१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा
६) रोज नवीन शिकण्याची प्रगती करण्याची सवय :-
शिवबाराजे यशस्वी लोकांना असणारी सहावी महत्त्वाची सवय किंवा शिस्त म्हणजे ते रोज नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ काढतात. ज्यांना जेवढी जास्त प्रगती करायची त्याने तेवढे जास्त ज्ञान आत्मसात केले पाहिजे. ज्याला जेवढे जास्त यश मिळवायचे त्याने तेवढे जास्त ज्ञान प्राप्त कमावले पाहिजे. यशस्वी लोक हे कोणतेही कारण न सांगता दिवसातील किमान दोन तास नवनवीन घडामोडी आपल्या क्षेत्रातील बदल आणि भविष्यात होणारे परिवर्तन याविषयीची माहिती घेतात. चर्चासत्रात भाग घेतात, व्यावसायिक सभांना हजेरी लावतात. या व्यतिरिक्त आपल्या उद्योगासंदर्भात नवनवीन पुस्तके वाचणे, सी.डी. ऐकणे, व्हिडीओ पहाणे अशी कामे करत असतात.
रोज नवीन शिकण्याची प्रगती करण्याची सवय स्वतःला लावणे आणि ती विकसित करणे खूप महत्त्वाची बाब आहे. जे लोक असे म्हणतात की आम्हाला पुरेसे ज्ञान आहे त्यांची प्रगती तेथेच खुंटली जाते. जे लोक असे म्हणतात की मला कामाच्या व्यापातून नवीन गोष्ट शिकण्यासाठी वेळच मिळत नाही. खरेतर हे लोक स्वतःची फसवणूक करीत असतात. काळाबरोबर ज्ञानात वाढ केली नाहीतर तुमचे कमावलेले राज्य टिकेल, मिळालेली नोकरी टिकेल याची कोण हमी देऊ शकतो का? ज्ञान हीच प्रगतीची हमी असते. आणि काही अज्ञानी लोक आम्हाला आता नवीन ज्ञानाची गरजच काय? आम्हाला वेळ तरी कुठे मिळतो? आणि या वयात आणखी पैसे कशाला कमवायचे? किंवा झाली एवढी प्रगती भरपूर झाली असे समजणारे खूप लोक असतात. शिवबा अशा अल्पसंतुष्ट लोकांची संगतही करू नका आणि त्यांना सोबतही घेऊ नका.
नकारात्मक मानसिकतेचे लोक ही मोठी अडचणच असते. ते स्वतः काही करत नाहीत आणि दुसऱ्यांनाही काही मोठं करू देत नाहीत. तेव्हा अशी नकारात्मक ऊर्जेवाली माणसं सोबत घेऊ नका. ही माणसं कधी कामाची नसतात. तुम्ही तुमच्या सोबत अशीच माणसे घ्या की ती ज्ञानाची उपासक असतील आणि त्यांना आयुष्यात नवनवीन आव्हाने स्वीकारायची इच्छा असते आणि जे लोक कायम नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतील. कारण मोठं काम एकट्याने पार पडत नाही त्यासाठी मोठं मनुष्यबळ सोबत लागते. पण ती सगळी लोकं एकाच विचाराची असली पाहिजेत. आणि तो विचार असला पाहिजे जास्तीत जास्त प्रगती करण्याचा आणि त्याचा एकच राजमार्ग असतो आणि तो म्हणजे रोज नवीन शिकण्याची मानसिकता. आपण आयुष्याच्या शेवटच्या ध्यासापर्यंत विद्यार्थी एक अभ्यासक म्हणून ज्ञानार्जन केलं पाहिजे. जो नवीन शिकेल तो नवीन राज्य निर्माण करू शकेल आणि जो नवीन शिकणार नाही त्याचे असलेले राज्य सुद्धा टिकणार नाही.
तुमचं मन हे तुमच्या स्नायुसारखे असते. तुम्ही जर त्याचा उपयोग केला नाही तर तुम्ही त्याची क्षमता गमावता, सतत शिकत राहणं ही कुठल्याही क्षेत्रातील यशासाठी किमान गरज आहे. राजे आपणाला तर दोन्ही कामे एकाचवेळी करायची आहेत. नवीन राज्य उभे करायचे आहे. आणि ते संरक्षित करत करत वाढवायचे देखील आहे. आणि हे दोन्ही होण्यासाठी तुम्हाला रोज नवीन गोष्टी शिकाव्या लागतील.
माहिती आणि तंत्रज्ञान हा तिसरा डोळा आहे. तो कायम उघडा ठेवा. आपली नजर भिरभिरती ठेवा, कान उघडे ठेवा आणि गुप्तहेर खाते अत्यंत सतर्क ठेवून जगात कोठे काय घडत आहे, घडणार आहे याची अद्ययावत माहिती ठेवा. “जो शिकेल तोच टिकेल आणि जो जास्त शिकेल तोच जिंकेल” हा मूलमंत्र कायम लक्षात ठेवा. त्यामुळेच तुम्ही रोज नवनवीन गोष्टी शिकण्याची शिस्त स्वतःला लावून घ्या. जेणेकरून कोणी तुम्हाला हरवू शकणार नाही आणि तुम्ही मात्र कोणालाही जिंकल्याशिवाय राहणार नाही. जिंकण्याचा आणि अजिंक्य राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रोज नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ काढा. शिकलेली गोष्ट आत्मसात करा आणि त्याप्रमाणे कृती करून जिकते तिकडे जग जिंकत चला.
ज्याला ज्याला प्रगती करायची आहे त्याने त्याने आपआपल्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान update knowledge कमावले पाहिजे. जुनेच ज्ञान आणि जुनेच कौशल्य बाळगून आपण नवीन परिस्थितीत नवीन शतकात यशस्वी होऊ शकणार नाही. तेव्हा ज्याला प्रगती करायची त्याने नवीन गोष्टी शिकायची तयारी ही ठेवलीच पाहिजे. तेव्हा नवनवीन गोष्टी शिका वाढा- आणि स्वतःला विकसित करा. ज्ञान हेच जगातील सर्वात मोठे भांडवल शस्त्र, अस्त्र आणि प्रगतीचा एक हुकमी मार्ग आहे हे लक्षात ठेवूनच नवनवीन गोष्टी शिका.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv
