१२. यशस्वी राजा-उद्योजक होण्याची चतुःसूत्री

१२. यशस्वी राजा-उद्योजक होण्याची चतुःसूत्री

शिवबाराजे मी तुम्हाला पुन्हा एकदा हेच सांगणार आहे की एक राजा होणं म्हणजे एक उद्योजक होणं. एक यशस्वी राजा होण्याचा मार्ग हा एक यशस्वी उद्योजक होण्यापासून सुरू होतो. जो उद्योजक होऊ शकतो तोच शून्यातून आपले राज्य निर्माण करू शकतो. अगदी बापजाद्यांनी आयते राज्य जरी एखाद्याच्या हाती दिलं तरी ते सांभाळण्यासाठी पैसे कमावणं ते पैसे योग्य पद्धतीने हाताळणे, माणसं जमवणं ती माणसं जोपासणं, नवीन भूप्रदेश मिळवणं तो टिकवणं हे सर्व करण्यासाठी लागते ती उद्योजकता. जर का तुमच्या डोक्यात राजा होणं म्हणजे केवळ लढाया करणं, मारामाऱ्या करणं असं असेल तर ते डोक्यातून लागलीच काढून टाका.

मला तुम्हाला एक आदर्श आणि विश्वाला वंदनीय होईल असा राजा बनवायचे आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग हा युद्ध, लढाया नसून उद्योगधंद्याची, व्यापाराची भरभराट आणि त्यातून रयतेची आपल्या स्वराज्यासाठी सुखसमृद्धी हाच तो मार्ग आहे. तुम्ही युद्धखोर बनावं, निष्पाप नागरिकांच्या कत्तली कराव्या, गावेच्या गावे जाळावी ही तुमची योग्य प्रतिमा नसेल ती पद्धत तर शोषक लोक आणि हुकूमशहा लोक वापरतात. तुम्ही रयतेचे पोषक आणि पालनकर्ते व्हावं हीच माझी अपेक्षा आहे.

“रयतेचं पालन पोषण करण्यासाठी आपणाला रयतेस पोटास लावावे लागेल.” म्हणजेच काय तर रयतेच्या हातांना काम द्यावं लागेल त्यातून त्यांना रोजगार मिळेल, त्यांच्या हाती चारपैसे खेळतील त्याची क्रयशक्ती Purchasing power वाढेल आणि त्यातूनच स्वराज्यात उद्योगधंदे, व्यापार वाढीस लागून स्वराज्य हे एक प्रगतीशील आणि विकसित असे राज्य बनेल.

तर एक राजा म्हणून उद्योजक होताना तुम्हाला काही सूत्रे लक्षात ठेवावी लागतील. एक यशस्वी उद्योजक होण्याची हीच खरी चतुःसूत्री होय. ही चतुःसूत्री एका चतुरंगी सेनेला सहज भारी पडणारी आणि त्याचवेळी स्वराज्यातील उद्योगधंद्याना, व्यापाराला भरभराटीला आणणारी ठरेल, तेव्हा या चतुःसूत्रीचा आपल्या आयुष्यात चतुरंगी सेनेपेक्षा जास्त उपयोग होईल हे लक्षात ठेवा.

एक तर यशस्वी उद्योजक राजा होण्यासाठी लागणारी चतुःसूत्री खालीलप्रमाणे –

१) नफा मार्जिन प्रॉफिटॅबिलीटी Profitability

२) भविष्य – Scalability – scope

३) देवाणघेवाण वेग – Speed of transaction

४) इतरांपेक्षा सरस – Competitive advantage – इतरांपेक्षा वेगळेपण

तर शिवबाराजे आपलं स्वराज्य हे शून्यातून निर्माण करायचे आहे. हा एक उद्योगच आहे. यात माणसं जमवणं, शस्त्र जमवणं आणि ही सर्व साधनसंपत्ती नीट उपयोगात आणून स्वतःच राज्य स्वराज्य निर्माण करणं हेच ध्येय आहे. तेव्हा हे ध्येय वेगाने प्राप्त करण्यासाठी या चतुःसूत्रीचा उपयोग होईल. हे चार मुद्दे जर एखाद्याने नीट समजून घेऊन आयुष्यात कोणताही धंदा उद्योग, व्यापार करताना वापरले तर तो कोणत्याही देशात कोणत्याही परिस्थितीत एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आंल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. तेव्हा आता ही यशस्वी उद्योजक होण्याची चतुःसूत्री एक – एक मुद्दा समजावून सांगते ध्यान देऊन ऐका आणि अंमलात आणा मग यश हे तुमच्या डाव्या हाताचा खेळ बनते की नाही ते पहा.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!