११. विस्ताराची रणनिती बनवा.
१. राज्याच्या रक्षणाची खात्री
राजे आपण मोठे सैन्यबळ घेऊन मोहिमेवर गेल्यानंतर मागे राखलेले सैन्य आपल्या गैरहजेरीत राज्याच्या रक्षणासाठी सक्षम आहे की नाही हे अगोदर तपासून पहावे. मागे असलेले सैन्य पराक्रमी तसेच निष्ठावान शिस्तप्रिय असेल याची पहिली खात्री करून घ्यावी लागेल. नाहीतर आपण पुढे जाताच मागे बंडाळी झाली, फितूरी झाली. दगाफटका झाला तर नवीन राज्य निर्माण करणे किंवा विस्तार करणे राहीले बाजूला आणि असलेले कष्टाने, प्रयासाने उभारलेले राज्य गमवायची पाळी यायची तेव्हा असे होणार नाही, आपल्या मागे आपले राज्य तेवढेच सुरक्षित राहील याची पहिली खातरजमा केलेली बरी. राजा परगावी गेलेला पाहून अनेक जवळची किंवा स्वतःला निष्ठावंत म्हणवणारी माणसे देखील एखाद्या आमिषाला बळी पडून राज्याची माहिती शत्रूला पुरवून क्षणिक स्वार्थासाठी राज्य बुडवू शकतात. म्हणूनच सर्वांवर विश्वास सर्वकाळ विश्वास ठेवता येत नाही. तसेच प्रत्येकवेळी प्रत्येकावर संशय देखील घेणे योग्य होत नाही.माझ्या पूर्वजांचे राजा रामदेवराय यादव यांचे राज्य अशाच प्रकाराने बुडाले. राजारामदेवराय हे भारताचे खूप प्रसिद्ध कर्तबगार असे राजे होते.
त्यांचा मुलगा शंकरदेव हा दक्षिण दिग्वीजयासाठी दूर कर्नाटक प्रांतात ५० हजार सैन्य घेऊन मोहिमेवर असतानाच राजारामदेवराय यांचा अत्यंत विश्वासू असा असलेला मंत्री हेमाद्री पंडीत याने विश्वासघात केला आणि अल्लाउद्दीन खिलजी याला देवगिरीवर आक्रमण करायची हीच योग्य वेळ असल्याची माहिती पुरवली. अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा देवगिरीला वेढा घातला तेव्हा राजारामदेवराय याने हेमाद्री पंडीताला शंकरदेव ससैन्य परत येईपर्यंत पुरेल एवढी रसद किल्ल्यात भरायला सांगितली. हेमाद्री पंडीत अगोदरच फुटीर होता त्याने अन्नधान्य भरण्याऐवजी केवळ मीठ भरले आणि रसदेच्या अभावी देवगिरी पडला.
पाठीमागून आणखी फौज येत आहे अशी अफवा खिलजीने पसरवली ती अफवा राजापर्यंत पोहचवून राजाची दिशाभूल करण्याचे कामही हेमाद्री पंडिताने केले आणि देवगिरीसह हा देश खिलजीच्या ताब्यात गेला. हेमाद्री पंडिताला असे करून काय मिळाले हे तोच जाणे. परंतु एका स्वार्थी माणसामुळे एक राज्य बुडवले गेले एक संपूर्ण देश पारतंत्र्यात गेला आणि त्याची शेकडो वर्षे किंमत येथील महिलांनी मुलींनी आणि नागरिकांनी मोजली. प्रचंड जुलुम,
अन्याय, अत्याचार यांना सामोरे जावे लागले. राजे हा अनुभव पाठिशी घ्या आणि आपण दिग्विजयी मोहिमेला निघण्याआधी आपले सैन्य, आपले मंत्री, आपले अधिकारी, आपले किल्लेदार हे सर्व आपल्या गैरहजेरीत तेवढेच प्रामाणिक निष्ठावंत राहतील, तेवढ्याच शौर्याने लढतील याची पहिली खात्री करून घ्या.
आणि हो, हे करत असताना सोबत केवळ ४०% फौज घेऊन जावी. मागे ६०% ठेवावी. कारण आपण परगावी गेला आहात हे पाहून जर एखादा औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू जरी चालून आला तरी आपण माघारी येऊपर्यंत हे राज्य राखता येईल. एवढी फौज तर शिलकीला मागे असलीच पाहिजे. नवीन राज्य तर संपादन करावे हे महत्त्वाचे आहे. तेवढेच महत्त्वाचे संपादन केलेले राज्य अगोदर रक्षण करणे आहे. जिंकलेले राज्य, निर्माण केलेले राज्य न गमवता राज्याचा विस्तार करणे अधिक तर्कसंगत आणि योग्य असतं. नाहीतर पुढे पाठ आणि मागे सपाट असे होईल. ते न होऊ देणे त्यासाठीच आपल्या मागे आपले राज्य उत्तम रितीने संरक्षित व्हावे यासाठीच सह्याद्रीच्या डोंगररांगा बघून जागोजागी उंच बेलाग आणि अजिंक्य अशा किल्ल्यांची साखळीच उभी करा. एक एक किल्ला लढवायला आणि जिंकायला बलाढ्य अशा शत्रूला देखील एक-एक वर्ष लागले पाहिजे असे बलदंड अजिंक्य असे किल्ले बांधा. आलेला सर्वच्या सर्व पैसा जरी या किल्ल्यावर खर्ची पडला तरी हरकत नाही कारण जेव्हा परचक्र येईल तेव्हा हे किल्लेच ते परचक्र परतावून लावतील.
राजमाता जिजाऊंच्या या शिकवणीप्रमाणे महाराजांनी दिसला मोक्याचा डोंगर हाती आला पैसा की बांध किल्ला हे धोरण राबवत राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग असे एकशे अकरा किल्ले ३५ वर्षात बांधून काढले. आपल्या माघारी आपले राज्य, स्वराज्य अजिंक्यच राहील याची तरतूद केली आणि अजिंक्य किल्ल्याप्रमाणे आपले लोकही अजिंक्य निष्ठावान प्रामाणिक असल्याची वेळोवेळी वेषांतर करून प्रत्यक्ष परीक्षा घेऊन खातरजमाच केली. किल्ले अजिंक्य असले आणि किल्लेदारच फुटले, अधिकारी फुटले तर मग किल्ला
पडायला तो कितीसा वेळ लागतो. म्हणून किल्ला सांभाळणारी माणसं देखील कर्तव्यनिष्ठ आहेत की नाही, आपल्या माघारी तेवढेच प्रामाणिक राहतात की नाही याची महाराजांनी जी वेळोवेळी परीक्षा घेतली होती. त्यापैकी एक प्रसंग मोठा मार्मिक आणि डोळ्यात अंजन घालणारा असा आहे तो येथे सांगणे योग्य होईल. हा प्रसंग आहे, महाराज आग्रा येथे बादशहा औरंगजेब याच्या भेटीला निघण्यापूर्वीचा. जवळपास आठ महिने लागणार होते महाराजांना जाऊन परत यायला. तेव्हा महाराजांनी आपल्या किल्लेदारांची परीक्षा घेण्याचे ठरविले. मंत्र्यांनी सांगितले महाराज काळजी नसावी, आपले लोक हुशार प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ आहेतच. परंतु काहीवेळा मंत्र्यांवरच काय तर स्वतःवर देखील विश्वास ठेवण्याची वेळ नसते. महाराजांनी ताबडतोब आपली दिशा बदलली आणि नगरकडे चाललेली घोडी अचानक लोणावळ्याच्या दिशेने लोहगडाकडे वळवली. काय काय कारण होते लोहगडाकडे वळण्याचे? का एवढा महत्त्वाचा होता लोहगड महाराजांसाठी? तर हा किल्ला महाराजांनी स्वतः बांधलेला होता आणि सुरतेवरून आणलेले पैसे, संपत्ती बऱ्यापैकी याच किल्ल्यावर होती. आणि माणसे फुटतात तर केवळ पैशांसाठी, संपत्तीसाठी तेव्हा जेथे पैसे संपत्ती ठेवली आहे किमान तेवढ्या किल्ल्याची सुरक्षितता तरी तपासू आणि मगच पुढे आण्याला जाऊ असे ठरवून महाराज रात्रीचेच लोहगडाच्या दिशेने सरकले. किल्ल्याच्या घेऱ्याची रक्षण करण्याची जबाबदारी असलेला भिल्ल नायक सज्ज होता. रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या रोखाने दौडत येणारी घोडी पाहताच त्याने आरोळी ठोकली. काही क्षणातच सर्व भिल्ल घेऱ्याच्या पहिल्या चौकीच्या रक्षणासाठी तीरकामठे हाती घेऊन सज्ज झाले. तोपर्यंत पुढच्या सर्व चौकी पहाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देखील दिला गेला. किल्ल्याच्या घेऱ्यापासून ते तटापर्यंत जागोजागी मोर्चे लागले. हाती तीरकामठे भाले आणि गोफणगुंडे घेऊन किल्लेरक्षणाची जबाबदारी असणारी किल्ल्याखालील सर्व मावळे शत्रूला रोखायला काही क्षणात सज्ज झाले.
वाऱ्याच्या वेगाने घोडी पुढे सरकत होती. आणि पुढील मशालजी ओरडत होता थांबा थांबा दुसरे कोणी नाही स्वतः महाराज आलेत किल्ल्याच्या
भेटीला, घेऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या भिल्लांनी नीट ओळख तपासली आणि मगच वाटेवर आडवी लावलेली अडथळ्यांची रांग बाजूला केली. महाराज हुशार होते या भिल्लनायकालाच सोबत घेतले आणि किल्ला गाठला. हेतू हाच की जरी हा माझ्या शब्दांना भुलला असला तरी आता याच्या जामीनकीवर किल्ला उघडला जाईल का ते पहायचे होते. आणि भिल्ल नायकाने पहारेकऱ्यांना वर्दी दिली, ‘महाराज आलेती महाराज !’ किल्लेदारांना सांगावा धाडा त्वरीत दरवाजा उघडावा आणि महाराजांना आत घ्यावा. दरवाजात पोहोचताच महाराजांनी किल्लेदाराला आदेश दिला दरवाजा उघडा.
यावर किल्लेदाराने महाराजांना विचारले आपण कोण? महाराजांनी उत्तर दिले मी शिवाजीराजा आहे. तुम्ही ताबडतोब किल्ल्याचा दरवाजा उघडून मला आत घ्या. यावर किल्लेदार म्हणाला, आपण महाराजच असाल तर स्वराज्याचा नियम आपणास माहित नाही का? सूर्यास्त झाल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा साक्षात यमराज आला तरी सूर्योदय होईपर्यंत उघडला जाणार नाही. स्वराज्याची ही शिस्त आहे. त्यावर महाराज म्हणाले, अरे ते मला माहित आहे. परंतु संकट काय कोणाला सांगून येते का? शत्रू माझ्या पाठलागावर आहे. मला आश्रय दिला नाही तर माझा जीव जाईल ना! तू दरवाजा उघड. यावर किल्लेदार म्हणाला, प्रश्न जर तुमच्या जीवाचा असेल तर ती माझी जबाबदारी. किल्ल्याच्या आश्रयाला आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या जिवीताचे रक्षण करणं हे किल्लेदाराची जबाबदारी मी पूर्ण करीन. आपण फक्त थोडं पुढे येऊन दरवाजाला चिकटून बसा. आम्ही बुरूजावर उभे राहून आलेला शत्रू अंगावर घेऊ. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ही खात्री बाळगा. परंतु दरवाजा मात्र उघडता येणार नाही.
महाराज म्हणाले, अरे ज्याने नियम करुन दिला तो राजाच तुझ्या समोर उभा आहे. तू मला कायदा कसला आणि कशाचा सांगतो ! यावर किल्लेदार म्हणाला, “हा आपल्या स्वराज्याचा कायदा आहे तो राजाने बनविला तरी तो राजालाही लागू पडतो. रयतेला वेगळा आणि राजाला वेगळा असे दोन कायदे स्वराज्यात नाहीत. आपण निश्चिंतपणे दरवाज्यात बसा. आलेल्या
शत्रूला आम्ही बघून घेऊ.” त्याने जास्तीची कुमक मागवून दरवाजा बुरुज यावर फौज सिद्ध करून महाराजांच्या सुरक्षेची तजवीज केली. परंतु दरवाजा काही उघडला नाही.
महाराज आता मात्र रागावले आणि म्हणाले, अरे तुमच्या स्वराज्यात राजापेक्षा मोठा अधिकार बाळगणारे कोणी आहे की नाही? किमान त्यांच्या परवानगीने तरी मला आत घ्या. माझा जीव वाचवा. किल्लेदाराने लगेच उत्तर दिले. होय यावर एक उपाय आहे. स्वराज्यात राजालाही आदेश देऊ शकणारी एक अधिकारी आहेत. त्यांच्या परवानगीने सही शिक्क्यानिशीच्या पत्रावर तुम्हाला आत घेण्यासंबंधी अध्यादेश घेऊन आलात तरच तुम्हाला सूर्योदयापूर्वी किल्ल्यात घेण्यासाठी दरवाजा उघडता येईल. तुम्ही असं करा राजगडला जा. जिजाऊसाहेब स्वराज्याच्या कुलमुख्यत्यार आणि सर्वाधिकारी आहेत त्यांना भेटा. विनंती करा. पत्र बनवा आणि माझ्याकडे घेऊन या, मी तुम्हाला लगेच आत घेतो.
यावर महाराज म्हणाले अरे मला बनवितो काय? नियम आणि कायदे दाखवून. अरे तू इथला किल्ल्याचा दरवाजा उघडत नाहीस आणि तिकडे राजधानी राजगडचा किल्ल्याचा दरवाजा कुठून रात्रीचा उघडला जाईल. किल्लेदार म्हणाला, ते तुमचं तुम्ही बघा. तो प्रश्न तुमचा आहे. महाराज म्हणाले आणि काय हे मी येथून अंधाऱ्या रात्रीत राजगडला जाणार परत येणार तोपर्यंत सकाळ होणार की? किल्लेदार म्हणाला मग मी दरवाजा उघडायला सकाळी तयारच आहे की. तुम्ही येण्याअगोदर सूर्य उगवला तर दरवाजा तुमच्यासाठी उघडूनच ठेवलेला असेल की ! जा लवकर आणि जिजाऊंचा अध्यादेश आणा, किल्ल्याचा दरवाजा उघडावा असे वाटत असेल तर. महाराज रागावून म्हणाले, माझ्याबरोबर गनिमी कावा करून मला कात्रजचा घाट दाखवतोस काय ? थांब तुझी गर्दनच मारतो. राजाची आज्ञा न पाळल्याची शिक्षा तुला मृत्युदंडच देतो
किल्लेदार म्हणाला, महाराज तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची ती नक्की द्या. मी ती भोगायला तयार आहे, परंतु सकाळ झाल्यावर ! शेवटपर्यंत
महाराजांनी अर्ज, विनंती, धमकी, समजूत अशी अने वापरूनही त्या फाकड्यशाने महाराजांच्या आदेशाला न जुमानता स्वराज्याच्या शिस्तीचे पालन केले. महाराजांना रात्र किल्ल्याच्या दरवाज्यात बसून काढावी लागली.
आणि दोन-तीन तासानंतरच पूर्वेकडे तांबडं फुटायला लागले. सूर्याचं पहिलं किरण धरतीला स्पर्श करताच किल्लेदाराने नियमानुसार किल्ल्याचा दरवाजा उघडला आणि महाराजांना आत घेतलं. किल्लेदार आपण रात्री महाराजांच्या आदेशाचं पालन करू शकलो नाही म्हणून मान खाली घालून अदबीनं दरवाज्यातच उभा राहिला. महाराज मी आपला अपराधी आहे. आपण रात्री दिलेल्या आदेशानुसार माझी गर्दन मारा. मी शिक्षा भोगायला तयार आहे.
महाराजांनी त्या किल्लेदाराला छातीशी कवटाळत आपल्या हातातील सोन्याचं कडं त्याच्या हातात घालत महाराज म्हणाले, शाब्बास बहाद्दरा ! अरे तुमच्यासारखी स्वराज्याचा कायदा पाळणारी माणसे जन्माला आलेली असताना माझ्या माघारी स्वराज्याची काळजी नाही.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
