१२. यशस्वी राजा-उद्योजक होण्याची चतुःसूत्री

१२. यशस्वी राजा-उद्योजक होण्याची चतुःसूत्री

४) इतरांपेक्षा सरस इतरांपेक्षा चांगले असा – Competitive advantage

शिवबाराजे एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणारा सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा गुण म्हणजे आपणाकडे इतरांपेक्षा सरस, इतरांपेक्षा वेगळे “आणि इतरांपेक्षा चांगले असे काहीतरी असले पाहिजे. आणि हा चौथा गुण एका उद्योजकात असेल तरच अगोदरचे तीन गुण फायद्यात पडतात आणि हे जर नसेल तर मग अगोदरच्या तिन्ही गुणांना हा चौथा गुण मारक ठरतो. तेव्हा या चौथ्या गुणावर चौथ्या सूत्रावर अधिक लक्ष द्यायला पाहिजे. इतरांपेक्षा सरस म्हणजे काय तर स्पर्धेत यश मिळण्यासाठी तुम्हाला ग्राहकांना जास्त द्यावे लागेल आणि ते स्वस्तही द्यावे लागेल. वस्तू जास्त द्या आणि किंमतही इतरांपेक्षा कमी घ्या असे हे साधारण सूत्र आहे.

एखादं काम इतरांपेक्षा वेगाने करा आणि सर्वात पहिलं करा. याला Competitive advantage असं म्हणतात. जी कल्पना इतर करू शकत नाहीत ती कल्पना आपण करायची आणि जी कल्पना इतर कोणी विचार करून अंमलात आणण्याअगोदर आपणच ती अस्तित्त्वात आणायची. कल्पना पण इतरांआधी करायची आणि ती कृती देखील इतरांअगोदर अंमलात आणायची असा याचा अर्थ होतो. त्यामुळे सतत इतरांपेक्षा चांगले काय देता येईल आणि इतरांपेक्षा किती जास्त देता येईल ते जरूर पहा. शिवाजी महाराजांनी जिजाऊसाहेब यांच्या या शिकवणीनुसार रयतेला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कधी कोणी बी-बियाणे, बैल, अवजारे, शेती आणि पाणी हे सर्व दिले नव्हते. महाराजांनी एका दमात हे सर्व भूमीहीन आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलं. म्हणूनच रयतेनं शिवाजी महाराज आणि स्वराज्य या दोघांवरही जीवापाड प्रेम केलं. आता हीच सूत्रे स्वराज्याच्या विस्तारासाठी महाराजांनी कशी कशी वापरली ते पाहू.

इतरांपेक्षा वेगळे :- शिवाजी महाराजांच्या काळी लोक हत्तीवर बसून लढायचे. विशेष करून राजे महाराजे. महाराजांचे हे वेगळेपण आहे की त्यांनी आयुष्यभर एकाही लढाईत हत्ती वापरला नाही. महाराजांचे इतरांपेक्षा आणखी एक वेगळेपण आहे आणि ते म्हणजे त्यांनी तोफखाना देखील कधी वापरला नाही. मराठा लष्करात तोफा वापरण्याची गरजच ठेवली नाही. हत्ती, उंट तर अजिबात वापरायचे नाहीत. वापरायचे ते फक्त घोडे आणि तेही अत्यंत वेगाने धावणारे. एक-एक मजल १५० कि.मी.ची असणारे वेगवान असे घोडदळ वापरायचे पण सोबत तोफखाना घ्यायचा नाही. कारण तोफा सोबत घेतल्या की लष्कराचा वेग मंदावतो आणि मग इतरांपेक्षा वेगाने काम करणे जे अपेक्षित असते ते होत नाही. तेव्हा वेगाच्या आड येणाऱ्या तोफा अजिबात सोबत घ्यायच्या नाहीत. घोडदळ एवढं वेगवान वापरायचं, हालचाली एवढ्या
चपळपणे करायच्या की शत्रूला त्याचा तोफखाना सुद्धा चालवायला द्यायचा नाही. मराठ्यांचा सर्वात जास्त भर असायचा छाप्यावर. आणि मग अचानक छापा पडल्यावर तोफा चालवायच्या कोणावर कोणी कधी? तोफा सज्ज करून गोळे उडेपर्यंत तर मराठे आपले काम करून परत निघायचे. मोगलांना तोफखाना वापरायची महाराजांनी कधी संधीच दिली नाही.

तोफखाना ही मोगलांची सर्वात मजबूत बाजू आणि विजयासाठी मोगलांची सर्व भिस्त ही तोफखान्यावर आणि मराठे तर तोफा चालवायची संधीच देत नसत आणि मराठे स्वतः कधी तोफा वापरत नसत गनिमी कावा या युद्धतंत्रामध्ये वेगवान हालचालींना महत्त्व असते आणि या वेगाचा सर्वात जास्त फायदा घेता यावा म्हणून मराठे तोफा वापरतच नसत. हे झालं छापामारी बाबत. किल्ले जिंकण्यासाठी सुद्धा मराठे कधी तोफा वापरत नसत. तोफा वापरायच्या म्हणजे मोठी फौज आणि हत्ती आले. आणि किल्ल्याला वेढा घालणं आलं. मग मोर्चे लावा, तोफा डागा आणि गोळाफेक करा. त्यानंतर किल्ल्याचे बुरुज पाडा, तटबंदी पाडा आणि मग हल्ला करून किल्ला लढवा. नशीब चमकले तर किल्ला मिळायचा नाहीतर सगळी मेहनत परत पाण्यात जायची आणि समजा एवढी मेहनत करून सहा महिने-वर्ष खर्ची घालून प्रचंड खर्च करून जर किल्ला पाडून

जिंकला तरी मग पुन्हा डागडुजी कोणी करायची! त्या बांधकामाचा परत खर्च जिंकणाऱ्याच्या डोक्यावर, मराठे असला खर्चिक कार्यक्रम कधी करत नसत. मराठा लष्कराचे हे uniqueness वेगळेपण होय.

ना सोबत हत्ती घ्यायचे ना तोफा घ्यायच्या, ना मोर्चे लावायचे, ना वेढा घालायचा, ना किल्ल्याची तटबंदी पाडायची. सरळ जायचे किल्ल्यावर माळा लावायच्या, शिड्या लावायच्या आणि एका रात्रीत दोन-तीन तासात किल्ला आहे तसा सुस्थितीत ताब्यात घ्यायचा. जेणेकरून खर्च कमीत कमी येतो आणि नफा १०० टक्के. किल्ला पूर्नबांधणीचा खर्च नाही की किल्ल्यावर रसद भरायचा प्रश्न नाही. रेडीमेड आपला किल्ला ताब्यात घ्यायचा. ना

मनुष्यहानी, ना रुपया खर्च निव्वळ नफाच नफा याला म्हणतात Competitive advantage इतरांपेक्षा सरस असे काम करण्याची एक unique वेगळी पद्धत.
स्वराज्य वाढायला ह्याच सर्व गोष्टी कारणीभूत होत्या. महाराज इतरांपेक्षा वेगळे विचार करायचे, तो विचार इतरांपेक्षा लवकर अंमलात आणायचे. इतरांपेक्षा वेगाने काम करायचे आणि इतरांपेक्षा वेगळेपणाने काम करायचे. त्यामुळे साहजिकच इतरांपेक्षा जास्त यश, इतरांपेक्षा जास्त नफा स्वराज्याच्या तिजोरीत येत गेला आणि स्वराज्य दिवसेंदिवस वाढत गेले, समृद्ध होत गेले.

३५ वर्षात एकशे अकरा किल्ले म्हणजे वर्षाला ३ किल्ले बांधायचा विश्वविक्रम शिवाजी महाराजांनी केला. भारतातील पहिले आरमार बांधले आणि पहिली सागरी मोहिम देखील करून बसरूरवर छापा देखील टाकला. ३५० किल्ले एकाच राज्यात असणारे जगातील एकमेव राष्ट्र म्हणजे आपला महाराष्ट्र. महाराजांकडे ३५ वर्षात ४२२ किल्ले, ८०० व्यापारी जहाजे, आरमारी गलबते आणि सव्वा लाख घोडे, सहा राज्यात विस्तार एवढी सगळी प्रगती अत्यंत अल्प काळात करता आली.

आपणही आपल्या आयुष्यात या चतुःसूत्रीचा उपयोग करून आपल्या उद्योगात जास्ती नफा मिळवा. आपल्या उद्योगात आपणासारखी माणसं तयार करून उद्योगाला भविष्य तयार करा. आपल्या उद्योगाच्या वाढीसाठी देवाणघेवाणीचा वेग वाढवा आणि इतरांपेक्षा वेगळे सरस असे काम करून जगात आपले नाव कमवा. आपण असे करू शकलो तरच आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत अन्यथा केवळ आंधळे भक्त. केवळ दाढ्या वाढवून, मिशा कोरून आणि चंद्रकोर लावून असे अफाट यश मिळणार नाही. त्यासाठी छत्रपतींसारखी कृती करावी लागेल, आचरण करावे लागेल. नवीन ज्ञान आणि कौशल्य विकसित करावे लागेल.
Use your time or loose your time

आपला वेळ उपयोगात आणा नाही तर वाया घालवा. आपण हाती असणारा वेळ उपयोगत न आणणे म्हणजेच वाया घालवणे होय. जो वेळ वाया घालवतो त्याला नंतर वेळ वायाच घालवतो. जेव्हा तुम्ही प्रश्नावर लक्ष देता तेव्हा लक्ष चुकतं. आणि जेव्हा तुम्ही लक्ष्यावर लक्ष देता (Focus करता) तेव्हा प्रश्न आपोआप सुटतो. संकटे आली म्हणून ध्येय बदलू नका पण गरज पडलीच तर मग मात्र रणनिती जरूर बदला.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!