१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा

१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा

३) रोजचा प्राधान्यक्रम ठरविणे :-

शिवबाराजे आपण प्रत्येक दिवशी प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करण्यामधील तिसरी शिस्त म्हणजे रोजचा प्राधान्य क्रम ठरविणे. तुम्ही तुमचे दररोजचे ध्येय ठरविले ते प्राप्त करण्याचे नियोजन देखील केलेत तरी एक सुवर्ण नियम लक्षात ठेवूनच काम करायचे. आणि तो नियम म्हणजे सगळी कामे तुम्ही करायची नाहीत आणि सगळीच कामे एकाचवेळी देखील करायची नसतात. मग तुम्ही आजची ठरलेली जी दहा कामे आहेत यातील सगळीच समान महत्त्वाची किंवा गरजेची नसतात. त्यातील काही अत्यंत महत्त्वाची, काही तातडीची कामे असतात तर बाकीची कामे नंतर करण्याजोगी देखील असतात. आणि काही कामे तर नाही केली तरी चालू शकतात. तेव्हा ही कामे करण्यासाठी तुम्हाला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. अगोदर अत्यंत महत्त्वाची कामे नंतर तातडीची कामे आणि मग इतर कामे असा प्राधान्यक्रम ठरवून काम करावे लागेल.

यातील काही कामे तुम्ही करायची तर काही कामे अधिकारी, कर्मचारी यांना करायला सांगायची. साधारणपणे २०% कामे ८०% निकाल देतात, यश देतात आणि बाकीची ८०% कामे २०% निकाल किंवा यश देतात. तेव्हा आपण कोणती कामे करावयाची तर ती फक्त अत्यंत महत्त्वाची कामे.

साधारणपणे कामाचा प्राधान्यक्रम ठरला की त्यानुसार कामाचे चार वेगवेगळे प्रकार असतात ते नीट समजून घ्या.

१) तुम्ही करू शकत नाही अशी कामे

२) तुम्ही करू शकता अशी कामे

३) तुम्ही चांगल्याप्रकारे करू शकता अशी कामे

४) केवळ तुम्हीच करू शकता अशी कामे

१. जी कामे तुम्ही करू शकत नाही ती कामे करण्याचा प्रयत्न करून वेळवाया घालवत बसू नका. ज्याला ते काम जमते त्याला ते द्या आणि त्याच्याकडून ते पूर्ण करून घ्या.

२. तुम्ही करू शकता अशी कामे तुम्ही करत बसू नका. तुमच्यापेक्षा चांगले काम करणारे आणि कमी वेळात काम करणारी माणसे शोधा आणि त्यांना ती कामे द्या. तुम्ही राजा मालक म्हणून तुमचा वेळ आणि तुमची ऊर्जा खूप महत्त्वाची असते ती सामान्य कामे करण्यात खर्ची पाडू नका.

३. तुम्ही चांगल्याप्रकारे करू शकता अशी कामे सुद्धा तुम्ही करत बसू नका. तेच काम तुम्ही उत्कृष्टरित्या करू शकणाऱ्या चांगल्या शिकलेल्या अनुभवी अशा माणसाला करायला सांगा. तो मागेल ती योग्य किंमत त्याला द्या आणि ते काम त्याला सांगा. आपण आपला वेळ आणि ऊर्जा अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची कामे करण्यासाठी राखून ठेवा.

४. तुम्हीच करू शकता अशी कामे फक्त तुम्हीच करा. ज्या कामासाठी तुमचा जन्म झाला आहे आणि जे काम इतर कोणीही करू शकत नाही अशीच कामे तुम्ही केली पाहिजेत. जे काम तुमचे मंत्री अधिकारी करू शकणार नाहीत केवळ अशीच अवघड आणि अशक्य कामे तेवढी तुम्ही हाती घेतली पाहिजेत. आपला सर्व वेळ आणि ऊर्जा याच कामावर केंद्रित केली पाहिजे.

कामाचे विभाजन करून अशाप्रकारे काम करणे यालाच राजे कामाचा प्राधान्यक्रम ठरविणे असे म्हणतात. ज्याला प्रत्येक दिवशी आपण यशस्वी होत आहोत की नाही, प्रगती करत आहोत की नाही याची खात्री पटवून घेण्यासाठी अशाच प्रकारे प्राधान्यक्रम ठरवून कामे केली पाहिजेत.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

error: Content is protected !!