१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा

१८. स्वतःला चांगल्या सवयी लावा

१) वेळ पाळणे :-

शिवबाराजे यशस्वी लोकांच्या यशाचा पाया असणारी एक प्रमुख सवय म्हणजे हे लोक वेळ पाळतात. वेळ पाळणे म्हणजे काय तर ठरलेले काम ठरलेल्या वेळीच करणे आणि कोणते काम करायचे ते विचार करून ठरवायचे. सर्व साधनसामुग्रीची जुळवाजुळव करायची आणि ठरलेले काम
ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी ठरल्याप्रमाणे पार पाडायचेच. एक काम दोनदा करायची वेळ येणार नाही याची काळजी घ्यायची आणि हाती घेतलेलं काम कोणत्याही प्रकारे उशीराने होणार नाही बिघडणार नाही याची दक्षता घ्यायची.

यशस्वी माणसांची ही एक चांगली आणि महत्त्वाची सवय असते की हे लोक लोकांना दिलेला वेळ पाळतात. ते उशीरा येण्याची कारणे सांगत नाहीत की बहाणे बनवत नाहीत. ते वेळेवर पोहोचण्यासाठी वेळेआधी निघतात आणि वेळेच्या आधीच पोहचतात.

यशस्वी होणारी माणसं कधीही उशीरा आलेले दिसत नाहीत आणि उशीराने येणारी माणसं कधीही यशस्वी होत नाहीत. एखादच यश अपघाताने मिळते परंतु यशातील सातत्य मात्र केवळ वेळ पाळणे या सवयीमुळे शक्य होते. तेव्हा विचारपूर्वक एखाद्याला वेळ द्यायचा आणि दिलेला वेळ पाळायचा.

राजे तुम्हाला लोकांना हजारो लोकांना रोज वेळ द्यावा लागेल आणि प्रत्येकाचे काम वेळेतच पूर्ण करून द्यावे लागले यासाठीच वेळेचे व्यवस्थापन करायला शिकले पाहिजे. एका यशस्वी माणसाकडे राजाकडे कामाची खूप मोठी यादी असते. पण त्यातील सर्व काम तो जर करत बसला तर त्यांना महत्त्वाची कामे करता येणार नाहीत. कामाचा बोजा एवढा वाढेल की ती व्यक्ती राजा न होता मजूर होईल. तेव्हा अशा वेळी आपल्या कामाचे विभाजन करा आणि निवडक कामे मात्र स्वतः करा. महत्त्वाची आणि तातडीची कामे तेवढी आपण स्वतः करायची बाकीची कामे अधिकारी, कर्मचारी, सहकारी या सर्वांना वाटून द्यायची. म्हणूनच कामातून वेळ काढून वेळ द्या आणि ती वेळ पाळा.

सतत कार्यमग्न राहणे हा यशाचा मार्ग नसून महत्त्वाचे काम निवडक काम करणे आणि ते वेळेत करणे ही सवय ज्या माणसांना असते तेच यशस्वी होतात. शेवटी तुम्ही किती काम करता हे महत्त्वाचे नसतेच, महत्त्वाचे हेच असते की तुम्ही कोणते काम करता? म्हणून आयुष्यात केवळ महत्त्वाची, तातडीची आणि जास्तीत जास्त लाभ देणारीच कामे आपण हाती घेतली पाहिजेत. आणि ती वेळेतच पूर्ण केली पाहिजेत. लक्षात ठेवा महत्त्वाचे, तातडीचे आणि फायद्याचे काम केवळ वेळेवर सुरू करणे महत्त्वाचे नसून ते वेळेतच पूर्ण करणे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. तेव्हा कामाची वेळ ठरवा, वेळेत काम सुरू करा. वेळेत ते करा आणि वेळेतच पूर्ण करत चला. उशीराने झालेले काम आणि बिघडलेले काम यात फरक तो काय? आणि जर काम वेळेत झाले नाहीतर मग सगळी मेहनत, सगळा खर्च वाया जाणार आणि जर आपणाकडून अशी वेळेची, श्रमाची, पैशांची नासाडी झाली तर मग आपण यशस्वी कशातून होणार? तेव्हा “वेळ पाळा, वेळ पाळा आणि वेळ पाळा !” हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

 

error: Content is protected !!