१७. कोणते लोक सोबत घ्यावे ?
१) घाबरून – Fear –
राजे या जगातील बऱ्यापैकी लोक हे घाबरून काम करतात. यांना काम करण्यासाठी भीती दाखविली जाते, मारहाण केली जाते, उपाशी ठेवले जाते, छळले जाते. शक्यतो हा प्रकार एक चांगला राजा करूच शकत नाही. हा प्रकार करणारे लोक महत्त्वाकांक्षी, हुकुमशहा आणि शोषक असतात. हे लोक लोकांची पिळवणूक करून लोकांना छळून, त्यांना गरीब करून स्वतः श्रीमंत होऊ पाहतात. लोकांच्या मनात यांच्याबद्दल कायम तिरस्काराचीच भावना असते. असे हुकूमशहा म्हणजे मानवतेला लागलेला कलंक असतो. यांचा इतिहास रक्तरंजित असतो आणि कारकिर्द काळीकुट्ट.
काही वेळा तर अज्ञानापोटी सुद्धा लोक घाबरून काम करतात. देवाचा कोप आणि निसर्गाचा प्रकोप अशा गोष्टीची अज्ञानी माणसांना भिती घालून सुद्धा काही शोषक लोक आपले काम करून घेतात. लक्षात ठेवा अशा काम करणाऱ्या पद्धतीने तो समाज आणि तो देश कधीही उभा राहणार नाही किंवा विकसित होणार नाही. तेव्हा तुम्ही लोकांकडून अशाप्रकारे कधी काम करून घेऊ नका. कारण आपणाला रयतेचे पालक व्हायचे आहे. लोकांचे पोषण करायचे आहे आणि अगोदरच शेकडो वर्षे गुलामीत खितपत पडलेल्या लोकांना या दुःखातून, दारिद्रयातून मुक्त करायचे आहे. राजे मला तुमची ओळख ही एक उद्धारकर्ता आणि मुक्तीदाता अशीच बनवायची आहे. तेव्हा तुम्ही त्याच दिशेने काम करणे अपेक्षित आहे.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
