२१. समाजाकडे मागे वळून पहा.
शिवबाराजे आज मी तुम्हाला एक शेवटचा धडा शिकायला सांगणार आहे आणि तो म्हणजे समाजाकडे मागे वळून पाहण्याचा. आपण आयुष्यात हजारो पटीने प्रगती केली, अब्जावधी रुपये कमावले, लाखो कोटीची स्थावर मालमत्ता जमवली तरी ज्या समाजातून आपण आलो त्या समाज बांधवांसाठी जर कधी काय करू शकलो नाही तर आपले जगणे व्यर्थ झालेच म्हणून समजा. आणि म्हणूनच करिअरच्या सुरूवातीपासून मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आले आहे की आपल्या जीवनाचा उद्देश कधीही विसरू नका.
रयतेचं राज्य उभे करणे, रयतेचे कल्याण करणे हेच आपले ध्येय आणि जिवीतकार्य आहे. आपण रोज याचा विचार केला पाहिजे की जेव्हा है जग सोडून आपण जाऊ तेव्हा या समाजाला आपण कोणता वारसा देऊन जाऊ ? आपण या जगावर कोणती छाप सोडून जाणार आहोत? या समाजाला कोणता नवीन आदर्श देऊन जाणार आहोत? या जगात आलेले असताना जाण्यापूर्वी आपण विशेष असे कोणते काम करणार आहोत याचा दररोज विचार करून तशी कृती करून जावे लागेल.
दारिद्रय, अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, गुलामी, रोगराई यांनी पछाडलेला हा समाज या गर्तेतून बाहेर आणण्यासाठीच आपणाला त्यागाच्या भावनेने दातृत्वाच्या भावनेने काम करावे लागेल. समाजकार्याला जिथे जिथे आपली आपल्या पैशांची आपल्या ताकदीची गरज पडेल तिथे तिथे आपण उभे राहून सढळ हाताने मदत केली पाहिजे.
यासाठी आपल्याला स्वतःमधून बाहेर येऊन आपलं हृदय आणि मन हे अशा कार्यामध्ये गुंतवण्याची गरज आहे जे कार्य जगामध्ये किंवा इतरांच्या जीवनामध्ये मोठा बदल घडवून आणेल. माझ्याकडे खूप पैसा आल्यावर मी समाजाला मदत करेन असं म्हणण्याची चूक तुम्ही कधी करू नका. आपणाकडे जे आहे त्यातील जमेल तेवढे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना जमेल तेवढी मदत करा. शक्य तिथे त्यांना वेळ द्या आणि अशा परिवर्तनवादी कामांना, सुधारणावादी विकास कामांना मदत करा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
