१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

१६. अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करा.

३) तुमच्याकडे साधने नाहीत म्हणून रडत बसू नका-

शिवबाराजे यशस्वी होणारी माणसे माझ्याकडे ध्येय प्राप्तीसाठी लागणारी साहित्य-साधने सामुग्री नाही असे म्हणत रडत बसत नाहीत. कारण यशस्वी होणाऱ्या माणसांना हे माहीत असते की आज जरी माझ्याकडे साधने सामग्री नसतील तरी पण ती जमा करण्याची उमेद आणि क्षमता तर आहे ना? मग त्याच उमेदीच्या बळावर आपली क्षमता सतत वाढवत राहात आपण ती साधने आणि सामग्री कशी जमा करायची याचा विचार करायचा. ती साधन सामग्री प्राप्त करण्याचे नवनवीन मार्ग शोधायचे. ती साधने जमा करायच्या नवनवीन कल्पना मांडायच्या. नवनवीन संकल्पना जन्माला घालायच्या. असं सतत नवनवीन विचार करत चालल्याने कल्पना करत गेल्याने नक्कीच एक ना एक दिवस आपणाला तो मार्ग दिसतो ती साधने सापडतात आणि मग आपण ती सर्व साधने सर्वशक्तीनीशी उपयोगात आणायची आणि यशस्वी व्हायचे. लक्षात ठेवा यशस्वी होण्यासाठी आणि अपयशातून बाहेर पडण्यासाठी नवीन कल्पना, संकल्पना हा एकच मार्ग आहे आणि तसा सकारात्मक विचार करण्याची आपली क्षमताच आपणाला ती सर्व साधने प्राप्त करून देते.

तेव्हा आज आता माझ्याकडे काहीच साधने नाहीत म्हणून कधी रडत बसू नका आणि आपण भविष्यात जी साधने जमा करणार आहोत त्यासाठी लागणारी जी क्षमता आहे ती मात्र गमावू नका. त्यामुळे सतत कार्यप्रवण रहा. सतत आपली क्षमता वाढवत चला. क्षमता वाढली की संधी आपोआप दिसेल आणि संधी दिसली की साधनसामुग्री आपोआप गोळा व्हायला लागेल. तेव्हा विचार जीवंत ठेवा. क्षमता जागृत राहतील आणि क्षमता जागरूक ठेवल्या की साधने आपोआप जमतील. तेव्हा अपयशातून बाहेर जाण्याचा हाही एक मार्ग आहे की तुम्ही हे विसरू नका की तुम्ही अजून नव्याने विचार करू शकता आणि ज्याअर्थी तुम्ही विचार करू शकता त्याअर्थी तुम्ही साधने जमा करू शकता आणि साधने जर जमा करू शकला तर ती उपयोगात देखील आणू शकता. तेव्हा विचार करण्याची नवनवीन युक्ती लढवायची, नवनवीन कल्पना राबवायची क्षमता तेवढी कायम ठेवा. जेव्हा तुम्ही मनाने हरता तेव्हा तुम्ही मनापासून पराभव स्वीकाराल आणि मग त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही स्वतः गमावता. तेव्हा मनाने हरू नका म्हणजे विचारांने हरणार नाहीत आणि विचारांना जर जिवंत ठेवले तर मग मात्र अपयशातून बाहेर पडल्याशिवाय राहणार नाहीत.

तेव्हा शहाण्या माणसाने कधी रडायचे नाही तर सतत लढायचे. रडणारा कधी जिंकू शकणार नाही आणि लढणारा कधी पराभूत होऊ शकणार नाही. राजमाता जिजाऊ यांच्या शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराज संकटे आली तर रडत न बसता लढत राहण्याची तयारी करायचे. साधने नसतील तर ती जमा करायचे. माणसे कमी असतील तर ती गोळा करायचे आणि अपयशातून यशाकडे जायचे. पुरंदरच्या पहिल्या युद्धाच्यावेळी महाराजांकडे पुरेसे सैन्य नव्हते. शस्त्रे नव्हती आणि खजानाही नव्हता. मग काय महाराज रडत बसले नाहीत. त्यांनी एक शक्कल लढविली आणि शिरवळच्या सैनिकांना सांगितले फतेहखान चालून आला की न लढताच पळून पुरंदरवर या, पुढचे पुढे बघू. मावळ्यांना महाराजांच्या पुढील युक्तीची कल्पना नव्हती. महाराजांकडे युद्धाची साधने नव्हती पण युद्ध जिंकण्यासाठी लागणारी अक्कल होती. मराठे पळपुटे असल्याची फतेहखानाला खात्री वाटली आणि त्याने आपल्यासोबत आणलेला सर्व खजाना घोडे आणि शस्त्रास्त्रे ठेवली सुभानमंगळ किल्ल्यात आणि हा लष्करासह निवांत झोपला शिरवळच्या ठाण्यात. मग काय मराठ्यांनी रात्रीचाच जाऊन सुभानमंगळावर छापा टाकला आणि थोडीशी झुंज देऊन सगळे घोडे, शस्त्रे आणि खजिना ताब्यात घेऊन पुरंदर किल्ला गाठला, खवळलेल्या फतेहखानाने पुरंदरवर आक्रमण केले आणि मराठ्यांनी त्याला त्यांच्याच शस्त्रांनी पाणी पाजले. त्यांच्याच घोड्यांवरून पाठलाग करून त्यांचा पराभव केला. हे सर्व शक्य झालं कारण महाराजांना हे माहीत होते की आज माझ्याकडे साधने नाहीत परंतु ती साधने जमा करायची क्षमता, ती साधने जमा करण्याची युक्ती तर आहे ना? आणि मग तशी शक्कल लढवून महाराजांनी
ती प्राप्त केली आणि अपयशातून यशाकडे जाणारा मार्ग तयार केला.

आयुष्यातील वयाच्या १७ व्या वर्षी होणारी ही लढाई महाराजांची पहिलीच आणि निर्णायक ठरणारी होती. या लढाईमुळे मावळ्यांना महाराजांच्या युक्तीवर त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवता येणार होता. आणि म्हणूनच महाराजांना हे युद्ध जिंकणे खूपच महत्त्वाचे होते. आणि महाराजांनी ते जिंकले. शत्रूनी आणलेली साधनसामग्रीच त्यांनी शत्रूला पराभूत करण्यासाठी वापरली यालाच म्हणतात अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग तयार करणे. संयम ठेवा वाट पहा. युक्ती लढवा आणि मग शत्रूला वाटेला लावा. हाच तो विजयाचा मंत्र आहे. तेव्हा साधने नाहीत म्हणून गप्प बसू नका. एक शक्कल लढवा आणि ती साधने प्राप्त करा आणि मग नियोजनबद्ध योजना करून त्या साधनांचा उपयोग करून विजय मिळवा. साधने असताना लढण्याचा विचार तर कोणीही करेल. परंतु साधने नसताना यशाचा विचार करणे हीच मोठी क्षमता आहे. आणि ज्यांच्याकडे ही विचार करण्याची क्षमता आहे तेच लोक नवनवीन आयडीया निर्माण करतात. त्या बळावर यशासाठी लागणारी साधनसामुग्री जमा करतात. आणि शेवटी यश मिळवतात. तेव्हा विचार करण्याची क्षमता कायम तजेल आणि तेजतरार ठेवा. अपयश तुमच्याजवळ फिरकायची हिंमत देखील करणार नाही. आणि फिरकलेच तर तुम्ही त्याला यशात बदलल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा यशाचाच विचार करत जा. यशासाठी लागणारी सामग्री सुचत जातील. ती सुचलेली सामग्री जमा करा आणि मग ती सामग्री उपयोगात आणा. यश तुमचेच आहे.

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!