांना मात्र मग जिवंत ठेवण्याचा काही आपण ठेका घ्यायचा नाही. जो मारायच्या इच्छेने येईल त्याला मरायची संधी जरूर द्या. युद्धात शरण आलेले हत्यार टाकलेले लोक लगेच आपल्या फौजेत सामील करून आपली सैन्यशक्ती वाढती ठेवता येते. तेव्हा युद्धात आपल्या विरूद्ध लढायला आलेले सैन्यच
पुढच्या युद्धात आपल्या बाजूने लढले पाहिजे हीच रणनिती ठेवा. आपलं सैन्यबळ वाढविण्याचा हा एक उत्तम मार्गच आहे. सैन्य पोटावर चालतं मग काय त्या सैनिकांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवला तर आजन्म ते आपल्या स्वराज्यासाठी का लढणार नाहीत.
तेव्हा जमलं तर युद्ध टाळायचं, नाहीच जमलं तर मर्यादित युद्ध करायचं आणि विजय तर मिळवायचाच. परंतु आपलं सैन्य राखून आपलं सैन्य सुद्धा वाढवत जायचं, आपल्या प्रत्येक सेनापतीने हे दोन नियम पाळलेच पाहिजेत. एक स्वतःचे सैन्य रक्षण आणि दोन शत्रूचे सैन्य शरण आणून आपले सैन्य वाढविणे असं जर आपण करत गेलो तर आज आपली हजारात असणारी सेना लवकरच लाखोंचा सेनासागर होईल. राजमाता जिजाऊ यांच्या या शिकवणीप्रमाणे महाराजांनी अनेक युद्धांना बगल दिली. जिथे पर्यायच नव्हता अशा ठिकाणी मर्यादित युद्ध केले. प्रतापगडाचे युद्ध करावे लागले पण या युद्धात जवळपास १८ हजार सैन्य शरण आणलं आणि स्वराज्याचे सैन्यबळ वाढविले. प्रत्येक युद्धानंतर महाराज असेच आपलं सैन्यबळ वाढवत गेलेले दिसतात. महाराजांचं चारित्र्य एवढं संपन्न आणि उजवं होतं की १६५७ला म्हणजे महाराजांच्या वयाच्या २७ व्या वर्षीच आदीलशाहीत काम करणारे अफगाणिस्तानातील सातशे पठाण महाराजांच्या पदरी आले आणि स्वराज्याची सेवा करू लागले. याच ७०० पठाणांनी महाराजांना कल्याणचा खजाना मिळवून दिला. म्हणजे पहा महाराजांची काम करण्याची पद्धत युद्ध झाले तरी सैन्य वाढवायचे आणि युद्ध न करताही केवळ आपल्या चारित्र्याचा प्रभाव पाडून देखील सैन्यबळ वाढवायचे.
स्वराज्य विस्ताराची ही पहिली रणनिती, यात माणसं वाढविण्यावर आणि माणसं वाचविण्यावर महाराजांचा भर होता. कारण जेवढी जास्त माणसे कामाला येणार, काम करणारे तेवढेच जास्त हात स्वराज्याच्या कामी येणार. आणि त्याचे हात वाढणार, त्याची झेप देखील वाढणार हे तर स्वाभाविकच म्हणून ज्याला मोठं व्हायचं त्यांनी हाताखाली जास्तीत जास्त माणसं कामाला ठेवावी. एकट्याने काम करून ध्येय प्राप्त करू असे जर कोणी
म्हणेल तर तो राब राब राबून मरून जाईल. तेव्हा माणसं वाचवा. माणसं जगवा. माणसं वाढवा. आणि आपलं राज्य वाढवा हीच विस्ताराची उत्तम रणनिती होय.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
