१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा

१९. प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करा

७. तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या लोकांसाठी रोज थोडा वेळ काढणं :-

शिवबाराजे प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत आहोत की नाही याची खात्री करणारी ही सातवी आणि शेवटची शिस्त होय. एखाद्या माणसाने अगोदरच्या सहाच्या सहा शिस्ती पाळून तो खूप यशस्वी होऊ शकतो पण जर त्याने ही सातवी शिस्त पाळली नाही किंवा तिचा प्रगतीशी काही संबंध नाही असा समज करून जर दुर्लक्ष केले तर मग तो परत अपयशीच झाला असे म्हणावे लागेल. कारण त्याने जे यश कमावले त्यात त्याच्या कुटुंबाचाही काही हातभार असतो. त्याने ते यश कमावले, प्रगती केली ती कोणासाठी केली? जगातील कोणीही व्यक्ती यश, आनंद, प्रगती एकट्याने व्यक्त करू शकत नाही. शेवटी ज्या लोकांच्यामुळे ही प्रगती झाली यश मिळाले त्या लोकांसाठी सुद्धा आपण रोज थोडासा वेळ काढला पाहिजे. आपले कुटुंब आणि सहकारी यांच्या सोबत थोडासा वेळ घालवला पाहिजे. जर आपण दररोज वेळ देऊ शकत नसेल तर मग आठवड्यातील एक दिवस वेगळा वेळ कुटुंबासाठी काढला पाहिजे. हेही शक्य होत नसेल तर मग महिन्यातील एक दिवस वेगळा कुटुंबासाठी काढला पाहिजे. हे ही शक्य होत नसेल तर मग महिन्यातील सलग चार-पाच दिवस सुट्टी काढून कुटुंबासोबत ती सुट्टी घालवली पाहिजे. हेही शक्य होत नसेल तर मग वर्षातून एकदाच एक महिना काढून लांब कुठेतरी पर्यटनाला फिरायला गेलं पाहिजे. आपले यश आणि प्रगती याचा आपण कुटुंबासोबत आनंद साजरा केला पाहिजे.

सतत कामात व्यस्त राहणे ही प्रगती नसून अधोगती म्हणावी लागेल. जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांनाच वेळ देऊ शकत नसाल तर मग तुम्ही प्रगती केली असे म्हणायला काय जागा आहे. तेव्हा आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून रोज काही वेळ आणि तोही दर्जेदार वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवायला पाहिजे. एकत्र टिव्ही पाहणे याला वेळ देणं असं म्हणता येत नाही. एकत्र जेवण करणे, गप्पा मारणे, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, संवाद साधणे आणि हे करताना इतर दसरे कोणतेही उपकरण जसे की टिव्ही. मोबाईल मध्ये न आणणे म्हणजेच आपल्या लोकांना quality दर्जेदार वेळ देणं असे म्हणतात.

शेवटी काय तर माणूस हा सामाजिक प्राणी आहे त्यामुळे त्याने आपले मित्र, कुटुंब हे जपत जपतच यश मिळवले पाहिजे. हे गमावून ते कमावले तर मग नक्की काय शिल्लक राहिले असे होते. म्हणून ज्यांनी ज्यांनी तुमच्या आयुष्यावर प्रभाव पाडला असेल ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली असेल ते लोक तुमच्या कुटुंबाचा एक भागच असतील अशा सर्व लोकांसाठी थोडासा वेगळा वेळ काढणं ही सुद्धा एक चांगली शिस्त असून आपण प्रगती खरोखरच करत आहोत का? हे मोजण्याची एक फुटपट्टी आहे.

जीवनामध्ये नाती आणि मैत्री ही आपल्यासाठी सर्वकाही असतात. यशाची शिडी चढताना हे नक्की लक्षात ठेवा की तुम्ही चुकीच्या इमारतीकडे तर जात नाही ना? म्हणूनच तुमची नाती दृढ करण्यासाठी नवीन नाती निर्माण करण्यासाठी, नाती जोपासण्यासाठी हे लक्षात ठेवाच की आपण कितीही व्यस्त असलो तरी आपण यासाठी रोज थोडा वेळ हा दिलाच पाहिजे. जर तुम्ही ही सवय नीट अंमलात आणली तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील सर्वोच्च पातळीचं यश मिळेल. तुम्ही उत्तमात उत्तम कामगिरी करून सर्वात जास्त समाधान देखील मिळवू शकाल.

म्हणूनच कुटुंबासाठी वेळ द्या, सतत कामात अडकून पडण्याची घोडचूक करू नका. राजमाता जिजाऊंची ही शिकवण खऱ्या अर्थाने महाराजांनी अंमलात आणली. महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील ८०% पेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून ही नाती जोपासली. महाराजांचे कुटुंब म्हणजे संपूर्ण रयत. त्या सर्वांना वेळ देण्यासाठी महाराज राजधानीत आणि सदरेवर खाजगीत असे कोठे ना कोठे लोकांच्या संपर्कात राहणे अत्यावश्यक होते. आणि महाराजांनी ही शिस्त मोठ्या खुबीने विकसित केली आणि लोकांना जास्तीत वेळ, जास्तीत प्रेम दिले. महाराजांचे एकूण आयुष्य १८३१६ दिवसांचे यातील १६२४२ दिवस तर महाराज राजगड पुढे रायगड अशा राजधानीच्या किल्ल्यात उपलब्ध होते. म्हणजेच काय तर एवढ्या कर्तृत्ववान पराक्रमी, व्यस्त माणसाने देखील आपली रयत आपले कुटुंब यांचे नाते जपण्यासाठी रोजचा रोज वेळ काढला आणि आपण एवढे मोठे नसून सहज म्हणतो की मित्रांसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी एकत्र घालविण्यासाठी मला वेळच मिळत नाही. म्हणूनच आपली जास्त प्रगती होत नाही हे गणित नीट समजून तर घ्या.

महाराजांनी आपल्या आयुष्यातील तब्बल ८८.६७% वेळ हा रयत आणि कुटुंब यांना दिला. आपण दररोज प्रगती करत आहोत की नाही याची अशाप्रकारे खात्री केली. आणि म्हणूनच रयत ४०० वर्षांनतरही जे महाराजांवर प्रेम करते त्याला एकच कारण आहे की महाराज फक्त राजा नव्हते तर तो एक माणसं जोडणारा उमदा माणूस देखील होते. म्हणूनच आपण आपल्या लोकांसाठी वेळातून वेळ काढा. पैसे आणि यश येतील आणि जातील पण आपले लोक सोबत असतील तर हे दोन्ही पैसे आणि यश कायमचेच आपले होतील. तेव्हा चला तर माणसं जोडा, माणसं जपा नाती दृढ करा आणि आपण खरोखरच प्रगती करत आहोत याची खात्री करा.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

 

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

error: Content is protected !!