१२. यशस्वी राजा-उद्योजक होण्याची चतुःसूत्री
१. नफा :- नफा म्हणजे आपण व्यापार उद्योगधंदा करताना आपणाला
खरेदी किंमत आणि विक्री किंमत यात जो फरक ठेवायचा असतो ते मार्जीन किंवा फरक होय. आपल्या उद्योगातून स्वराज्य आणि रयत या दोघांना नफाच झाला पाहिजे. नुसता स्वराज्याचा नफा बघायचा नाही तर सोबत रयतेलापण नफा मिळाला पाहिजे याची काळजी घ्या. कोणताही उद्योगधंदा याचा प्राण म्हणजे नफा. तेव्हा जास्तीत जास्त नफा कमीत कमी भांडवलात मिळवणं हे
एक कौशल्य आहे. आणि कमीत कमी वेळेत ती वस्तू खरेदी करून परत ती कमीत कमी वेळेत विकणं ही देखील एक कला आहे. जेव्हा ही कला आणि कौशल्य एक होतात तेव्हा तो धंदा जगातील सर्वात वेगाने वाढणारा धंदा बनतो.
तुम्ही राज्य उभं करताना पण युद्ध, मोहिमा यापेक्षा छाप्यावर जास्त लक्ष द्या. छापा म्हणजे १०० टक्के नफा. युद्ध म्हटलं की लाखोंच लष्कर आलं, हत्ती, घोडे, तोफा, दारूगोळा आला शिवाय युद्धात जीवितहानी आणि वित्तहानी प्रचंड होते. अशा युद्धात विजय मिळाला तरी नफा कमी आणि नुकसानच जास्त होते. आणि खर्चिक युद्धे जिंकली तरी त्यातून राज्य दहा -दहा वर्षे सावरत नाही तेव्हा युद्ध हा पर्याय आपण शक्यतो वापरायचा नाहीच. परंतु जर शत्रूने ते आपणावर लादले तरी मग थोडासा वेळ बाजूला काढा. ह्या युद्धाची खुमखुमी असणाऱ्या शत्रूला आपल्याला अनुकूल अशा मैदानात खेचा, खिंडीत पकडा किंवा दरीत कोंडा आणि सरळ सरळ शरण येण्यास भाग पाडा आणि १०० टक्के नफा कसा होईल ते पहा. आपली माणसं खर्ची न पाडता हे युद्ध जिंका आणि शत्रूला फार मोठा आर्थिक झटका द्या.
दुसरी पद्धत म्हणजे मोहिम, यात आपणाला लाखांचं लष्कर सोबत घ्यावं लागेल, प्रदीर्घ वेळ द्यावा लागतो. राज्याबाहेर राहावं लागतं मग यातून किती नफा मिळेल ते पूर्णपणे काळवेळ यांच्या हाती तेव्हा मोहिमसुद्धा कधीतरी बंपर सेल म्हणून किंवा विशेष बाब म्हणून कधीतरी करा नेहमी नाही. यात राज्य विस्तार करावा लागेल आणि मग नफा चालू होईल. म्हणजे यात भांडवली खर्च जास्त होईल आणि मग पुढे पुढे नफा मिळेल. परंतु तो प्रदेश हाती राखण्यासाठी परत दैनंदिन खर्च करावा लागेल. शिबंदी ठेवावी लागेल. महसूल गोळा करावा लागेल आणि मग त्यातून वजा होऊन जे राहील तोच नफा होईल.
तेव्हा १०० टक्के नफा मिळवून देणारा उद्योग म्हणजे छापा टाकणे. छापा टाकण्यासाठी काय लागेल तर पुरेपुर नियोजन आणि कृती करण्याची योग्य वेळ साधणे यांचा ताळमेळ planning & timely action. त्यामुळे
ज्या पैशांवर शत्रू उभा असतो तो पैसाच खेचून घेतला म्हणजे आपोआपच तो खचून जातो आणि पुढे होणारी युद्धे देखील ढळू शकतात. तर छापा टाकण्यासाठी काय करायचे तर चांगली मालामाल अशी बाजारपेठ हुडकायची, तेथील बित्तंबातमी काढायची, कोणती वेळ योग्य ते शोधायचे, निवडक सैन्य सोबत घ्यायचे आणि अचानक जाऊन छापा टाकायचा आणि कोणतेही युद्ध न करता चकमकी टाळून सर्व मुद्देमाल आपल्या ताब्यात घ्यायचा आणि आले त्याच वेगाने परत माघारी फिरायचे. १०० टक्के नफा मिळवून देणारे हे काम. यातून आलेला पैसा दोन कामांसाठी वापरायचा. एक आपली संरक्षण व्यवस्था मजबूत करणे आणि दोन आपला स्वतःचा व्यापार उद्योग उभा करणे.
गडकोट किल्लेबांधणी यावर आलेला पैसा खर्च केला तर आपणावर लादले जाणारे युद्ध आपणाला खूप कमी पैशात खेळता येते आणि जिंकता देखील येते. पण हे युद्ध शत्रूला दुप्पट महाग पडते कारण एवढ्या लांब लाखांचे सैन्य घेऊन यायचं, रसद, दाणागोटा याची व्यवस्था करायची आणि आपण तर असणार चार हजार फुट उंचीवरील अजिंक्य अशा किल्ल्यामध्ये. तेव्हा किल्ल्याला वेढा घालावा लागणार. यात चार ते सहा महिने जाणार, त्यात परत पावसाळा, थंडी येणार आणि रात्री-अपरात्री आपले लोक त्यांच्यावर छापे टाकून त्यांची राहिलेली रसद आणि संपत्ती दोन्ही ताब्यात घेणार. म्हणजे एक रुपया वसूल करायला शत्रूला चार रुपये खर्च येणार. त्याचे नफा हे गणित उधळून जाणार आणि तो परत कर्जाच्या खाईत बुडणार.
तेव्हा आपण तर शत्रूवर छापे टाकून १००% नफा मिळवणारच परंतु शत्रूला मात्र १०% सुद्धा नफा न मिळता उलट १००% नुकसानच होणार तर अशा परिस्थितीत शत्रू आपणाशी दोन हात करणार तरी किती वेळा आणि किती वेळ. तेव्हा त्याला माघारच घ्यावी लागेल.
दुसरी गोष्ट म्हणजे मिळालेल्या पैशांतून आपण आपले उद्योगधंदे, व्यापार उभे करायचे आणि लोकांच्या हातांना काम द्यायचे. चांगला व्यापार करायचा अणि आपले राज्य समृद्ध करत राहायचे. राज्यात जास्तीत जास्त उद्योजक तयार करायचे. त्यांना उद्योगधंद्यांना प्रोत्साहन द्यायचे. व्यापार उभा
करायचा आणि यातूनच राज्याला कर मिळतो, महसूल मिळतो आणि राज्य आणखी वेगाने प्रगती करते.
राजमाता जिजाऊ यांच्या सुचनेप्रमाणे महाराजांनी छापा टाकून मिळविलेले सर्व पैसे किल्लेबांधणी आणि रयतेच्या कल्याणकारी योजना यावरच गुंतवले, स्वराज्य समृद्ध केले त्याचवेळी ते सुरक्षित देखील केले. छाप्यातून मिळालेला १००% नफा असायचा. परंतु त्यातील एक टक्का देखील महाराज स्वतःच्या चैनीसाठी, ऐशोरामासाठी खर्च करत नसत. याला संस्कार नावाचा एक गुण कारणीभूत होता. आणि हे राज्य माझं नसून माझ्या रयतेचं आहे मी तो केवळ विश्वस्त ही कायम भावना महाराजांची होती. म्हणूनच पहा महाराजांनी ३५ वर्षात १११ किल्ले बांधले पण एकही राजवाडा बांधला नाही. ८०० जहाजे बांधली पण एकही फिरण्यासाठी नौका नाही बांधली. घर, गाडी या वस्तू नंतर अगोदर व्यापार, अगोदर धंदा हे समीकरण आपण यातून शिकलं पाहिजे.
तेव्हा आयुष्यात समृद्ध व्हायचे तर जास्तीत जास्त नफा मिळणारा उद्योगधंदा करा. स्वतःच्या गरजा कमीत कमी ठेवा, वायफळ खर्च अजिबात करू नका. धंद्यातील पैसा धंद्यातच परत लावा, धंदा वाढवा. तो सुरक्षित करत जा. हाच पुढे जाण्याचा एक मार्ग आहे आणि हेच चार सूत्रातील पहिले सूत्र आहे. जास्तीत जास्त नफा कमीत कमी खर्च त्यातून जास्तीत जास्त गुंतवणूक आणि त्यातून परत जास्तीत जास्त उत्पन्न.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
