१४. योग्य सल्लागार सोबत ठेवा.

१४. योग्य सल्लागार सोबत ठेवा.

शिवबाराजे माणसाच्या आयुष्यात तो किती पुढे जाणार किती यशस्वी होणार हे यावर देखील खूप अवलंबून असते की तो आपल्या सोबत सल्लागार म्हणून कोणाला ठेवतो. आपण ज्याचा सल्ला घ्यावा, ती व्यक्ती पोक्त असावी (Mature). ती अनुभवी असावी, ती ज्ञानी असावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती व्यक्ती आपली हितचिंतक देखीलअसावी. ती सल्ला देणारी व्यक्ती आपल्या विश्वासास पात्र देखील असावी. जर एखाद्याने ही गोष्ट आपल्या आयुष्यात पाळली नाही, योग्य सल्लागार सोबत ठेवला नाही तर मग सगळे निर्णय त्याला एकट्यालाच घ्यावे लागतील आणि त्यातील मग बरेच निर्णय चुकतील. तेव्हा जास्तीत जास्त अचूक निर्णय घेता यावा यासाठी जास्तीत जास्त सल्लागार किंवा मग एकच सल्लागार पण मग तोच जास्तीत जास्त हुशार असेल असाच नेमावा.

यासाठीच आम्ही तुम्हाला वयाच्या बाराव्या वर्षापासूनच अष्टप्रधान मंडळ नेमून दिले आहे. हे अष्टप्रधान मंडळ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपणाला दिलेले आठ सल्लागार आहेत. राज्य चालविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची तज्ञ आणि अभ्यासू अशीच माणसे आम्ही तुमच्या दिमतीला दिली आहेत. ही सर्व मंडळी अभ्यासू. तुमच्यापेक्षा वयाने तिप्पट, चौपट तेवढीच ती अनुभवी हुशार आणि कल्पक अशीच आहेत. आम्ही अत्यंत काळजीपूर्वक हे अष्टप्रधान मंडळ तुम्हाला एवढ्या कमी वयात सोबत दिले आहे. जेणेकरून तेवढाच तुमचा यशाचा पल्ला लांबचा होईल.

तेव्हा आता सल्लागार कसा असावा याची मी तुम्हाला काही उदाहरणे सांगते ती नीट लक्षात घ्या आणि पुढे भविष्यात तशी माणसे पारखून मग त्यांना आपले सल्लागार नेमत चला. भगवान श्रीराम यांच्या आईला एक
चुकीची सल्लागार मिळाली, तिचे नाव मंथरा. तिने कैकयीला चुकीचा सल्ला दिला. परिणाम रामाला आपले वडिल गमवावे लागले. दोन भाऊ गमवावे लागले, सत्ता गमवावी लागली आणि चौदा वर्षांचा वनवास पदरी आला. पुढे बनवासात सिता हरण झाले. रावणाबरोबर मोठे युद्ध करावे लागले. आणि परत स्वगृही परतताच सीतेचा त्याग तोही एका फालतू माणसाच्या टिकेवरून. अर्थात लोकापवाद किती गंभीरतेने घ्यावा याचेही भान बाळगले पाहिजे. अत्यंत टोकाचा निर्णय घेता कामा नये. सितेला वनवासात परत सोडले आणि लव-कुश यांना पिता जीवंत असताना अनाथासारखे राजाची मुले असून ऋषींच्या आश्रमात वाढावे लागले. पुढे रामाचा मुलांबरोबर ही संघर्ष झाला आणि त्यात मुलांकडून पराभव पत्करावा लागला. बाप आणि मुले यांचा हा संघर्ष पाहून सितेने अप्रिप्रवेश केला. काय झालं रामाच्या सुंदर आयुष्याचं. सोन्यासारख्या कारकिर्दीचं रखरखतं वाळवंट झालं. कारण एकच चुकीची सल्लागार मंथरा.

तेव्हा राजे आयुष्यात तुम्ही देखील अशी बाई, बटकीण, कलावंतीण यांच्यापासून कायम दूर रहा. आपल्या सैनिकांना देखील अशा मंथरेच्या संपर्कात येता येणार नाही असे कडक नियम बनवा आणि ते कसोशीने अंमलात आणा. स्वराज्याच्या बुरूजांना खिंडार पाडू शकतील असे सल्लागार आयुष्यात येऊच देऊ नका.

आता याच रामायणातील आणखी एक सल्लागाराची गोष्ट सांगते ती ऐका या चांगल्या सल्लागाराचे नाव बिभीषण. हा खूप विद्वान आणि तेवढाच सज्जन असा सल्लागार. याने आपल्या भावाला रावणाला योग्य तोच सल्ला दिला की दुसऱ्याची बायको पळवणे योग्य नाही. हे एका मोठ्या संकटाला आमंत्रण होऊ शकते. तेव्हा रावणाने याचा सल्ला तर ऐकलाच नाही उलट बिभिषणाला लाथ मारून लंकेतून हाकलून दिले. रावणाने योग्य अत्यंत उमदा असा सल्लागार गमावला. परिणाम काय तर तो रामाला जाऊन मिळाला आणि त्याने रामाला योग्यवेळी योग्य सल्ला देत गेला आणि शेवटी रावण त्याची सर्व मुले,
सेनापती आणि सैत्य मारले गेले. एवढे मोठे नुकसान रावणाला सोसावे लागले नसते. जर त्याने बिभिषणाचा सल्ला ऐकला असता. तेव्हा असा बुद्धिमान प्रामाणिक आपले हित जोपासणारा सल्लागार कायम सोबत ठेवा आणि त्याला कधी अंतर देऊ नका.

आता असेच तुम्हाला महाभारतातील दोन सल्लागारांची गोष्ट सांगते. पहा कोणता सल्लागार सोबत असल्यावर आयुष्याचे काय चांगले वाईट होते ते. पहिली गोष्ट सांगते ती वाईट सल्लागाराची. याचे नाव शकुनी आणि हा ज्याचा सल्लागार तो अल्पबुद्धी दुर्योधन. या शकुनीने चुकीचे सल्ले देऊन देऊन कौरव-पांडव या भावाभावात लावून दिली आणि आपण बसला मजा बघत. तेव्हा राजे यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपला राज्यकारभार करत असताना नातेवाईकांना, मित्रांना त्यात ढवळाढवळ करू देऊ नका. अल्पवयीन, अल्पबुद्धी लोकांना सल्ला द्यायला कधी संधी देऊच नका.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!