२०. १००० पटीने विकास करा

२०. १००० पटीने विकास करा

३) प्रत्येक दिवसाचा प्लॅन रात्री झोपताना तयार करा.

शिवबाराजे एक हजार पटीत प्रगती करताना लागणारी ही तिसरी पायरी जर आपणाला वेगाने प्रगती करायची असेल तर मग पूर्व नियोजन करणे ही चांगली शिस्त अंगी बाणवावी लागेल. पूर्व नियोजन करणे म्हणजे काय तर उद्या काय काय कामे करायची आहेत त्याचे नियोजन रात्री झोपतानाच करायचे. आता प्रश्न असा पडतो की काय सकाळी उठून हे नियोजन केले तर चालणार नाही का? तर अजिबात नाही. कारण जर आपण ते काम रात्री झोपताना plan केले तर मग रात्री झोपताना आणि झोपल्यावर जवळपास आठ तास या नियोजनावर काम करायला आपल्या मेंदूला वेळ मिळतो. रात्रभर आपले मन या प्लॅनवर काम करते. लक्षात ठेवा आपण झोपलो तरी आपले दोन अवयव कायम जागृत राहतात आणि ते म्हणजे मन आणि मेंदू. आपले मन कायम सतर्क असते आणि मेंदू कायम जागृत. तेव्हा जर आपण आदल्या रात्रीच उद्या काय काय कामे करायची आहेत याचा जर plan केला तर मग रात्रभर आपले सुप्त मन आणि मेंदू त्यावर काम करत राहतात. विचारप्रक्रिया चालूच राहते आणि त्यातूनच एखादी भन्नाट कल्पना आपणाला सुचते. जी कल्पना आपल्या आयुष्याला कलाटणी देखील देऊ शकते. तेव्हा रात्री विचार करा आणि दिवसा कृती करा. हा नियम लक्षात ठेवा. काही लोक हा नियम न पाळता रात्रीपण काम करतात आणि दिवसापण किंवा दिवसभर काम करतात आणि मग रात्रभर चिंता. आपणाला चिंतन करायला सांगितले आहे. चिंतन करून काम केले की ते पूर्णच होते आणि मग चिंता करण्याची वेळच येत नाही. तेव्हा आदल्या रात्री उद्या काय काय कामे करायची याचा plan तयार करणे म्हणजेच आपण आपल्या मनाला आणि मेंदूला चिंतन करायला जवळपास आठ तासांचा वेळ उपलब्ध करून देणे.

तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनाला आणि मेंदूला काम द्या आणि
मग आपण निवांत झोपा. आपल्या मनाची सुप्त शक्ती किती मोठी आणि प्रभावी असते याची प्रचिती घ्यायची असेल तर आजपासून सुरुवात करा आणि जे काम उद्या हाती घ्यायचे त्या कामाचे आदल्या रात्री नियोजन करा.

रात्रभर त्यावर चिंतन होईल आणि मग दुसऱ्या दिवशी होणारा परिणाम पहा. तुमचे अर्धे काम तर तुम्ही झोपेतून उठण्याअगोदरच झालेले असते. बाकीचे राहिलेले अर्धे काम तेवढे तुम्हाला पूर्ण करायचे असते. तेव्हा बिछान्यावर गेल्यावर लगेच झोपू नका. झोपण्यापूर्वी झेप घेण्याचा विचार आपल्या मनाला मेंदूला द्या आणि मगच झोपा. आपली झोप ही झेप घेण्यासाठीच असेल याची खात्री करा तशी स्वतःला आजपासून सवय लावा. एक हजार पटीत प्रगती शक्य असते याचा अनुभव घ्या.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

 

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2vv

error: Content is protected !!